आचार्य अत्रे यांची सत्यकथांवर आधारित काही नाटके
तत्कालीन कवींवर लिहिलेल्या विडंबन कविता आचार्य अत्रे यांनी 'झेंडूची फुले' या पुस्तकात प्रसिद्ध केल्या. यामुळे हळूहळू साहित्य क्षेत्रात त्यांची कीर्ती वाढू लागली. आचार्य अत्रे हे राम गणेश गडकरी यांच्या प्रभावाखाली तयार झाले होते. गडकरी स्मृतिदिनाची अत्रे यांनी केलेली भाषणे, अत्रे यांचे शाळेतील प्रयोग, त्यांचे लंडनला जाऊन शिक्षणशास्त्र शिकून येणे, ठिकठिकाणी वेगवेगळ्या विषयावर भाषणे करणे यामुळे आचार्य अत्रे प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
१९३३ मध्ये एके दिवशी त्या वेळच्या बालमोहन नाटक मंडळीचे प्रमुख दामू अण्णा जोशी आचार्य अत्रे यांच्याकडे आले. अत्रे यांनी नाटक लिहावे असा यांनी आग्रह धरला. अत्रे यांनी तोपर्यंत व्यावसायिक नाटक लिहिलेले नव्हते. परंतु दामू अण्णा जोशी यांच्या आग्रहामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात आचार्य यात्रे यांचा प्रवेश झाला. स्वतःच्या प्रतिभेने आचार्य अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली. ती खूप लोकप्रिय ठरली. त्यामुळे त्यांना एक प्रसिद्ध नाटककार म्हणूनदेखील लोक ओळखू लागले. आचार्य अत्रे यांच्या नाटकांपैकी काही नाटके वस्तुस्थितीवर आधारित आहेत.
आचार्य अत्रे पहिलेच व्यावसायिक नाटक 'साष्टांग नमस्कार' हे सूर्यनमस्कारचे वेड घेतलेल्या एका संस्थानिकावर बेतलेले आहे. त्यावेळच्या सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानाचे संस्थानिक पंतप्रतिनिधी यांचा सूर्यनमस्कार खूपच भरवसा होता. त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीसाठी 'सूर्यनमस्कार घालावे' हाच उपाय सुचवीत असत. हा मध्यवर्ती धागा घेऊन या अतिरेकाचे विडंबन आचार्य अत्रे यांनी 'साष्टांग नमस्कार' या नाटकात केले आहे. हे विनोदी नाटक रसिकांनी अगदी उचलून धरले.
आचार्य अत्रे यांनी एके दिवशी एका दुर्दैवी स्त्रीची कहाणी ऐकली. त्या कहाणीत असे झहाले ते की पतीच्या छळामुळे कंटाळून एका पत्नीने स्वतःचे मंगळसूत्र काढून फेकून दिले. परंपरागत हिंदू रीतीनुसार ही फारच मोठी गोष्ट होती. पती-पत्नीच्या नात्यांमध्ये वेगवेगळ्या कारणाने तणाव निर्माण होत असतो. परंतु मंगळसूत्र काढून टाकून देणे या तीव्र प्रतिक्रियेने अत्रे यांना धक्का बसला. यावरच त्यांनी 'घराबाहेर' नावाचे नाटक लिहिले. त्यातील पत्नी पतीच्या छळामुळे मंगळसूत्र काढून टाकून देते. परंतु स्वतःच्या मुलांच्या पालन पोषणासाठी ती ते मंगळसूत्र परत गळ्यात घालते आणि नव्याने संसाराला सुरुवात करते असा शेवट आचार्य अत्रे यांनी केला.
आचार्य अत्रे हे नाटककार म्हणून प्रसिद्धीस आल्यानंतर त्यांना एके दिवशी मुंबईमध्ये त्यांचा एक परिचित भेटला. त्याने सांगितले, " माझी जीवन कथा ही खूप विलक्षण आहे. त्यावर तू नाटक लिही." त्या माणसाची गोष्ट अशी होती की त्याचा विवाह झाला होता. त्या विवाहसंबंधातून त्याला एक मुलगा झाला. परंतु हा माणूस बाहेरख्याली वृत्तीचा होता. एका परस्त्रीशी त्याचे अनैतिक संबंध होते. त्यातून एक मुलगी जन्माला आली. या दोघा मुलामुलींना एकमेकांबद्दल काहीही माहिती नव्हती. मोठे झाल्यानंतर योगायोगाने ते एकाच महाविद्यालयात शिकू लागले. तिथे त्यांची ओळख झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या संबंधातून मुलगी गरोदर राहिली. हे अत्रे यांच्या परिचिताला समजले. त्यावेळेला या सगळ्याचा खुलासा त्या माणसाला झाला. सावत्र बहिण भाऊ असलेले दोघे आपल्या नात्याची कल्पना नसल्याने एकमेकांच्या प्रेमात पडले आणि गोष्ट कुमारी मातृत्वापर्यंत पोहोचली. आता या दोघांना कसे सांगावे आणि परावृत्त करावे या विचाराने तो माणूस अगदी बेचैन झाला. त्याची झोप उडाली. एके दिवशी त्यांनी आपली गोष्ट अत्रे यांना सांगितली. अत्रे यांनी त्यावर 'उद्याचा संसार' नावाचे नाटक लिहिले. नाटकाच्या दृष्टीने या माणसाच्या पत्नीला मुलगा आहे असे न दाखवता मुलगी आहे असे दाखवले. शेवटी या व्यक्तीची पत्नी आत्महत्या करते असा प्रसंग लिहून शोकांत नाटक लिहिले.
'तो मी नव्हेच' या नाटकाची जन्म कथा देखील अशीच आहे. १९६० मध्ये बार्शी येथे माधव काझी या व्यक्तीवर वेगवेगळी नावे घेऊन प्रौढ तरुणींना जाळ्यात अडकवून, त्यांना विवाह करायला भाग पाडून फसवल्याबद्दल खटला चालू होता. नाट्यनिर्माते मो.ग.रांगणेकर यांनी या खटल्याची माहिती आचार्य अत्रे यांना दिली. आचार्य अत्रे यांनी यावर नाटक लिहिले. काही माणसांची लबाडी , काही संभावितांचा बावळटपणा याच्यावरती कठोर प्रहार करणारे हे नाटक अत्रे यांनी लिहिले. प्रभाकर पणशीकर यांचा जबरदस्त अभिनय, फिरता रंगमंच अशी वैशिष्ट्ये असलेले हे नाटक खूपच प्रसिद्ध झाले.
आचार्य अत्रे यांचे साहित्य वस्तुस्थितीवर आधारलेले आहे याचीही काही उदाहरणे आहेत.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
तुमच्या लिखाणातून माझ्या ज्ञानकोशात भर पडते. आचार्य अत्रेंवरती सुरेख लेखन केला आहे सर🙏
ReplyDelete