छ. शिवराय आणि इंग्रजांचा दुभाषा
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाभिषेक ही केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक विलक्षण घटना होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा माणसांना गुलाम न करण्याविषयीचा आग्रह लक्षात घेतला तर ती एक वैश्विक पातळीवरील देखील महत्त्वाची घटना होती. हिंदवी स्वराज्याशी संबंधित महत्त्वाची मंडळी त्या प्रसंगाला उपस्थित होती. ते भाग्य त्या सर्वांना लाभले. याच भाग्याचा एक अवचित धनी ठरलेला भारतीय माणूस होता तो म्हणजे नारायण शेणवी! ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने व्यापार विषयक करार करण्यासाठी हेन्री ऑक्झिंडेन या प्रसंगापूर्वीच रायगडावर म्हणजेच पाचाड येथे १८ मे १६७४ ला दाखल झाला होता. महाराजांची आणि इतर मंत्रीगणाशी संवाद साधण्यासाठी दुभाषाची आवश्यकता होती. त्यामुळे नारायण शेणवी हा दुभाषा म्हणून उपस्थित होता. राजाभिषेकाची गडबड चालू असल्यामुळे व्यापार विषयक करार करणे लांबत गेले आणि या दोघांनाही रायगडावर राहणे क्रमप्राप्त प्राप्त झाले. या गडबडीतही २६ मे १६७४ ला महाराज आणि शंभूराजे यांची भेट या मंडळींना मिळाली. परंतु करार मात्र पूर्ण झाला नाही.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
शनिवार ६ जून १६७४ , ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५६६, या दिवशी पहाटे महाराजांना राजाभिषेक झाला. त्यानंतर सकाळी सात आठ च्या सुमाराला ही मंडळी महाराजांच्या दरबारात उपस्थित होती. कंपनीच्या वतीने त्यांनी महाराजांची भेट घेतली. महाराजांना मुजरा केला. महाराजांना हिऱ्याची अंगठी आणि अन्य भेट वस्तू दिल्या. ही अंगठी शेणवी याने हातात धरली होती. हेन्री ऑक्झिंडेन याने लिहिलेली डायरी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाठविलेली पत्रे यातून बराच तपशील मिळतो. त्यात दुभाषा म्हणून नाव येते ते नारायण शेणवी याचे.
त्यावेळचा प्रवास खडतर असे. मुंबईवरून बोटीने चौल येथे येणे. तेथून नौकेने अष्टमी या गावापर्यंत येणे. पालखी, घोडा अथवा चालत निजामपूर, पाचाडच्या माचीवर येणे. नंतर गडावर चढत जाणे. हा फार दमवणारा प्रवास होता. परंतु हा प्रवास अनेक वेळा नारायण शेणवी याला करावा लागला.
केवळ याच प्रसंगात नव्हे. तर पुढील साधारणपणे तीन-चार वर्षे ईस्ट इंडिया कंपनीच्या पत्रव्यवहारात नारायण शेणवी याचे नाव येते. कंपनीच्या वतीने वाटाघाटी करण्याचे कामदेखील काही प्रसंगी नारायण शेणवी याने केल्याचे उल्लेख आढळतात. महाराजांच्याकडून व्यापारविषयक सवलती मिळाव्यात, तसेच काही ठिकाणी हिंदवी स्वराज्याच्या सेनेने छापे घातले त्यामध्ये इंग्रजांच्या वखारीचे काही नुकसान झाले होते. त्याची भरपाई मिळावी याबाबतही बोलणी करण्यास नारायण शेणवी याचा सहभाग होता. महाराजांची भेट घेण्याचा प्रसंग नारायण शेणवी याला काही वेळा आला होता.
इंग्रजांचा धूर्तपणा ओळखलेला तत्कालीन भारतातील एकमेव महापुरुष म्हणजे शिवाजी महाराज! त्यामुळे वाटाघाटी, चर्चा या दीर्घकाळ म्हणजेच वर्षांनुवर्षे चालू होत्या. त्यामध्ये इंग्रजांना महाराजांकडून वारंवार आश्वासने दिली जात होती. परंतु बऱ्याच गोष्टींची पूर्तता करण्यात वेगवेगळे अडथळे येत होते. त्यामुळे या वाटाघाटीतून अपेक्षित परिणाम मिळत नाही असे कंपनीच्या संचालकांना वाटले. त्यामुळे त्यांनी नंतर नारायण शेणवी याचे काम कंटाळवाणे आहे, तसेच नारायण शेणवी याची पात्रता पुरेशी नसल्याने हिंदवी स्वराज्याच्या अधिकाऱ्यांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही अशा प्रकारचे मत सुरतेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचेदेखील आढळते. नारायण शेणवी कंपनीपेक्षा हिंदवी स्वराज्याचे हित जास्त पाहतो असेदेखील मत व्यक्त केल्याचे दिसते. परंतु मुंबईकर इंग्रजांचा मात्र नारायण शेणवीवर विश्वास असल्याचे दिसते.
त्यामुळे नंतर सुरतेच्या इंग्रजांनी आपला एक अधिकारी जॉन चाइल्ड याला वाटाघाटीसाठी पाठवले. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी हिंदवी स्वराज्याचा कारभार स्वीकारला. त्यांच्याशी १६८४ मध्ये वाटाघाटी करण्यासाठी हेन्री गॅरी आणि थॉमस विल्किन्स या वकीलांबरोबर जो दुभाषा उपस्थित होता त्याचे नाव राम शेणवी असे आढळते. हा राम नारायणचा नातेवाईक असू शकेल. परंतु नेमके नाते काय हे मात्र नमूद केल्याचे आढळत नाही.
अतिशय योगायोगाने नारायण शेणवी महाराजांच्या राजाभिषेक प्रसंगी उपस्थित होता. हे सगळे वाचल्यावर मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. नारायण शेणवी नेमका कुठे राहणारा होता? त्याने इंग्रजी भाषेचे शिक्षण कुठ घेतले? ईस्ट इंडिया कंपनीशी त्याचा संबंध कसा आला? महाराजांच्या बद्दल नारायण शेणवीने स्वतः काही लिहून ठेवले आहे का किंवा त्याच्या घरातील अथवा संपर्कातील मंडळींनी काही लिहून ठेवले आहे का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराजांच्या राजाभिषेकाचे महत्त्व नारायण शेणवी याला लक्षात आले होते का? असे आणखीनही काही प्रश्न आहेत. परंतु त्यांची उत्तरे मिळणे आता दुरापास्त होते. परंतु राजाभिषेक प्रसंगी उपस्थित राहण्याचे भाग्य नारायण शेणवी याला लाभले हे मात्र निश्चितपणे सांगता येते.
©सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची गरज नाही. )
जिज्ञासा वाढवणारा लेख आहे.
ReplyDeleteजिज्ञासा वाढवणारा लेख आहे .खूप छान
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteमाहितीपूर्ण आणि प्रेरणादायी लेखन आहे सर सुंदर
ReplyDeleteसर धन्यवाद
Deleteखूप छान माहिती..
ReplyDeleteधन्यवाद
Delete