महात्मा बसवेश्वर : मानवी‌ मूल्यांचा आग्रह

      ' हे जग असे का आहे?' असे विचारणाऱ्यांनी जगात बदल घडवून आणले आहेत. पण ' हे जग असे का नाही?' असे विचारणाऱ्या माणसांनी जगात जास्त बदल घडवून आणले आहेत. अशाप्रकारे बदल घडवून आणणाऱ्या महान व्यक्तींमध्ये महात्मा बसवेश्वर स्वतःच्या आगळ्या कर्तृत्वाने, तेजाने , विचारांनी, कार्याने उठून दिसतात. काल पटलावर त्यांनी स्वतःची ठसठशीत नाम मुद्रा उमटवली आहे.


        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

      पृथ्वीवर मानवी जीवनाची सुरुवात झाली.  सुरुवातीच्या काळात भटकणारा माणूस वेगवेगळ्या ठिकाणी हळूहळू स्थिर झाला. त्यातून समाजांची निर्मिती झाली. जगभर सर्व समाजांमध्ये काळाच्या ओघात वेगवेगळ्या प्रकारचे भेद निर्माण झाल्याचे आढळते. कालांतराने हे भेद दृढमूल झाले. हे भेद मोडण्यासाठी अनेकांना संघर्ष करावा लागला.

         महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्य सनाच्या १२ व्या शतकामध्ये मंगळवेढा (जि. सोलापूर, महाराष्ट्र) , कूडलसंगम, बसवकल्याण (जि. विजयपूर ,कर्नाटक) या सीमावर्ती भागात घडले. १२ व्या शतकात एकूणच हिंदू समाजाला जातीभेद ,अस्पृश्यता कर्मकांड ,महिलांना दुय्यम वागणूक या आणि अशा अनेक दुर्गुणांनी ग्रासले होते. अनेक व्यक्ती याच्या बळी ठरत होत्या. आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीची, सन्मानाची कोणतीही आशा त्यांच्या दृष्टिक्षेपात नव्हती. अशा काळात महात्मा बसवेश्वर होऊन गेले.

         मानवतेचे पहिले लक्षण म्हणजे माणसांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न मानता सर्वांना आपले म्हणणे आणि तशाप्रकारे व्यवहार करणे. महात्मा बसवेश्वरांचे 

' हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असे नच म्हणवावे। हा आमुचा , हा आमुचा, हा आमुचा असेचि वदवावे। कुडलसंगमदेवा तुमच्या घरचा पुत्र म्हणावे!'

हे वचन ध्यानात घेतले तर लक्षात येते की त्यांनी माणसांमध्ये कोणताही दुजाभाव करण्याची वृत्ती ठेवली नव्हती. तर त्यांनी सर्वांना आपले मानले होते. महात्मा बसवेश्वर केवळ हे वचन सांगून थांबले नाहीत तर त्यांचा व्यवहारदेखील त्याच प्रकारचा होता. समाजातील कोणत्याही प्रकारचा जातीभेद न मानता सर्व जाती जमातीच्या लोकांशी त्यांचे आपुलकीचे संबंध होते. त्या काळात आपल्याच जातीतील लोकांच्या बरोबर भोजन करायचे ही कुरीती तर त्यांनी सहजच मोडून काढली. प्रेमाने बोलावणाऱ्या कोणत्याही जातीतील व्यक्तीच्या घरी ते स्नेहपूर्वक भोजन करत असत. आज २१ व्या शतकामध्ये या भोजन करण्याचे सामाजिक संदर्भ , औचित्य कदाचित लक्षात येईल न येईल हा वेगळा भाग आहे. परंतु त्या काळात मात्र ती कृती क्रांतिकारक होती. या सर्वातून बसवेश्वरांचा 'मानव तितका आपुला' हा विचार ठळकपणे समोर येतो.

      त्या काळात हिंदू समाजाने मानवतेला कलंक अशा प्रकारच्या अस्पृश्यतेच्या रूढीलाच धर्म मानले होते. महात्मा बसवेश्वरांनी या अमानवी रूढीला खुले आव्हान दिले. ज्यांनी श्रमपूर्वक तयार केलेल्या वस्तू आपण सहज वापरू शकतो, त्यांच्या अन्य प्रकारच्या सेवा घेऊ शकतो तर अशा माणसांच्या स्पर्शाने आपल्याला विटाळ कसा होतो? हा त्यांचा रोखठोक प्रश्न होता. भल्याभल्यांना त्या काळात या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. महात्मा बसवेश्वरांनी अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तींशी आवर्जून स्नेहपूर्वक संबंध ठेवले. ही त्यांची कृती मानवतेचा सन्मान करणारी होती. पिढ्यानपिढ्या वंचित, अपमानित समाजाच्या दुखऱ्या मनांवर हळुवार फुंकर घालून त्यांना सन्मान देणारी होती. बसवेश्वर वचन आहे की

चांभार उत्तम तो दुर्वास

कश्यप लोहार, कौंडिण्य तो न्हावी

तिन्ही लोकी बरवी प्रसिद्धी ती

जातीचे श्रेष्ठत्व हाची वेडाचार.

  महात्मा बसवेश्वर यांचे समानतेचे विचार त्यांच्या अनुयायांनीदेखील आत्मसात केले होते. अनुभव मंटप या अभिनव प्रयोगात सर्व अनुयायी म्हणजे शरणांनी एकमताने विचार करून ब्राह्मण मुलगी आणि मातंग मुलगा विवाह लावून दिला. एक अर्थाने तो आंतरजातीय विवाह होता. काळाच्या बरेच पुढे असलेले हे क्रांतिकारक पाऊल होते. यातूनच जाती जातींमध्ये उच्चनीचता मोडून काढण्याचा संदेश मिळाला. पण याबाबतीत पुष्कळ प्रगती केली असली तरी देखील सर्वार्थाने हा प्रश्न मिटला आहे असे म्हणता येत नाही. याचे अतीव दुःख वाटते. एखाद्या जातीमध्ये जन्माला येण्यावरून देखील थोड्या लोकांना आजही काही प्रमाणात का होईना अहंकार वाटतो आणि ते काही प्रसंगी दुसऱ्यांना तुच्छतेची वागणूक देतात. या वेदनादायक पार्श्वभूमीवर बसवेश्वरांचे विचार आणि आचार लखलखीतपणे उठून दिसतात.

      बाराव्या शतकात मानवतेच्या अर्ध्या भागावर म्हणजेच महिलांवर त्या पतित असल्याचा शिक्का बसला होता. महिलांना दुय्यम वागणूक दिली जात होती. त्यांच्या सन्मानाची, अधिकाराची कोणालाही पर्वा वाटत नव्हती. स्त्रीच्या मासिक पाळीमध्ये तिला अपवित्र मानले जाई. जर ही स्त्री अपवित्र असेल तर अशा स्त्रीच्या पोटी  जन्म घेतलेले आपण देखील अपवित्र आहोत. असा बिनतोड युक्तिवाद महात्मा बसवेश्वर करत असत. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या कार्यामध्ये स्त्रियांना सन्मानाचे स्थान दिले पुरुषांच्या बरोबरीने त्या महात्मा बसवेश्वरांच्या कार्यात सहभागी झाल्या. स्त्री पुरुष हा भेद न मानण्याचा विचार हा देखील मानवी मूल्य जपणारा विचार आहे.

   या सर्व विवेचनावरून हे लक्षात येते की महात्मा बसवेश्वर यांच्या दृष्टीने माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या माणूसपणातच आहे. त्यासाठी अन्य कोणतेही पद ,उपाधी, संपत्ती, विशिष्ट घराणे याची त्यासाठी आवश्यकता नाही. म्हणूनच महात्मा बसवेश्वरांचा विचार हा मानवतेची मूल्ये जपणारा विचार आहे असे निश्चितपणे म्हणता येते.


सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

        

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची