आचार्य अत्रे यांचे वक्तृत्व

      आचार्य अत्रे यांच्या वेगवेगळ्या पैलूंपैकी एक पैलू आहे तो त्यांच्या वक्तृत्वाचा! आपल्या हयातीत आचार्य अत्रे यांनी अनेक वेळा हजारो तर काही प्रसंगी लाखो श्रोत्यांपुढे भाषणे केली. दीर्घकाळ ती भाषणे लोकांच्या स्मरणात राहिली समाज मनावर त्यांचा ठसा उमटला आहे.


         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

      'विनोदी वक्ते' हा आचार्य अत्रे यांचा लौकिक सर्वत्र आहे. आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे, ' व‌क्त्याचा लौकिक हादेखील वक्त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग समजला पाहिजे.' आचार्य अत्रे यांचे आयुष्यातील पहिले भाषण इयत्ता चौथी केलेले आहे. हे भाषण वेगळ्या कारणाने विनोदी झाले. पाठ केलेले भाषण विसरल्यामुळे ते मध्ये मध्ये 'झालं' असं म्हणू लागले. थोड्यावेळाने वर्गातील सर्व विद्यार्थीदेखील त्यांच्यासोबतच 'झालं' 'झालं' असं म्हणू लागले आणि त्यामुळे सर्व जण हसू लागले. नंतर म.ए.सो. भावे हायस्कूलमध्ये शिकत असताना एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यांनी संत तुकारामांच्या जीवनावर भाषण केले. एक छोटे चरित्र मिळवून ते पाठ करून ते भाषण खणखणीत आवाजात केले. त्यामुळे त्यांना त्या स्पर्धेत पारितोषिक देखील मिळाले. 

      पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र इतर विद्यार्थ्यांची भाषणे ऐकून आपण चांगले भाषण करू शकणार नाही असे आचार्य अत्रे यांना वाटले आणि त्यांनी भाषण करायचे सोडून दिले. नंतर शिक्षण क्षेत्रात प्रवेश केल्यावर हळूहळू त्यांनी भाषणांची सुरुवात केली. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची तयारीदेखील केली. त्याकाळच्या प्रसिद्ध वक्त्यांची भाषणे ऐकणे, पुण्यात पर्वतीच्या टेकडी मागे जाऊन मोठ्याने भाषण देण्याचा सराव करणे, वेगवेगळ्या कवी लेखकांची अवतरणे पाठ करणे अशा प्रकारची तयारी त्यांनी केली. शिक्षकी पेशात असल्याने हळूहळू गर्दी समोर बोलण्याबाबतची त्यांची भीड चेपत गेली. 

      मुंबईतील शिक्षण शास्त्र पदवी परीक्षेत मिळालेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.‌  आपण चांगले भाषण करू शकतो असे आचार्य अत्रे यांना वाटू लागले. गडकरी पुण्यतिथीच्या एका कार्यक्रमात त्यांना आपल्या भाषणाचा सूर सापडला. त्यावेळचे प्रसिद्ध पुढारी आणि वक्ते दादासाहेब खापर्डेकर अच्युतराव कोल्हटकर यांच्या काही लकबी, शैली यांचे अनुकरण करत भाषण करण्याला त्यांनी सुरुवात केली. 

    इंग्लंडमधील शिक्षण घेत असताना शिक्षणतज्ञ डॉ .जे पी बेलॉर्ड यांच्या वक्तृत्वानेदेखील ते प्रभावीत झाले. त्यामुळे विनोद कोट्या करीत भाषण कसे करावे हे तंत्र त्यांना अवगत झाले. ठणठणीत आवाजात बोलायला सुरुवात करायची. पहिल्या तीन-चार वाक्यातच एखादी कोटी किंवा विनोद करून हशा पिकवायचा आणि मग स्वयंस्फूर्तीने भाषण करायचे अशी पद्धत त्यांनी सुरू केली.       सुरुवातीच्या काळात भाषणाची ते टिपणे काढत असत. बारीक-सारीक तपशील नोंदवत असत. परंतु प्रत्यक्ष भाषण करताना मात्र ते टिपण न बघता स्मरणशक्तीच्या जोरावर ते टिपणात लिहिल्याप्रमाणे भाषण करीत असत. पुढे पुढे सराव झाल्यानंतर टिपणे काढण्याची आवश्यकता त्यांना भासेनाशी झाली. परंतु काही विशिष्ट प्रसंगी, संमेलन प्रसंगी द्यावयाची भाषणे मात्र ते लिहून काढत असत. हा अनुभव त्यांना फारच कष्टदायक वाटत असे.

         समोरचा श्रोतृवर्ग बघून भाषण करायचे हा मुद्दा देखील आचार्य अत्रे यांनी लक्षात घेतला. त्याप्रमाणे समोर श्रोते कोण आहेत हे ध्यानात घेऊन आपल्या भाषणाची ते उत्स्फूर्तपणे रचना करीत असत. त्यांचा स्वतःचा व्यासंग, वाचन, हजरजबाबीपणा सुचलेल्या कोट्या, आक्रमक आवेशाने विरोधकांची उडवलेली भंबेरी, प्रसंगी केलेली अतिशयोक्ती अशा अनेक गोष्टींमुळे यामुळे त्यांचे भाषण प्रभावी होत असे.

     विनोदी वक्ते म्हणून त्यांचा बोलबाला झाला. त्यांच्या भाषणांनी लोकांच्या हसून हसून मुरकुंड्या वळत. एक प्रसंग वेगळाच घडला.  त्यांच्या भाषणाला उपस्थित असलेले महर्षी धोंडो केशव कर्वे भाषण सुरू होण्यापूर्वीच खूप हसू लागले. आता कसे भाषण करायचे याचा पेच अत्रे यांना पडला. परंतु आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी तो ते भाषण पार पाडले. 

