आचार्य अत्रे यांनी लिहिलेले शिक्षण क्षेत्रातील गमतीदार अनुभव

        आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जवळपास वीस वर्षे काम केले या काळातील अनेक गमतीदार अनुभव त्यांनी लिहिले आहेत. 


       ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार  )

       १९२२ मध्ये अत्रे यांनी कॅम्प एज्युकेशन  सोसायटीच्या हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली आणि त्यांनी त्या शाळेत बदल करण्यासाठी खटपट सुरू केली. या शाळेत एक कारकून होते. ते काही वर्गांना शिकवण्याचे कामदेखील करायचे. अत्रे यांची खटपट बघून त्यांनीदेखील त्याला साथ दिली आणि काही मुलांची आडनावे बदलली. तेली या आडनावाचे केले ऑइलमॅन , सोनारचे केले गोल्डमॅन आणि न्हावी या आडनावाचे केले बार्बर. ते कारकून अभिमानाने अत्रे यांना आपण केलेले बदल सांगू लागले. त्यावेळी अत्रे यांनी कपाळावर हातच मारून घेतला असेल. त्यांना समजावून विशेषनामांचे असे भाषांतर करू नये हे सांगितले.

      शिक्षण शास्त्रातील पदवी घेण्यासाठी अत्रे यांनी मुंबईच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यासोबत अनेक शिक्षक सरकारी अधिकारी हे सहाध्यायी म्हणून होते. त्यावेळचे काही गमतीदार प्रसंग.  या शिक्षकांना तयारी करून पाठ  घ्यावा लागे त्यातील एका शिक्षकाला पाठ घेण्याचा आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे सहाध्यायींसमोर पाठ घ्यायचा असे ठरले. विषय खेळाशी संबंधित होता. त्या शिक्षकांनी आपल्या सहाध्यायींसमोर बोलायला सुरुवात केली. दोन हातात दोन फुटबॉल घेऊन त्यांनी सुरुवात केली , "आय हॅव टू कॉपीज ऑफ फुटबॉल." हे वाक्य ऐकल्यानंतर हास्याचा कल्लोळ झाला.

             अन्य काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांपुढे शिकवताना वेगळीच गंमत केली.‌ एकाने सुरुवात केली, " मी म्हणालो पेढा. तर पुढे काय?" याला वेगवेगळी उत्तरे मिळाली. गोड असतो, आवडतो इत्यादी. पण त्या शिक्षकाला पेढा 'हवा' असे उत्तर अपेक्षित होते कारण 'हवा' या विषयावर त्यांचा पाठ होता. विषयाची सुरुवात करण्याची ही पद्धत वेगळीच होती. आणखी एका शिक्षकाने विचारले, " वर्गात कुणाकुणाचे वडील मरण पावले आहेत?" एक दोघांनी हात वर केले. वडील मरण पावल्यावर काय करतात असे त्यांनी विचारले ? त्यावेळी सुतक पाळतात, केस कापतात , ही उत्तरे मिळाली. " एका वर्षानंतर काय करतात ?" असे विचारले तर, " वर्ष श्राद्ध करतात." असे उत्तर आल्यावर ते म्हणाले, " आपल्यासारखेच चिनी लोकदेखील पूर्वजांचे स्मरण करतात. ते  ते लोक ज्या देशात राहतात त्या चीनचा भूगोलआपण अभ्यासणार आहोत. अत्रे त्यांना म्हणाले, " चीनचा भूगोल शिकवण्यासाठी कोणाचे वडील गेले आहेत हे विचारणे म्हणजे कमालच आहे."

       एका शिक्षकाला वकील याविषयी पाठ घ्यायचा होता. ते अंगात कोट, हातात बॅग अशा पद्धतीने तयार होऊन आले. त्यांनी विचारले , "मी कोणआहे ?" त्यांना अपेक्षित उत्तर 'वकील' हे होते. पण एका विद्यार्थ्यांनी उत्तर दिले, " यू आर अ बार्बर." आणि वर्गात हास्यकल्लोळ उडाला.

      शिक्षण क्षेत्रामध्ये त्यावेळी 'डायरेक्ट मेथडचा' उपयोग सुरू झाला होता. एका शिक्षकाला 'स्लीपिंग' हे क्रियापद शिकवायचे होते. तो चक्क वर्गात गादी घेऊन आला आणि त्याच्यावर झोपून त्याने विचारले, " व्हॉट ॲम आय डूईंग?" सर्वजण ओरडले, " यू आर स्लीपिंग." मग आळीपाळीने वर्गातील प्रत्येक मुलाला त्या गादीवर झोपवून तो काय करतो हे विचारले.  प्रत्येक वेळी 'स्लीपिंग' ही क्रियापद घटवून घेतले. पाठ निरीक्षण करण्यासाठी ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य हॅम्ले उपस्थित होते. त्यांना या शिक्षकांनी पाठ कसा झाला हे विचारले. त्यावेळी हॅम्ले यांनी उत्तर दिले , "आय वॉज स्लीपिंग!"

        मुंबई ट्रेनिंग कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर आचार्य अत्रे यांनी शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. भूगोल आणि इंग्लिश हे त्यांचे अध्यापनाचे विषय होते. प्रत्येक विषयाचे काही आदर्श पाठ त्यांनी तयार करून घेतले होते . त्यावेळी इंग्लिश पुस्तकामध्ये 'सिक्स ब्लाइंड मेन अँड एलिफंट' हा पाठ होता. त्याचा आदर्श पाठ अत्रे यांनी चांगल्या पद्धतीने तयार करून घेतला होता. अत्रे यांचे ट्रेनिंग कॉलेजमधील यश लक्षात घेऊन त्यावेळच्या शिक्षण खात्याने शिक्षकांचे पाठ निरीक्षण करण्यासाठी तत्कालीन डेप्युटी (त्या वेळच्या भाषेतली दिपोटी म्हणजे निरीक्षक) यांच्याबरोबर जाण्याची अत्रे यांना सूचना केली. त्याप्रमाणे एक अधिकारी श्री .के.जी. जोशी यांच्याबरोबर अत्रे पाठ निरीक्षणासाठी गेले. सुरुवातीला भावे हायस्कूलमधील पाठ पाहिला. तो 'सिक्स ब्लाइंड मेन ॲंड एलिफंट' हा होता. पाट बघून जोशी आनंदित झाले. त्यांनी अनुकूल शेरा दिला. तिथून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेले. तिथल्या शिक्षकाने हाच पाठ तयार केला होता. योगायोग असेल म्हणून जोशी यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. परत नूतन मराठी विद्यालयातही तोच पाठ. शेवटी अत्रे ज्या शाळेत शिकवीत होते त्या शाळेत हे दोघे पोहोचले. वर्गात जाण्यापूर्वी जोशी यांनी अत्रे यांना विचारले, " शिक्षक कोणता पाठ दाखवणार आहेत?" अत्रे यांनी, " माहीत नाही. बघूयात." असे उत्तर दिले. आत गेल्यावर जसे शिक्षकाने 'सिक्स ब्लाइंड मॅन अँड एलिफंट' यासाठी आकृती फळ्यावर काढलेली बघितली तसे जोशी खूपच रागावले आणि शिक्षकाची खरडपट्टी काढून बाहेर पडले. बिचार्‍या शिक्षकाला आपली काय चूक झाली हे त्यावेळी समजलेच नाही.

     पुढे अत्रे लंडनला शिकायला गेल्यानंतर ते माध्यमिक शाळेत शिकवित असूनदेखील पाठ घेण्यासाठी सुरुवातीला त्यांची योजना एका प्राथमिक शाळेत केली होती. त्यांच्यासोबत असणारे दुसरे भारतीय शिक्षकदेखील अत्रे यांच्यासारखेच उंचेपुरे होते. या शाळेत गेल्यावर त्या शाळेचे मुख्याध्यापक अत्रे यांना म्हणाले, " भारतात एवढी उंच माणसे असतील असे मला वाटले नव्हते." हजरजबाबी अत्रे पटकन उत्तरले, " अहो भारतात तर आम्हाला कमी उंचीचे समजतात." आपल्यावर करण्यात आलेल्या शेरेबाजीचा अत्रे यांनी तिथल्या तिथे समाचार घेतला.

        असे हे अत्रे यांनी सांगितलेले काही प्रसंग. ते हसवतात आणि विचार करायला देखील भाग पाडतात.


सुधीर गाडे पुणे 


( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)



Comments

  1. मनोरंजक पण तितकाच वास्तवादी लेख... सुंदर लेखन केले सर🙏

    ReplyDelete
  2. आचार्य अत्रे यांचे शिक्षण क्षेत्रातील अनुभव गमतीदार पण खूपच विचार करायला भाग पाडणारे आहेत....सर सुंदर लेखन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

समासाच्या निमित्ताने...