छ. शिवराय : न्यायप्रियता
मध्ययुगीन काळात राज्यकारभार करणाऱ्या व्यक्तिकडे न्यायनिवाडा करण्याचेही काम असे. अनेकवेळा न्यायनिवाडा करताना त्यात भेदभाव झाल्याचीही उदाहरणे इतिहासात नोंदवलेली आढळतात. काही प्रसंगी न्यायदान करताना लहरीपणाचाही परिणाम झाल्याचे दिसून येते. राज्यकर्त्याचे न्यायदानाचे काम कसे चालले आहे यावर त्याच्या राज्यकारभाराचीही गुणवत्ता दिसून येते. याबाबत छ. शिवाजी महाराजांचे उदाहरण आदर्शवत असे आहे.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
छ. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची न्यायप्रिय वृत्ती! न्यायदान चोख करण्यासाठी त्यांच्या काळी वेगवेगळ्या पद्धती होत्या. त्यामधील एक म्हणजे दिव्य करणे. यामध्ये उकळत्या तेलातून काही वस्तू काढणे किंवा पाण्याखाली ठराविक काळ श्वास रोखून बसणे अशा पद्धती होत्या. शिवराय अशा काही दिव्य करण्याच्या प्रसंगी उपस्थित राहिल्याचे इतिहासात नोंदवले गेले आहे.
१६४२ मध्ये राजमाता जिजाऊ साहेबांच्याबरोबर बाल शिवराय पुण्यात आले. तेव्हा पुण्यात राहण्यासाठी वाडा बांधण्याचे काम सुरू होते. त्यामुळे ते खेड शिवापूर येथे राहिले होते. तेथील बापूजी मुदगल देशपांडे हे त्यांचे शेजारी होते. त्यांची चिमणाजी, नारो ही शिवरायांचे बाल सवंगडी होते. लाल महाल बांधून झाल्यावर शिवराय पुण्यात राहायला आले. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेऊन महाराज स्वराज्य विस्तार करू लागले.
इकडे नारो बापूजी हे भिकाजी रूद्र यांच्याबरोबर खेडचे देशपांडेपण चालवत होते. पुढे नारो बापूजी यांची वेगवेगळ्या पद्धतीने शिवरायांचे अधिकारी सोनोपंत डबीर, रघुनाथ कोरडे, मोरोपंत पिंगळे यांच्याशी नातेसंबंध आले. त्यांचे प्रस्थ वाढत गेले. तसे त्यांनी भिकाजी रूद्र याचे देशपांडेपणाचे अधिकार हिरावून घेतले. त्याचबरोबर शिवापूरचे कुलकर्णीपण सखो भिकाजीचा भाऊ नारो भिकाजी याच्याकडून काढून घेतले. याबाबत भिकाजी रूद्र याने तेथील देशमुखाकडे फिर्याद दिली. पण त्यांनी असमर्थता दाखवली. यातील वादी प्रतिवादी ही मंडळी एकमेकांच्या भावकीतीलच होती.
भिकाजी रूद्र याचा मुलगा सखो भिकाजी याने थेट शिवरायांकडे तक्रार केली. तेव्हा शिवरायांनी त्याला त्याची बाजू मांडायला सांगितले. त्याची बाजू ऐकून घेतल्यावर त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे असे शिवरायांना लक्षात आले. त्यांनी सखो भिकाजी याला स्थानिक वतनदाराच्या क्षेत्राबाहेर जाऊन दुसऱ्या क्षेत्रात फिर्यादीची चौकशी करायला सांगितले. पण नारो बापूजी याने ही चौकशी आपल्या क्षेत्रातच होण्याची खटपट केली. ही फिर्याद त्याच क्षेत्रात चालवली गेली. निकाल स्वाभाविकपणे सखो भिकाजीच्या विरूद्ध गेला.
निरूपाय होऊन सखो भिकाजी परत शिवरायांकडे गेला. त्याने सर्व हकीकत शिवरायांना सांगितली. शिवरायांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून सखो भिकाजी याला न्याय दिला. या प्रकरणी नारो बापूजीच्या भावाची सासू आबईबाई म्हणजे सोनोपंत डबीर यांची पत्नी हिने वतन आपल्या नातेवाईकाच्याच नावे यासाठी चुकीचे काम केले होते. सोनोपंत हे शिवरायांचे अधिकारी असल्याने ते करतील ही तिची अटकळ खोटी ठरली. शिवरायांनी याप्रकरणी सहभागी असलेल्यांना खडसावले. न्यायप्रिय शिवरायांनी व्यक्तिगत संबंधांचा न्यायदानावर परिणाम होऊ दिला नाही. यातून त्यांची न्यायप्रियता दिसून येते.
अशाच प्रकारे त्यांनी आपले मामा मोहिते यांच्याबाबतही न्यायकठोर भूमिका घेतली होती. त्या घटनेशी संबंधित व्यक्तिला न्याय मिळवून दिला होता.
शिवरायांच्या न्यायप्रियतेचे अशा अनेक प्रसंग इतिहासात नोंदवले गेले आहेत. शिवरायांनी राजाभिषेक झाल्यानंतर अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश हे पद निराजी रावजी यांना दिला. हिंदवी स्वराज्यातील न्यायदानाचे काम चोखपणे चालू राहील याकडे लक्ष दिले. या सर्व स्थितीमुळे प्रजेला हे रयतेचे राज्य असल्याचा अनुभव येत गेला. न्यायप्रिय, लोकोत्तर महापुरुष शिवरायांना मानाचा मुजरा!
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा,. न्यायप्रियतेचा सुंदर प्रसंग लेखणीत उतरवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteउत्तम लेख सुधीर जी
ReplyDeleteधन्यवाद सत्यजित
Deleteन्यायप्रिय वअचूक न्यायदान आसणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुणधर्माचे दर्शन या लेखनातून होते आहे सर .....खूप छान लेखन..🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
DeleteSir very nicely written
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
Delete