छ. शिवराय : चौकस वृत्ती

     जगात सर्वात जुनी संस्कृती असलेला आणि ऐतिहासिक काळाच्या सुरुवातीला ( सन १ पासून किंवा त्याच्या आधीपासून) संपन्न असा भारत देश होता. पण नंतरच्या काळात भारताचे पतन का झाले याची वेगवेगळी कारणे वेगवेगळ्या व्यक्तींनी दिली आहेत. ही सर्व कारणे खरोखर विचार करायला लावणारी आहेत. त्यातील स्वामी विवेकानंदांनी एक निराळेच कारण दिले आहे. " जगावाचून आपले काही अडणार नाही या वृत्तीमुळे भारत स्वतःतच गुंतून राहिला. बाहेर काय चालले आहे इकडे भारतीयांनी लक्ष दिले नाही . त्यामुळे भारताचे पतन झाले." असे स्वामीजींनी म्हटले आहे. अशाच प्रकारची नोंद छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक प्रसंगी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेल्या हेन्री ऑक्झिंडेन याने केली आहे. त्याने ३० मे १६७४ ला जे पत्र कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाठवले आहे त्यात  इंग्लिश आरमाराने डच आरमारावर विजय मिळवला ह्या बातमीबाबत तो लिहितो , "  परदेशातील राजकारणाकडे लक्ष देणारे किंवा परदेशी राजांच्या उदयास्ताचा विचार करणारे जर कोणी या प्रांतात असते तर ही आनंदाची बातमी प्रसिद्ध केली असती परंतु परदेशातील यशापयशाची त्यांना पर्वा नसल्यामुळे आपण स्वतःच या साऱ्याचा आनंद मानून राहणे भाग आहे." स्वामी विवेकानंद आणि हेन्री ऑक्झिंडेन या दोघांच्या निरीक्षणातले साम्य आपल्याला चकित करते.


( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

        या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची चौकस वृत्ती ही विलक्षण वाटते १६४९ मध्ये महाराजांनी कोकणामध्ये पहिल्यांदा जाऊन तेथील बंदरे, तेथे चालणारा आंतरराष्ट्रीय व्यापार, त्यातून मिळणारे उत्पन्न या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली. नंतरच्या काळात कोकणावरती प्रभुत्व मिळवले. परंतु याची सुरुवात त्यांच्या चौकशीतून झाली आहे. 

       सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग यांच्याशी तहाचे बोलणे करण्यासाठी शिवराय त्यांच्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या छावणीत दाखल झाले. मिर्झा राजांना भेटण्यासाठी त्यांच्या शामियान्यात गेले. त्यावेळी त्या ठिकाणी एक युरोपियन माणूस बसला होता. निकोलाय मनुची असे त्याचे नाव महाराजांनी आपल्या चर्चेदरम्यान, " हे कोण आहेत?" अशी विचारणा जयसिंगाकडे केली. ते युरोपियन आहेत असे म्हटल्यानंतर मनुचीशी शिवरायांनी संवाद साधला. युरोपामध्ये सध्या कोणते राजे आहेत? त्यांचे सामर्थ्य किती? वैशिष्ट्ये काय? याबद्दलची माहिती महाराजांनी मनुचीकडून घेतली. जयसिंगाबरोबर दीर्घकाळ राहून देखील जयसिंगाने अशी काही चौकशी केली होती की नाही याचा उल्लेख इतिहासात सापडत नाही. परंतु शिवरायांनी चौकस वृत्तीने या प्रकारची विचारणा केली.

         

      महाराजांची ही चौकस वृत्ती त्यांच्या मंत्री गणातदेखील असल्याचे दिसते. इंग्रजी अधिकारी टॉमस निकल्स मे जून १६७३ मध्ये रायगडावर भेट देण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याची भेट प्रल्हाद निराजी यांच्याशी झाली. या भेटीत निराजी यांनी इंग्रजांचा राजा, त्याचे सामर्थ्य याबद्दल चौकशी केली अशी नोंद निकल्सने केली आहे. अर्थात निकल्सने मी ,"समोरच्या झाडाची पाने किती हे जसे सांगता येणार नाही तसेच इंग्लंडच्या राजाचे सैन्य किती हेदेखील सांगता येणार नाही. " असे सांगितले हीदेखील नोंद केली आहे. यातून निकल्सचा धूर्तपणादेखील लक्षात येतो तसेच निराजी यांची चौकस वृत्तीदेखील समजते.

     इंग्रजांच्या बरोबर व्यापारी करारांबाबत बोलणे चालू असताना इंग्रजांची नाणी अतिशय सुबक असल्याचे महाराजांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी त्या इंग्रजाला आपल्या चाकरीत येऊन नाणी बनवण्याचा प्रस्ताव दिला. पण त्याने तो नाकारला आणि नाणी पुरवठा करण्याचे काम द्या असे सांगितले. असे काम देण्याचे महाराजांनी नाकारले. मग महाराजांनी  नाणी इंग्रज किती वर्षांपासून पाडत आहेत याची चौकशी केली. त्यावेळी जवळपास सव्वाशे वर्षांपासून ते नाणी पाडत असल्याची माहिती महाराजांना मिळाली. त्यावर महाराज उद्गारले, " सव्वाशे वर्षांनी माझी माणसे देखील अशीच नाणी तयार करतील." या प्रसंगी महाराजांची चौकस वृत्ती आणि आपल्या माणसांवरचा विश्वास दिसून येतो. 

      २० एप्रिल १६७५ मध्ये महाराज राजापूरला आले. तेथे महाराजांना भेटण्यासाठी काही इंग्रज गावाबाहेर एका झाडाखाली तंबू टाकून थांबले होते. त्यांनी त्यावेळच्या इंग्रजांच्या पद्धतीनुसार डोक्यावर पेरीविग घातला होता. महाराजांनी त्यांना जवळ बोलावले. त्या पेरीविगबाबत चौकशी केली. हा का घालतात? सर्वजण घालतात का? अशासारखे काही प्रश्न महाराजांनी विचारले असावेत. यातूनही त्यांची उत्सुकता दिसून येते.

       महाराजांचा हा चौकसपणा त्याकाळच्या आत्ममग्न वृत्तीच्या पार्श्वभूमीवर लखलखीतपणे उठून दिसतो. स्वाभाविकपणे आपणही छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नम्र होतो.

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )



Comments

  1. चौकस वृत्ती ही कुठल्याही क्षेत्रांमध्ये यशस्वी होण्यासाठी गुरुकिल्ली आहे सुंदर लेखन केले सर🙏

    ReplyDelete
  2. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🙏🙏

    ReplyDelete
  3. उत्सुकता , चौकस वृत्ती आणि विश्वास हे ठळक वैशिष्ट्ये किती महत्त्वाचे आहेत या लेखात सर तूम्ही मांडले आहेत सुंदर लेखन सर....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

समासाच्या निमित्ताने...