छ. शिवराय आणि पाश्चात्य योद्धे
चैत्र पौर्णिमा शके १६०२ रौद्र नाम संवत्सर म्हणजेच ३ एप्रिल १६८० या दिवशी छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला. एक अलौकिक महापुरुष पंचतत्वात विलीन झाला. हिंदवी स्वराज्यावर दुःखाची अतीव छाया पडली. या महापुरुषाचे वेगवेगळे गुण सर्वकालिक आदर्श आहेत. त्यातील त्यांचा युद्ध कौशल्याचा गुण देखील निर्विवाद आहे.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
छत्रपती शिवरायांचा पराक्रम अतिशय जबरदस्त होता. त्यांच्या तलवारीच्या धाकामुळे शत्रूच्या हृदयात धडकी बसत असे. कविराज भूषणाने तर अशी कल्पना मांडली की 'शंकराचे गण, भूत, पिशाच्च हे एकमेकांशी आनंदाने संवाद करीत निघाले आहेत. या आनंदाचे कारण असे की शिवरायांनी कोणातरी शत्रूवर चाल केली आहे. तिथे शिवरायांच्या पराक्रमामुळे प्रेतांचा खच पडेल आणि तो आपल्याला उपयोगी पडेल म्हणून हे सर्वजण आनंदित आहेत.
शिवरायांच्या जन्मापूर्वीच पाश्चात्य देशांनी भारतावर वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण करायला सुरुवात केली होती. काही देशांनी व्यापारी म्हणून भारतात बस्तान बसवले होते. या सर्वांच्या व्यापाराच्या निमित्ताने होणाऱ्या पत्रव्यवहारात साहजिकपणे तत्कालीन राज्यकर्ते यांचे उल्लेख येत. वेगवेगळ्या घडामोडी सांगितलेल्या असत.
शिवरायांच्या पराक्रमामुळे त्यांची कीर्ती दिवसेंदिवस वाढत गेली. जसजसा हिंदवी स्वराज्याचा विस्तार होत गेला तसतसे या युरोपियन व्यापाऱ्यांना शिवरायांची दखल घेणे भाग पडले. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या पत्रामध्ये शिवरायांचे उल्लेख येऊ लागले. या उल्लेखांमध्ये तत्कालीन युरोपियन व्यापाऱ्यांनी
शिवरायांची तुलना करताना वेगवेगळ्या पाश्चात्य योद्धांचा उल्लेख केला आहे. यामध्ये अलेक्झांडर, हॅनिबल , ज्युलियस सीझर,क्विंटस् सर्टोरियस, अटिला, गुस्ताव ॲडोल्फस अशा वेगवेगळ्या राजांचा,वीरांचा समावेश आहे. एका अर्थाने शिवरायांची या योद्ध्यांशी तुलना केली आहे.
यातील अलेक्झांडर राजा फिलीप यांचा युवराज. सन पूर्व चौथ्या शतकात त्यांच्या मृत्यूनंतर तो राज्यावर आला. त्याने तत्कालीन सर्व युरोप जिंकून भारताच्या सीमावरती प्रांतापर्यंत धडक मारल्याचे सांगितले जाते. परंतु तिथून त्याला माघारी जावे लागले आणि स्वतःच्या देशात न पोचताच त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू विषप्रयोगाने किंवा विषारी बाणाचे विष अंगात भिनल्याने झाला असे सांगितले जाते. अलेक्झांडरची उर्वरित भारत जिंकण्याची इच्छा होती परंतु त्याच्या सैनिकांनी साथ दिल्याचे नाकारले. त्यामुळे त्याला परत फिरावे लागले असे एक कारण सांगितले जाते.
हॅनिबल हा सन पूर्व तिसऱ्या शतकात असलेल्या कार्थेजियन साम्राज्याचा शूर सेनापती होता. त्यांनी आपल्या पराक्रमाने रोमन साम्राज्याच्या विस्ताराला आळा घालण्याचा काही काळ यशस्वी प्रयत्न केला. परंतु तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याला दुसऱ्या देशात परागंदा व्हावे लागले. त्या ठिकाणी देखील रोमनांनी परत हल्ला केल्यामुळे त्याने विषप्राशन करून मृत्यू पत्करला असे सांगितले जाते.
सन पूर्व पहिल्या शतकात ज्युलियस सीझर हा प्रजासत्ताक रोमन साम्राज्याचा सेनापती होता. स्वतःच्या कर्तृत्वाने त्याने युरोपचा सर्व भूभाग जिंकला. रोमन साम्राज्याच्या संसदेमधील गोंधळाची स्थिती पाहून त्याने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. परंतु नंतर त्याला सर्व सिनेटर सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आणि दरबारातच त्याचा खून करण्यात आला. या कटामध्ये त्याचा मित्र ब्रूटस हा देखील सहभागी होता.
क्विंटस् सर्टोरियस हादेखील सन पूर्व पहिल्या शतकात जर्मन रोमन साम्राज्याचा सेनापती होता त्याने स्वतःच्या सामर्थ्याने पुष्कळ विजय मिळवले आपले स्वतःचे वेगळे राज्य निर्माण केले. त्याचा जवळच्या साथीदारांनी खून केला. हा आयुष्याच्या शेवटी एककल्ली बनल्याचे सांगितले जाते.
अटिला हा सनाच्या पाचव्या शतकात होऊन गेलेला हूण राजा होता. त्याने आपल्या पराक्रमाने आपल्या राज्याचा विस्तार केला.
सनाच्या १७ व्या शतकाच्या प्रारंभी गुस्ताव ॲडोल्फस हा स्वीडनचा राजा होऊन गेला. हा वयाच्या १६ व्या वर्षी राजा झाला. त्याने पराक्रमाने आपल्या राज्याच्या सीमांचा विस्तार केला. लढाईमध्ये या राजाचा मृत्यू झाला. याला त्या काळातील पाश्चात्य आधुनिक युद्ध तंत्राचा जनक मानले जाते.
या वेगवेगळ्या पाश्चात्य योद्धांशी शिवाजी महाराजांची तुलना करताना काही गोष्टी लक्षात येतात त्या म्हणजे प्रामुख्याने राज्यविस्तार करणारे योद्धे हो.ते काही जणांचा खून करण्यात आला. तर एकाच्या बाबतीत सैनिकांचा विश्वास गमावला गेल्याचा परिणाम झाला. यातील काही जण हे व्यसनांच्या आहारी गेलेले किंवा एककल्ली बनल्याचे उल्लेख आढळतात. या वीरांच्या नावाचा वारसा सांगून पुढे कोणी त्यांच्या नावे पराक्रम गाजवल्याचे आढळत नाही.
छ.शिवाजी महाराजांचे वेगळेपण यात आहे की हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठापनेमागे ईश्वरी प्रेरणा होती. ही ईश्वरी प्रेरणा महाराजांनी अनेक वेळा व्यक्त केली आहे. महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाही शत्रूने कधीही बोट दाखवले नाही. त्यांचे चारित्र्य शुभ्र धवल आहे. त्यांच्या सर्व सेनापती आणि मावळ्यांचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास होता. त्यांच्याच प्रेरणेने पुढे हिंदवी स्वराज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. महाराजांची प्रजाहितदक्षता विलक्षण आहे. या सगळ्या बाबींचा विचार केला तर महाराजांची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही हे समजते. महाराज हे एकमेवाद्वितिय असल्याचे लक्षात येते.
छ. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
छान माहिती... बरीच नावं ऐकली होती पण त्यांचे पुढे झाले काय हे हा लेख वाचून कळले.
ReplyDeleteधन्यवाद.
नमस्कार 🙏
Deleteछत्रपती शिवाजी महाराज बरोबर जगातील शूरवीरांची माहिती सुद्धा प्राप्त झाली... प्रेरणादायी लेख🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखुप छान लेख आहे
ReplyDeleteधन्यवाद
Delete