गाडी आणि गुलाब
( काल्पनिक कथा )
शेखर काम संपवून त्याच्या गाडीजवळ परत आला. त्याने गाडीकडे पाहिले आणि गाडीवर एक लाल गुलाबाचे फूल ठेवल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने इकडेतिकडे पाहिले पण आजूबाजूला कोणीही दिसले नाही. मग फार विचार न करता त्याने गाडी काढली आणि तो पुढच्या कामाला गेला. कामाच्या गडबडीत त्या फुलाचा विचार त्याच्या डोक्यातून निघून गेला.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
शेखरचा एक छोटा व्यवसाय होता. त्याच्या कामानिमित्ताने त्याला शहरात सगळीकडे जावे लागे. शहरातील वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन तो शक्यतो दुचाकीवरच सगळीकडे हिंडत असे. तसाच तो नेहमी एका गल्लीत जात असे. दर दोनचार दिवसांनी त्याला त्या गल्लीत जावे लागे.
हा प्रसंग घडला त्यानंतर पुन्हा चारपाच दिवसांनी शेखर त्या गल्लीत गेला. परत साधारण त्याच ठिकाणी त्याने गाडी लावली आणि कामासाठी तो गेला. काही वेळाने काम आटोपून तो परत आला तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण गाडीवर परत एक गुलाबाचे फूल ठेवलेले होते. फक्त एकच फरक होता तो म्हणजे गुलाबाचा रंग. तो मात्र पिवळा होता. आता मात्र यात काहीतरी संकेत असावा ही शक्यता शेखरच्या मनाला चाटून गेली. पण ती क्षणभरच! कारण त्याचे पुढचे अतिशय महत्त्वाचे आणि तातडीचे होते. त्यासाठी त्याला लगेच निघणे गरजेचे होते. त्यामुळे तो लगेच तिथून बाहेर पडला. त्या फुलाचा विचार त्याच्या मनात रेंगाळत राहिला पण त्याला पुढे फार विचार करायला सवड मिळाली नाही.
परत पाच सहा दिवसांनी शेखर त्या गल्लीत पोचला. गाडी लावतानाच त्याच्या मनात आता आज कुठले फूल पहायला मिळते असा विचार त्याच्या मनात आलाच. पण तो मागे सारून शेखर आपल्या कामाला गेला. काम संपवून परत येतो तर काय आजदेखील गाडीवर फूल ठेवलेले होते. फरक एवढाच होता की ते गुलाबाचे फूल नसून जरबेराचे होते. शेखर गाडीजवळ गेला. आज थोडी सवड होती. त्यामुळे दहा बारा मिनिटे तो तिथेच थांबला आणि आजूबाजूला निरखून पाहू लागला. पण कुणीही फार वेगळी हालचाल करत असल्याचे त्याला दिसले नाही. त्यामुळे शेवटी कंटाळून आणि पुढच्या कामाची वेळ झाली म्हणून तो तिथून निघाला. पण आता हे गाडीवर ठेवलेल्या फुलाचे काय कोडे आहे हे शोधून काढायचे हे त्याच्या मनात पक्के बसले.
तो घरी परतला. आता याचा छडा लावायचाच हा विचार त्याच्या मनात ठाण मांडून बसला. मग त्याने मनाशी विचार केला आणि पुढच्या खेपेला याचा छडा लावायची योजना त्याने तयार केली.
तीन चार दिवस गेले. ठरल्याप्रमाणे शेखर आजही त्या गल्लीत पोचला. नेहमीच्या ठिकाणी त्याने गाडी लावली. आज त्या गल्लीत त्याचे कोणतेही काम नव्हते. पण याचा तपास करायचा होता. गाडी नजरेच्या टप्प्यात राहील अशा अंतरावर तो जाऊन उभा राहिला. गाडीवरचे लक्ष त्याने अजिबात इकडेतिकडे जाऊ दिले नाही.
जवळपास अर्धा तास असाच गेला. काहीच घडले नाही. त्यामुळे आज काही समजणार नाही असा विचार शेखरच्या मनात येऊ लागला. आता इथून निघावे परत काही दिवसांनी प्रयत्न करावा असा विचार त्याच्या मनात जवळपास पक्का होत आला. पण तेवढ्यात एक माणूस त्याच्या गाडीजवळ उभा राहून काहीतरी करताना त्याला दिसला.
शेखर धावतच त्या माणसाजवळ गेला आणि " काय करताय?" असे थोड्या मोठ्या आवाजात विचारले. तो माणूसही गडबडला. शेखरने परत विचारल्यावर त्याने सांगितले, " इथे जवळच फुलांच्या दुकानात काम करतो. दुकानातली चांगली फुले संपली की उरलेली फुले टाकायला तो कचराकुंडीकडे जात असतो. पण ती थोडी लांब आहे. म्हणून अगदी थोडा वेळ इथं उभं राहतो. मग पुढे जातो." त्याचा खुलासा ऐकून शेखर मोठ्यामोठ्याने हसू लागला. त्याला सगळा उलगडा झाला होता. कचराकुंडीत टाकायला चालवलेल्या फुलांपैकी नेमकं एकच फूल त्याच्या गाडीवर पडत होतं. आपल्याला अडवून, दरडावून चौकशी करणारा हा माणूस एकदम खोखो कसा हसायला लागला हे कोडं न उलगलेला तो नोकर घाईघाईने कचराकुंडीकडे निघाला होता.
सुधीर गाडे पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
लेख अजिबात काल्पनिक वाटत नाही डोळ्यासमोर सगळ्या व्यक्तिरेखा उभे राहिल्या.
ReplyDelete🙏
धन्यवाद 🙏
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete