आचार्य अत्रे यांचे काही चित्रपट
नाट्य क्षेत्रात मिळालेल्या यशामुळे आचार्य अत्रे यांना आणखीनच प्रसिद्धी मिळाली. त्यातून त्यांचे चित्रपट लेखन सुरू झाले. सुरुवातीला दादासाहेब तोरणे, विश्राम बेडेकर यांच्यासाठी त्यांनी प्रत्येकी एक पटकथा लिहिली. परंतु दिग्दर्शकांनी त्या पटकथेत पुष्कळ दुरुस्त्या केल्या. ते आचार्य अत्रे यांना पटले नाही म्हणून त्यांनी चित्रपटासाठी कथा लेखन करायचे नाही असे ठरवले. पण नंतर 'हंस पिक्चर्स' संस्थेच्या निमित्ताने त्यांची बाबुराव पेंढारकर , मास्टर विनायक यांच्याशी ओळख झाली आणि चित्रपट लेखनाला सुरुवात झाली. त्यातून त्यांनी धर्मवीर, ब्रम्हचारी, ब्रॅंडीची बाटली, अर्धांगी अशा काही चित्रपटांच्या कथांचे लेखन केले. हे चित्रपट पुष्कळ प्रसिद्धीस आले.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
यानंतर नवयुग चित्रपट कंपनी स्थापन करण्यात आली. त्यामध्ये हे सर्वजण संचालक म्हणून सहभागी झाले. परंतु या कंपनीच्या कामकाजात मतभेद झाल्यानंतर अत्रे बाहेर पडले.
पण चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा अत्रे यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातून त्यांनी भालचंद्र सामंत हे वितरक आणि हरिभाऊ मोटे या दुसऱ्या एका निर्मात्याच्या जोडीने चित्रपटांचे कामकाज सुरू केले. योगायोगाने चित्रपट निर्मितीसाठी पैसे देणारा एक भांडवलदार त्यांना भेटला. त्यातून संधी मिळाली. अत्रे यांनी मुंबईत एक जुना स्टुडिओ विकत घेतला. या स्टुडिओमध्ये मोटे आणि अत्रे यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. या स्टुडिओमध्ये निर्माण केलेल्या 'पायाची दासी' या अत्रे यांच्या चित्रपटाला पुष्कळ लोकप्रियता मिळाली. त्यातून पैसा मिळाला. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्मितीचा कार्यक्रम खूप खर्चिक झाला आणि झालेले कर्ज निवारण्यासाठी अत्रे यांना स्टुडिओ विकावा लागला.
आपल्या चित्रपट कथांना दुसरे कोणी दिग्दर्शक असल्याने बदल होतात निर्मितीला वेळ लागतो. हे लक्षात घेऊन अत्रे यांनी चित्रपट दिग्दर्शन देखील सुरू केले. 'दिल की बात' या हिंदी चित्रपटात अत्रे यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल टाकले. हा चित्रपट बऱ्यापैकी चालला. 'मोरूची मावशी' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट. हा विनोदी चित्रपट खूपच गाजला.
महाराष्ट्रातील थोर सामाजिक कार्यकर्ते साने गुरुजी यांनी आत्महत्या केली. त्यांच्या श्रद्धांजली प्रसंगी अत्रे यांनी साने गुरुजी यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' या पुस्तकावर चित्रपट निर्मितीची घोषणा केली. त्यासाठी ते जोमाने कामाला लागले. चित्रपट उत्तम निर्माण व्हावा यासाठी त्यांनी सर्वतोपरी परिश्रम केले. नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या भारतात सरकारच्यावतीने चित्रपटांसाठी पुरस्कार देण्याची योजना सुरू झाली. त्या योजनेसाठी आचार्य अत्रे यांनी आपला 'श्यामची आई' हा चित्रपट पाठवला. हा चित्रपट जनसामान्यांनी उचलून धरला. 'मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र म्हणजे हा चित्रपट' अशा प्रकारचे वर्णन करण्यात आले. या चित्रपटाला सर्वत्र यश मिळत असताना आचार्य अत्रे यांची आई निधन पावली. आपल्या मुलाने आपल्याला मुंबई व्यतिरिक्त दुसरीकडे कोठेही नेले नाही ही खंत त्या मातेने निधन समयी बोलून दाखविली. आईच्या मरणानंतर तिच्या अस्थी गंगेच्या पाण्यात विसर्जित करून आईची खंत दूर करण्याचे थोडे तरी समाधान मिळावे या उद्देशाने आचार्य अत्रे यांनी आईच्या अस्थी घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दिल्ली अधिवेशनासाठी प्रयाण केले. तेथेच गांधी जयंतीच्या दिवशी आचार्य अत्रे यांना आपल्या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाल्याची बातमी कळाली. विशेष गोष्ट म्हणजे निवड समितीत मराठी मातृभाषा असलेले कोणीही नव्हते. या पुरस्काराचा अत्रे यांना अतिशय आनंद झाला. आपण निर्माण केलेल्या चित्रपटाला स्वतंत्र भारतात सुरू झालेल्या पुरस्कार योजनेत पहिल्याच वर्षी पारितोषिक मिळावे याचा विलक्षण आनंद आचार्य अत्रे यांना झाला.
त्यानंतर पुढच्या वर्षी अत्रे यांनी 'महात्मा फुले' हा चित्रपट बनवला. सामाजिक सुधारणांसाठी भरीव प्रयत्न करणाऱ्या फुले दांपत्याचे कार्य त्यांनी या चित्रपटातून समाजासमोर मांडले. या चित्रपटाला राष्ट्रपतींच्या रजत पदकाने सन्मानित करण्यात आले होते. सलग दोन वर्षे अखिल भारतीय पातळीवर अत्रे यांना सन्मान मिळाला.
व्यवसाय म्हटले की चढ उतार असतातच याचा अनुभव अत्रे यांना मिळाला. अपयशाने, कटू अनुभवांनी ते खचून गेले नाहीत. आपली खटपट त्यांनी चालूच ठेवली. मानवी स्वभावाचे वेगवेगळे अनुभव त्यांना आले. आचार्य अत्रे यांनी आपल्या कर्तृत्वाने चित्रपट क्षेत्राच्या इतिहासात स्वत:चे नाव कोरून ठेवले आहे.
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
श्यामची आई हा चित्रपट अगणित वेळा पाहिलाय.. त्या चित्रपटा मागचा इतिहास तुमच्या लेखनातून आज उलघडला.
ReplyDeleteधन्यवाद सर🙏
सर नमस्कार आणि धन्यवाद 🙏
Deleteज्या पिढीने अत्रे पाहिले ऐकले अशी आमची पिढी. खरोखरच आम्ही खूप भाग्यवान आहोत. बाकी सुधीर गाडे सरांच अभ्यासपूर्ण लेखन खूपच छान. नवीन पिढीच्या माहितीसाठी सर तुम्ही खूपच चांगले काम करत आहात. पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
ReplyDeleteडॉक्टर धन्यवाद 🙏
Deleteखुप छान नवीन माहिती मिळाली
ReplyDeleteमॅडम धन्यवाद 🙏
Deleteखूप छान सर
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Delete