       विनोदी वक्ते म्हणून प्रसिद्धी मिळाल्यावर आचार्य अत्रे यांना भाषणाच्या निमंत्रणांचा ओघ सुरू झाला. योगासन वर्ग, केशकर्तकांचा कार्यक्रम, टेलरिंगचे दुकानाचे उद्घाटन अशा आणि यासारख्या अनेक ठिकाणी त्यांनी भाषणे देण्याचा धडाका लावला. एकदा तर थोड्या दिवसात सलग ५० भाषणे दिल्यामुळे त्यांचा घसा बसला. परिणामी त्यांना औषधोपचार व विश्रांती घ्यावी लागली. 

         प्रसंगी आचार्य अत्रे यांनी गंभीर भाषणेदेखील केली आहेत. अंमळनेर मधील त्यांचे असेच एक गंभीर भाषण तेथील दानशूर प्रताप शेठ यांनी ऐकले आणि आचार्य अत्रे विनोदी बोलतात असे सांगणाऱ्यांना "तुम्ही अपप्रचार करत आहात" असे सुनावले. तर कोल्हापूरमध्ये झालेल्या एका भाषणाला प्रा.ना. सी. फडके उपस्थित होते. आचार्य अत्रे यांचे ते गंभीर भाषण ऐकून आपली विनोदी भाषण ऐकण्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही आणि निराशा झाली असे मत त्यांनी व्यक्त केले. 

           आचार्य अत्रे यांच्या उत्स्फूर्त उद्गारांनीदेखील त्यांचे भाषण प्रभावी होत असे. एकदा फर्ग्युसन कॉलेजच्या ॲंफी थिएटरमध्ये बोलायला सुरुवात करताना त्यांनी , "सभ्य स्त्री पुरुष हो." अशी त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे सुरुवात केली. वर गॅलरीत बसलेल्या एका टारगट तरुणाने लगेच 'ओ' असे म्हटले. त्यावर हजरजबाबीपणाने अत्रे म्हणाले , "मी आपणाला नाही तर सभ्य स्त्री-पुरुषांना उद्देशून बोललो आहे." हे ऐकल्यानंतर तो तरुण शांत तर बसलाच परंतु आचार्य अत्रे यांचे उरलेले भाषण निर्विघ्नपणे पार पडले.

       काही ठिकाणी मात्र आचार्य अत्रे यांना निराशेचा अनुभव आला. मुंबईच्या एका कामगार वस्तीत भाषण चालू असताना जमलेले आबाल वृद्ध स्त्री पुरुष इतके कलकल करीत होते की आचार्य अत्रे यांना भाषण करणे अवघड गेले. शेवटी गणपतीची एक गोष्ट सांगून त्यांनी कसेबसे आपले भाषण पूर्ण केले. 

        आचार्य अत्रे यांनी १९३८-३९ च्या सुमाराला 'नवयुग' नावाचे साप्ताहिक सुरू केले होते. त्याचे संपादक म्हणूनही ते काम करीत होते. त्या साप्ताहिकात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणारा एक लेख प्रसिद्ध झाला. त्यानंतर नागपूरमधील एका शाळेत भाषण झाल्यावर त्यांना सावरकरांच्या अनुयायांनी गराडा घातला आणि बाका प्रसंग उभा राहिला. कशीबशी आचार्य अत्रे यांनी त्यातून आपली सुटका करून घेतली. पुढे एक दोन वर्षांनी नवयुगमध्येच आचार्य अत्रे यांनी सावरकरांवर टीका करणारा लेख स्वतः लिहिला. त्यानंतर स.प. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात आयोजित केल्या गेलेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आचार्य अत्रे यांच्यावर हल्ला केला. त्यांना दुखापत केली काही मोजके विद्यार्थी आचार्य अत्रे यांच्या मदतीला आले. जवळपास तासभर हा प्रकार चालला होता. नंतर त्रास देणारे विद्यार्थी पांगले. आचार्य अत्रे यांनी फाटलेले कपडे , झालेल्या जखमा यांची तमा न बाळगता पुढे जवळपास तासभर ठरलेल्या विषयावर भाषण केले.

       आचार्य अत्रे यांचे अनेक व्यक्तींचे अनेक कारणांमुळे वाद झाले. त्या वादांमध्ये देखील आचार्य अत्रे यांनी आपल्या जोरदार वक्तृत्वाने विरोधकांना नामोहरम केले. १९३८ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश करून ते नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले तेव्हापासून राजकीय क्षेत्रातदेखील त्यांनी भाषणे करायला सुरुवात केली. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तर आचार्य अत्रे यांनी आपल्या बुलंद भाषणांनी संयुक्त महाराष्ट्र होऊ न देणाऱ्या त्या वेळच्या काँग्रेसच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली. त्यांच्या या भाषणांनी जनजागृती वाढत गेली. याच चळवळीत काम करत असताना आचार्य अत्रे विधानसभेत निवडून गेले. तिथे आपल्या भाषणांनी सरकारला विविध मुद्द्यांवर धारेवर धरले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आचार्य अत्रे यांचे योगदान त्यांची भाषणे, त्यांचे लेखन यातून ठळकपणे अधोरेखित होते. 

     आपल्या वक्तृत्वाने आचार्य अत्रे यांनी अमीट असा ठसा उमटवला आहे त्यांचा हा गुण अनेकांसाठी प्रेरणादायक आहे.

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

 

      

Comments

  1. सुंदर माहिती सादर केली सर आचार्य अत्रे यांच्या बद्दल🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची