आचार्य अत्रे यांचा विद्यार्थी दशेतील खोडकरपणा
आचार्य अत्रे हे लहानपणापासूनच खोडकर वृत्तीचे होते. आपल्या शालेय आयुष्यातील खोडकरपणाचे काही प्रसंग त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवले आहेत.
त्यांचे वडील केशवराव अत्रे काही काळ सासवड मुन्सिपलिटीमध्ये नोकरी करत होते. त्यांना बिडी ओढण्याची सवय होती. त्यांचे एक मित्र नेहमी घरी येत आणि दोघे मिळून बिड्या ओढत असत. अत्रे यांनी एके दिवशी बिडीच्या बंडलांमधील काही बिड्या काढून त्यात फटाक्यांतील दारू भरली आणि त्या पुन्हा बंडलामध्ये ठेवून दिल्या. त्यांचे वडील आणि मित्र बिड्या ओढू लागल्यानंतर साहजिकच त्याचा स्फोट झाला. नंतर अर्थातच अत्रे यांना भरपूर मार मिळाला.
अत्रे मराठी शाळा शाळेतील म्हणजे आजच्या भाषेतील चौथीचे शिक्षण पूर्ण करून इंग्रजी पहिलीत दाखल झाले. आपल्याला खूप इंग्रजी यायला लागले असा त्यांना फाजील आत्मविश्वास वाटू लागला. ते शिकलेल्या मराठी शाळेत एक दिवशी इंग्रजी अधिकारी येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी तयार केलेल्या बॅनरमध्ये Welcome असे लिहिले होते. त्यामध्ये एक L कमी असून ते Well Come असे लिहिले पाहिजे असे अत्रे यांनी मुख्याध्यापकांना पटवून दिले. त्यांनी देखील तशी दुरुस्ती करायला घेतली. पण योगायोगाने इंग्रजी शाळेतील एक शिक्षक तेथे आल्याने संभाव्य नाचक्की टळली.
त्या काळात प्लेगची साथ येत असे. अशी साथ आली की शाळेला सुट्टी मिळत असे. एके वर्षी अशीच साथ आली. परंतु मुख्याध्यापकांनी ठरवले की जोपर्यंत शाळेत उंदीर मरून पडल्याचे दिसत नाही तोपर्यंत शाळेला सुट्टी द्यायची नाही. हे समजताच अत्रे यांनी आपल्या एका मित्राला बरोबर घेऊन घरी म्युन्सिपालिटीचा उंदीर पकडण्याचा पिंजरा होता तो एके ठिकाणी लावून उंदीर पकडला. त्यांच्या मित्राने त्या उंदराला नदीच्या पाण्यात बुडवून मारले. रविवारी साळसूदपणे शाळेत जादा अभ्यास करायचा आहे असे सांगून दोघेही शाळेत गेले. मेलेला उंदीर गपचूप एके ठिकाणी टाकून दिला. दोन-तीन दिवसांनी तो कुजल्यानंतर वास सुटला आणि उंदीर मेल्याचे आढळून आल्यानंतर शाळेला सुट्टी मिळाली.
आचार्य अत्रे इयत्ता चौथी ज्या वर्षी उत्तीर्ण झाले त्याच वर्षी म.ए.सो.ची इंग्रजी शाळा सासवड मध्ये सुरू झाली. अत्रे इंग्रजी पहिलीसाठी म.ए.सो.च्या शाळेत दाखल झाले. तिथे झांबरे नावाचे मुख्याध्यापक होते. ते गणित विषय शिकवत असत. स्वभावाने ते अतिशय रागीट होते. एके दिवशी अत्रे त्यांच्या मित्रमंडळींसोबत गावाबाहेरच्या आमराईत फिरायला गेले असताना योगायोगाने झांबरे गुरुजीदेखील तेथे आले. झांबरे गुरुजींनी नेहमी घालत असलेला कोट त्यांनी एका फांदीवर टांगून ठेवला. परीक्षा जवळच आली होती. त्यांच्या कोटाच्या खिशात गणिताची प्रश्नपत्रिका असेल असा अंदाज बांधून अत्रे आणि त्यांच्या मित्रांनी गुपचूप खिसे तपासले. योगायोगाने त्यांना ती प्रश्नपत्रिका सापडली. लगेच सर्वांनी ती प्रश्नपत्रिका उतरवून घेतली. त्या प्रश्नांचा चांगला सराव केला. नंतर झालेल्या परीक्षेत हे सर्व मित्र गणित विषयात भरपूर गुणांनी कसे उत्तीर्ण झाले याचे कोडे मात्र झांबरे गुरुजींना उलगडले नाही.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
मॅट्रिक म्हणजे त्यावेळची अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर अत्रे यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. अत्रे डिसेंबर मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावर्षी जून पासून बीए चे वर्ग सुरू होतील असे ठरले. त्यामुळे सहा महिने या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जात असत. महाविद्यालयाच्या ॲंफी थिएटरमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने होत असत. प्रा.वासुदेवराव पटवर्धन हे प्राध्यापक संतापी तसेच विनोदी होते. एके दिवशी अत्रे यांनी शेवरी वनस्पतींच्या पांढऱ्या म्हाताऱ्या गोळा करून पटवर्धन सरांचे व्याख्यान सुरू व्हायच्या आधी बाल्कनीतून सोडून दिल्या. सर्व म्हाताऱ्या ॲंफी थिएटरमध्ये तरंगू लागल्या. विद्यार्थ्यांचा एकच हशा उसळला. थोड्या वेळाने तो हशा शांत झाल्यावर पटवर्धन सर म्हणाले, " यंग मेन लाइक शुड हॅव नथिंग डू विथ ओल्ड लेडीज." असे म्हटल्यानंतर अत्रे आणि सर्वजण पोट धरून हसले.
अत्रे यांचे सहाध्यायी केशवाचार्य गजेंद्रगडकर हे वर्गात गजरचे घड्याळ घेऊन येत आणि बाकाखाली ठेवत. प्रा. द्रविड यांचा इंग्रजीचा तास अत्रे यांना कंटाळवाणा वाटत असे. एके दिवशी अत्रे यांनी द्रविड यांचा तास चालू असताना गजेंद्रगडकर यांचे घड्याळ गुपचुपपणे उचलून पंधरा मिनिटांनंतरचा गजर लावून परत जागेवर ठेवले. पंधरा मिनिटांनी गजर वाजू लागला तसा वर्ग हादरून गेला. द्रविड सर रागावून तास सोडून गेले. त्या दिवसापासून गजेंद्रगडकर यांनी वर्गात घड्याळ आणायचे बंद केले.
प्रा. कृष्णाजी खाड्ये हेदेखील इंग्रजीचे प्राध्यापक होते. ते विनोदी व खेळकर वृत्तीचे होते. एकदा बैलपोळ्याच्या दिवशी ते वर्गात येण्याआधी अत्रे यांनी मातीचा बैल करून त्याला बेगड चिकटवून टेबलवर ठेवला. खाड्ये सर वर्गात आले. त्यांनी बैल पाहिला तेव्हा हशा पिकला. खाड्ये सर म्हणाले, " अरे आज तुम्हा लोकांचा सण आहे हे मी विसरलोच." पुन्हा हशा पिकला. पण अत्रे यांना वरमल्यासारखे झाले.
अत्रे यांच्या अशा खोडकर स्वभावातूनच झेंडूची फुले हे विडंबन काव्य विनोदी साहित्य निर्माण झाले हे आपल्याला लक्षात येते.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
आचार्य अत्रेंचा हा पेहलू लेखातून उतरवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
ReplyDeleteसर नमस्कार 🙏🙏
Delete