छ. शिवराय : तीन गुण
छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखे व्यक्तिमत्व हजारो वर्षातून एकदा जन्माला येते. जनसामान्यांना आश्चर्यचकीत करून सोडणारे अद्भुत जीवन जगून जाते. त्यांचे आयुष्य जणू चमत्कारच भासतो. चमत्काराला नमस्कार करण्याची स्वाभाविक मानवी वृत्ती असल्यामुळे जयजयकार हा मुखातून आपसूक उमटतो आणि घोषणा बाहेर पडते, छत्रपती शिवाजी महाराज की जय! परंतु सामान्य व्यक्तीकडे रोजच्या आयुष्यात शिवाजी महाराजांच्यासारखे धैर्य ,युक्ती ,बुद्धी अभिनव कल्पना , उत्तुंग ध्येय या आणि अशा अनेक गुणांसारखे गुण आचरणात आणण्याची संधी सहसा मिळत नाही. परंतु शिवरायांचे काही गुण असे आहेत की जे सर्वांना रोज आचरणात आणता येतील.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
यापैकी पहिला गुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी धार्मिक वृत्ती! अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी साक्षात् भवानी मातेचा दृष्टांत आपल्याला झाला आहे या उद्गारांनी त्यांनी आपल्या सवंगड्यांना प्रेरित केले. देशभर ज्याच्या पराक्रमाची क्रौर्याची कीर्ती होती त्या अफजलखानाला यमसदनाला पाठवून स्वराज्याचा विस्तार केला. याच्या आधी स्वतः कल्पना करून बांधलेल्या प्रतापगडावर गंडकी नदीतील शिळा आणून भवानी मातेची मूर्ती घडविली. तिची पूजा अर्चा विधिवत सुरू केली. इंग्रज व्यापाऱ्यांचा प्रतिनिधी हेन्री ऑक्सिडेंन महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अनेक दिवस रायगडावर राहिला. त्याने लिहून ठेवले आहे की, ' राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडावरील भवानी मातेला सव्वा मण सोन्याचे छत्र अर्पण करण्यासाठी शिवराय गेलेले आहेत.' शिवचरित्रातील असे आणखीनही प्रसंग सांगता येतील. आज धावपळीच्या जीवनात साधारणपणे दैनंदिन पूजा अर्चा यासाठी कमी वेळ काढला जातो. परंतु आपल्या दिनक्रमचे नियोजन करून दैनंदिन पूजा अर्चा हा एक भाग नक्कीच करता येऊ शकतो.
या लेखाच्या संदर्भात शिवाजी महाराजांच्याकडे असणारा दुसरा गुण म्हणजे त्यांचे स्फटिकासारखे शुद्ध चारित्र्य! त्यांनी स्वतः तर कोणत्याही परस्त्रीकडे कधीच वाकड्या नजरेने पाहिले नाही परंतु त्याचबरोबर आपल्या सैन्यातील कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारची आगळीक करता कामा नये ही एक शिस्त त्यांनी निर्माण केली होती. स्वराज्याच्या विस्तारासाठी धन मिळविण्यासाठी ज्यावेळी त्यांनी १६७० मध्ये कारंजा लाड या विदर्भातील गावावर छापा मारला त्यावेळी तेथील 'एक धनाढ्य व्यापारी स्त्री वेश करून पळून गेला' असे सुरतेच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी लंडनला कळवले आहे. हा व्यापारी स्त्री वेशात पळून गेला कारण 'शिवरायांच्या सैन्यातील कोणीही स्त्रीवर अत्याचार करणार नाही' ही कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. स्त्री सन्मान करण्याचा शिवरायांचा गुण हा देखील दैनंदिन आचरणात आणण्यासाठी आपल्या संपर्कातील कोणाकडूनही स्त्री विषयक अपकृत्य होणार नाहीत याची खटपट आपण करू शकतो. आई-वडिलांनी जाणीवपूर्वक आपल्या मुलांवर स्त्री सन्मान करण्याचे संस्कार करायला हवेत. शिवाजी महाराजांचे हे आचरण सदैव अनुकरण करण्यासारखे आहे. याबाबतीत जाहिराती, चित्रपट, वेब सिरीज या माध्यमातून कळत नकळत स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध अधिकार गाजवण्याचा जो मुद्दा बिंबवला जातो त्याबद्दल जागृत राहणे देखील आवश्यक आहे.
राजाभिषेकानंतर शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली. याबद्दल पॉंडेचेरी (पुद्दुचेरी) येथील फ्रेंचांच्या वखारीचा प्रमुख फ्रान्स्वा मार्टिन याने त्याच्या दैनंदिनीत नोंद करून ठेवली आहे. तो लिहितो की , 'शिवरायांच्या छावणीत कोणतीही नर्तिका नाही.' याचाच एक अर्थ शिवराय यांनी सर्व प्रकारची छानछोकी, व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवलेच होते. तसेच आपल्या सर्व सैन्यात देखील हे मूल्य त्यांनी बिंबवले होते. आज समाजातील व्यसनाधीनतेची वाढत जाणारी स्थिती अतिशय चिंताजनक आहे. अनेक प्रकारच्या व्यसनांमध्ये लोक गुरफटलेले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींपासून ते प्रौढांचे प्रमाण लक्षणीय आहे. भारत सरकारच्या २०१८ च्या एका सर्वेक्षणानुसार १० ते १७ वयोगटातील १.३०% मुलांना दारूचे व्यसन होते. म्हणजेच ३० लाख मुलामुलींना दारूचे व्यसन होते . तर १८ ते ७५ वयोगटातील १७.१०% नागरिक दारूच्या आहारी गेले आहेत. अर्थात १५ कोटी ११ लाख नागरिक दारूच्या आहारी गेलेले होते . १० ते १७ वयोगटातील ४.७६ % मुलामुलींमध्ये मादकद्रव्यांचे व्यसन आढळले. हा आकडा १ कोटी १७ लाख इतका होतो. १८ ते ७५ वयोगटातील ७.६१% लोक मादक पदार्थांच्या घर गेले होते. म्हणजेच ७ कोटी लोक मादक द्रव्यांच्या आहारी गेले होते. ही आकडेवारी भयावह आहे. समाजाच्या काही वर्गात जणू व्यसनांना प्रतिष्ठाच प्राप्त झाली आहे असे चित्र आहे. व्यसनांपासून जाणीवपूर्वक दूर राहण्याचा शिवरायांचा गुण आत्मसात करण्यासारखा आहे. यात वैयक्तिक तसेच सामाजिक हितदेखील आहे.
दैनंदिन जीवनात शिवरायांचे हे तीनही गुण आचरणात आणता येऊ शकतात असे वाटते. शिवरायांची ही प्रेरणा समाजाला चांगल्या वाटेवर चालत राहण्यासाठी सदैव मार्गदर्शक आहे.
सुधीर गाडे, पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
युगपुरुष छत्रपती शिवराय यांचे संप आयुष्य ही प्रेरणादायी आहे. त्यातील आजच्या काळाच्या दृष्टीने महत्वाचे आणि 100% अनुकरणीय गुण अत्यंत सहज पद्धतीने मांडले आहेत सर.
ReplyDeleteधन्यवाद सत्यजित
Deleteअतिशय प्रेरणादायी छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी.. सुंदर लेखन केले सर🙏
ReplyDeleteसर, धन्यवाद 🙏
ReplyDeleteछत्रपती शिवाजी महाराजांचे तीन मुख्य गुण समाजाने आचरणात आणाता येतील असे धार्मिक वृत्ती , शुद्ध चारित्र व व्यसनमुक्ती. अतिशय अभ्यासपूर्ण सुदंर विचार मांडले आहेत सर तूम्ही या लेखात...
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteया गुणांमुळेच महाराजांना जाणता राजा असे म्हटले जाते. या गुणाची आज खुप गरज आहे . आणि हेच आजच्या तरुणा समोर मांडने आवश्यक आहे
ReplyDeleteखूप छान सुधीरजी
ReplyDeleteअजूनही असे काही गुण समोर आणले तर उत्तम होईल, मार्गदर्शक ठरतील असे वाटते