Posts

Showing posts from May, 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मार्गदर्शक दीपशिखा

Image
        काल पटलावर आपला ठसा उमटवून गेलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन एखाद्या दीपशिखेसारखे आहे. ही दीपशिखा तिच्या अंगभूत तेजाने तळपत आहे आणि समाजाला वाट दाखवत आहे. समाज जीवनाची उभारणी होताना काही जीवनमूल्यांची चौकट असणे नेहमीच आवश्यक असते. जगामध्ये वेगवेगळ्या मानव समुहांनी आपल्या समूहासाठी काही मूल्ये आपापल्या वाटचालीच्या, अनुभवांच्या आधारे निश्चित केली. ती जीवनमूल्ये पिढ्यानपढ्या संक्रमित होण्यासाठी काही पद्धती प्रथा परंपरा यांची निर्मिती केली. सर्व मानव समूहांना जगाच्या इतिहासात आपापले स्थान आहे. असाच एक प्राचीन मानव समूह भारतीयांचा आहे. भारताला हजारो वर्षांची जी अखंड परंपरा लाभली आहे. तशी परंपरा अन्य कोणत्या मानव समूहाला लाभली आहे याचे उत्तर नकारार्थी आहे. भारतीय मानव समूहाची जीवनमूल्ये ज्यांच्या जीवनात ओतप्रोत भरलेली दिसतात अशा महान व्यक्तींपैकी अहिल्याबाईंचे स्थान अद्वितीय आहे.           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       भारतीय समाज जीवनाचा पाया अध्यात्माचा आहे. जीवनाचे अधिष्ठान जेवढे लौकिक असावे अशी ...

आचार्य अत्रे : विनोदी साहित्यिक

Image
      विनोदी लिहिणे हे खूप सोपे आहे अशी बऱ्याच जणांची समजूत असते. परंतु विनोदी लिहिणे हे खूप अवघड असते असे आचार्य अत्रे आणि इतर अनेक साहित्यिकांनी वारंवार सांगितले आहे. आचार्य अत्रे यांना विनोदी लेखन सहजपणे जमत गेले याचे रहस्य त्यांच्या मूळच्या खोडकर स्वभावात आहे असे आपल्याला म्हणता येईल. शाळेमध्ये शिकत असताना सुट्टी मिळावी म्हणून उंदीर मारून शाळेत नेऊन टाकणे, दृष्टी अधू असलेल्या शिक्षकांच्या शेजारी उभे राहून वर्गात वाकुल्या दाखवणे, गुरुजींच्या उपरण्याचे टोक कापणे या आणि अशा पद्धतीच्या अनेक खोड्या त्यांनी केल्या यातून अनेक वेळा हशा पिकला तर काही वेळा आचार्य अत्रे यांना याबद्दल मारदेखील खावा लागला.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )  परंतु मूळ विनोदी खोडकर स्वभाव केवळ एवढेच असून चालत नाही. तर आचार्य अत्रे म्हणतात तसे , "ज्याला जीवनातील ताल आणि तोल समजतो तोच विनोदी लिहू शकतो." याचबरोबर जीवनाचा असलेला वैविध्यपूर्ण अनुभव हीदेखील आचार्य अत्रे यांची भक्कम जमेची बाजू आहे. त्या आधारावर त्यांना विनोदी लेखन करता आले. हे लेखन अतिशय लोकप्रिय झाले. ...

पुस्तक परिचय : गोष्ट नर्मदालयाची

Image
 गोष्ट नर्मदालयाची  लेखिका प्रव्राजिका विशुद्धानंदा  (भारती ठाकूर ) प्रकाशक विवेक प्रकाशन           ' सत्य संकल्प का दाता भगवान है ' या उक्तीचे स्मरण हे पुस्तक वाचताना मला वारंवार होत होते. गोष्ट ऐकायला तर सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे जगामध्ये सर्व भाषांमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी आजपर्यंत सांगितल्या गेल्या आहेत. त्यातील अनेक गोष्टी या काल्पनिक आहेत. तशाच अनेक गोष्टी प्रत्यक्ष घडलेल्यादेखील आहेत. प्रत्यक्ष घडलेल्या काही गोष्टी अशा असतात की त्या काल्पनिक आहेत असे वाटू लागते परंतु त्या मात्र सत्य असतात. अशाच प्रकारची ही गोष्ट आहे नर्मदालयाची.         भारतामध्ये पश्चिम वाहिनी नदी नर्मदा हिची परिक्रमा करण्याची पद्धत शतकानुशतके चालत आली आहे. नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या नोकरीत असताना एके दिवशी भारती ठाकूर यांना ही परिक्रमा करण्याची प्रेरणा झाली आणि २००५-२००६ मध्ये त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमा करत असताना जे अनुभव आले त्यावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले. परंतु त्या परिक्रमेतून सर्वात महत्त्वाचा बदल घडला तो म्हणजे, ' मी अं...

जयंतराव नारळीकर यांचे प्रेरणादायक जीवन

Image
         ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ जयंतराव नारळीकर यांचे निधन झाले. भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. भारतात विज्ञान हा विषय लोकप्रिय व्हावा यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       जयंतराव नारळीकर यांनी आपले जीवनानुभव 'चार नगरातील माझे विश्व' या आत्मचरित्रपर पुस्तकात सांगितले आहेत. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्या पुस्तकामधील काही गोष्टींची आठवण झाली.  हे पुस्तक मी अनेक वर्षांपूर्वी वाचले आहे. त्यामुळे आठवणीच्या आधारावर हे प्रसंग लिहिले आहेत.      जयंतराव यांचे वडील हे बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते. तेदेखील गणितज्ञ होते. त्या काळात अतिशय अवघड मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होऊन रॅंग्लर झालेले होते. तसेच त्यांच्या आईदेखील उच्चशिक्षित होत्या. वडिलांची कीर्ती अखिल भारतीय असल्यामुळे अनेक लोक आवर्जून त्यांच्या घरी येत असत. त्यापैकी एकाने जयंतरावांच्या वडिलांना सल्ला दिला. जयंतराव त्यावेळी लहान...

महात्मा बसवेश्वर आणि श्रमप्रतिष्ठा

Image
     महात्मा बसवेश्वरांनी मांडलेल्या विचारांमध्ये श्रमप्रतिष्ठा हा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जगण्यासाठी शारीरिक श्रम करणे आवश्यक आहे असा विचार त्यांनी सांगितले. या श्रमांतून उच्च स्थान प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले.‌ कन्नड भाषेतील त्यांचे वचन आहे 'कायकवे कैलास'. कायक म्हणजे शारीरिक श्रम. कैलास म्हणजे उच्च स्थान (मोक्ष) !          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )        जगभर मानव‌ समुहात राहू लागल्यानंतर हळूहळू समाजात माणसांच्या श्रेणी पडल्या. कोणाला तरी श्रेष्ठ किंवा अभिजन मानले जाऊ लागले आणि कोणाला तरी कनिष्ठ किंवा नीच मानले जाऊ लागले. श्रेणी पाडण्याची किंवा मागण्याची जगभरातील पद्धत वेगवेगळी असली तरी पण सर्वत्र एक गोष्ट समान घडली. ती म्हणजे कनिष्ठ मानलेल्या गेलेल्या लोकांना श्रमाचे काम करणे भाग पडले. पण त्या श्रमांतून निर्माण झालेल्या संपत्तीचा उपभोग जास्त प्रमाणात श्रेष्ठ मानलेल्या लोकांनी घेतला. भारतात यात अजून एक भर पडली‌ ती म्हणजे श्रमिक गटातील लोकांना‌ अस्पृश्य मानले जाऊ लागले. मानवतेवरचा कलंक अशी समाजव्यवस्था नि...

आचार्य अत्रे यांच्या घरगुती आठवणी

Image
    प्रसिद्ध व्यक्तिंच्या खाजगी आयुष्याबद्दल स्वाभाविकपणे अनेकजणांना कुतुहल असते. आचार्य अत्रे यांच्या आयुष्याबाबतदेखील त्या काळात अनेक लोकांना कुतुहल होते. त्यांच्या कन्या प्रसिद्ध साहित्यिक शिरीष पै यांनी नियतकालिके , वृत्तपत्रे आणि  'पपा' या आपल्या पुस्तकात आचार्य अत्रे यांच्या घरगुती अनेक आठवणी लिहून या कुतुहलाचे काहीसे शमन केले आहे. 'कवी दिसतो कसा आननी?' यांसारख्या प्रश्नाचे काही उत्तर त्यातून मिळते. ( आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि मीना देशपांडे. छायाचित्र हर्षा देशपांडे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार )     ‌‌ मनस्वी जगणारे, चांगल्याचे भरभरून कौतुक करणारे आणि आपल्या विरोधकांवर आवेशाने तुटून पडणारे अत्रे घरगुती वातवरणात प्रेमळ पती, पिता, आजोबा अशा अनेक भूमिका पार पाडत होते. मुलींच्या विवाहांदरम्यान आनंदाने भावूक होऊन अश्रू गाळत होते. त्यांचे कोडकौतुक करत होते. परदेशी गेल्यावर आवर्जून नातवंडांसाठी भेटवस्तू, खेळणी आणत होते.        शिरीष पै आवर्जून लिहितात की त्या लहान असताना दिवसा माणसांच्या गराड्यात असलेले हास्याची कारंजी विनो...

आचार्य अत्रे यांची पत्रकारिता

Image
      आचार्य अत्रे यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रातलादेखील प्रवेश अतिशय योगायोगाने झाला. सुरुवातीला शिक्षण क्षेत्र, नाट्य क्षेत्र व्याख्याने यामधून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले होते. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी त्यावेळी चालू असलेल्या नियतकालिकात लेखन केले होते. परंतु स्वतः पत्रकार क्षेत्रात प्रवेश केला नव्हता.         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       नवयुग चित्रपट कंपनीची स्थापना करताना अत्रे यांचा संबंध बापूराव राजगुरू यांच्याशी आला. राजगुरू हे 'राष्ट्रीय सुविचार प्रसारक मंडळी' यांच्या वतीने प्रसिद्ध होणारे ' दैनिक लोकशक्ती' हे वर्तमानपत्र चालवित असत. अचानकपणे हे काम त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. परंतु संपादक आणि इतर कर्मचारी यांना मात्र संस्थेने कामावर घ्यायचे नाकारले. आचार्य अत्रे राजगुरू यांच्यासोबत या सर्व लोकांना भेटायला गेले असतांना त्यांच्यावर कोसळलेली बेकारीची कुऱ्हाड लक्षात घेऊन आचार्य अत्रे यांनी 'मी साप्ताहिक सुरू करतो.' असे आश्वासन दिले. काही दिवसातच त्यांनी 'नवयुग' हे साप्ताहिक सुरू केले. हे वर्ष होते ...