आचार्य अत्रे यांची शिक्षण क्षेत्रातील कामगिरी

       आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी कविता, नाटक, वक्तृत्व, चित्रपट, वृत्तपत्र, संसदीय लोकशाही अशा अनेक क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केली. त्याचबरोबर त्यांनी शिक्षण क्षेत्रातही महत्त्वाची कामगिरी केली आहे. 


        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

     अत्रे यांना वकील व्हायचे होते पण वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ते शिक्षण क्षेत्रात आले. १९१९ मध्ये बी.ए. झाल्यावर त्यांचे वडील अचानक मरण पावले. तेव्हा मुंबईत जाऊन नोकरी करत करत वकील व्हायचे असे ठरवून ते मुंबईला आले. 

    मुंबईत त्यांनी सॅंडहर्स्ट हायस्कूल, रॉबर्ट मनी हायस्कूल , न्यू हायस्कूल ( भर्डा हायस्कूल ) अशा तीन शाळांमध्ये जवळपास दोन अडीच वर्षे काम केले. त्यातील न्यू हायस्कूलमध्ये शिक्षण क्षेत्रातील नवनवीन कल्पनांचा त्यांना अनुभव मिळाला. ते उत्साहाने वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होत असत. 

      मुंबईची हवा मानवली नाही. प्रकृती खूप खराब झाली म्हणून ते मुंबई सोडून परत पुण्याला आले. काही महिने अहिल्यानगर येथे विश्रांती व उपचार घेऊन परत पुण्याला आले. एका परिचितांच्या मदतीने ते कॅंप एज्युकेशन सोसायटीच्या त्या वेळच्या संचालकांना भेटले आणि त्यांना १९२२ मध्ये त्या संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरी मिळाली. त्यावेळी ते जेमतेम चोवीस वर्षांचे होते. पगारही मुंबईच्या तुलनेत खूप कमी ठरला. पण नोकरीची खूपच गरज असल्याने त्यांनी ही नोकरी स्वीकारली. त्यामागे आणखी एक विचार होता तो म्हणजे या शाळेत आपल्याला अधिकार मिळेल आणि नवनवीन काही करून दाखवता येईल. " बडोदा संस्थानचा दिवाण होण्यापेक्षा भोरच्या संस्थानाचे अधिपती झालेले अधिक चांगले" अशा शब्दांत त्यांनी याबाबत स्वतःच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

कॅंप एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले त्यावेळी त्या शाळेत अतिशय अनागोंदीची परिस्थिती होती. पण अत्रेंनी कडक शिस्तीची भूमिका घेऊन हळूहळू शाळेतील वातावरण बदलून टाकले. त्याचबरोबर मुंबईतील न्यू हायस्कूलमध्ये शिकलेले शिक्षणातील प्रयोग उत्साहाने राबवायला सुरुवात केली. या सगळ्याचा परिणाम म्हणून शाळेची विद्यार्थी संख्या वाढत गेली. शाळेचे नाव सगळीकडे होऊ लागले.

       कृष्णराव पुंडलिक शाळा तपासनीसांनी मुख्याध्यापक अत्रेंच्या उपक्रमशीलतेचे खूप कौतुक केले पण 'त्यांनी शिक्षण शास्त्राचे औपचारिक शिक्षण घेतले पाहिजे' असा शेरा दिला. त्यामुळे अत्रे शिक्षणशास्त्र शिकण्याच्या खटपटीला लागले. त्यातून मुंबईत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला. तिथे पद्धतशीर रीतीने अभ्यास करून ते परीक्षेत पहिले आले. त्यातून त्यांचा आत्मविश्वास दुणावला. तसेच परीक्षेतील यशामुळे त्यांचे नाव शिक्षण क्षेत्रात सगळीकडे झाले.

      वाढलेल्या आत्मविश्वासाने ते पुन्हा पुण्यात आले. नव्या उत्साहाने कामाला लागले. विद्यार्थी हिताचे नवनवीन प्रयोग त्यांनी सुरू केले. हे करत असतानाच त्यांच्या गुणवत्तेमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मंडळावर काम करण्याची संधी मिळाली. त्याकाळी हायस्कूल हे विद्यापीठाला जोडलेले असे हे लक्षात घेतले पाहिजे. यातून ते सर्व महाराष्ट्रात शिक्षणविषयक व्याख्याने देण्यासाठी फिरू लागले‌. त्याचबरोबर शिक्षकांनी शिक्षक पात्रतेच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावे यासाठी नि:शुल्क मार्गदर्शन करू लागले. 

     याच दरम्यान कॅंप एज्युकेशन सोसायटीच्या संचालकांची निष्क्रियता आणि अहंकारी वृत्ती यांना कंटाळून त्यांनी पद्धतशीर प्रयत्न करून संस्था ताब्यात घेतली. संस्थेचे अजून एक हायस्कूल ( राजा धनराज गिरजी हायस्कूल) रास्ता पेठ येथे सुरू केले. 

    शिक्षण क्षेत्रात मिळालेले यश आणि नावलौकिक यामुळे अत्रे यांची महत्त्वाकांक्षा अजून वाढली. शिक्षणशास्त्र शिकण्यासाठी लंडनला जाण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यात यशही मिळाले. पण लंडनला जाण्याचा खर्च त्यांच्या कुवतीबाहेरचा होता. अनेकांकडून पैसे उसने अथवा कर्जाऊ घेऊन जेमतेम तिथे जाणे व राहणे यासाठी पुरतील एवढेच पैसे जमले. येतानाच्या पैशाची काहीतरी सोय होईल असा विचार करून ते लंडनला पोचले. तिथल्या शिक्षणाने ते अधिक प्रगल्भ झाले. तिथेही त्यांनी चांगली कामगिरी केली. 

      लंडनचे शिक्षण पूर्ण करून आल्यावर ते अधिक उत्साहाने कामाला लागले‌. आता त्यांना शिक्षणातील आंतरराष्ट्रीय प्रवाहांचे ज्ञान मिळाले होते. त्याचा वापर त्यांनी विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शनासाठी केला.

      हे करत असतानाच त्यांनी पुणे शहरात सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचे स्मारक असावे असा विचार केला. त्यासाठी खटपट केली. त्यातून त्यांनी १९३४ मध्ये नवीन शिक्षण संस्था सुरू केली. त्या संस्थेच्या वतीने आगरकर गर्ल्स हायस्कूल ही शाळा सुरू केली.

      शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच विडंबनकार, नाटककार, वक्ते अशी त्यांची ख्याती वाढत चालली होती. त्यातून त्यांना त्यावेळच्या पुणे मुन्सिपालिटीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली. आता राजकीय क्षेत्रात प्रवेश करायचा हा निर्णय त्यांनी केला. तसेच त्यावेळचे संस्थाचालक यांच्याकडून आपल्याला अपेक्षित सहकार्य मिळत नाही हे लक्षात घेऊन त्यांनी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला. 

       आचार्य अत्रे यांनी शिक्षण क्षेत्रात असताना पाठ्यपुस्तकांच्या दर्जावर कठोर टीका केला. ही पाठ्यपुस्तके काही दशके बदलली गेली नव्हती. तसेच ती बोजड भाषेत होती. या टीकेमुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या नाराजीचा त्यांना सामना करावा लागला. अत्रे फक्त टीका करून थांबले नाहीत तर विद्यार्थ्यांसाठी वाचनमाला लिहायची संधी आली तेव्हा त्यांनी ग.ह.पाटील,‌ विठ्ठलराव घाटे अशा अन्य तज्ञांना बरोबर घेऊन वाचनमाला एकाच वेळी मराठी आणि गुजराथी भाषेत तयार केली. ती त्या काळात अतिशय लोकप्रिय झाली . 

     अन्य क्षेत्रातील कामगिरीबरोबरच अत्रे यांनी शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे.

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

  1. आचार्य अत्रे यांच्या आयुष्याची माहिती मोचक्या शब्दात उत्तमरीत्या मांडणी केली सर🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

समासाच्या निमित्ताने...