जयंतराव नारळीकर यांचे प्रेरणादायक जीवन

         ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ जयंतराव नारळीकर यांचे निधन झाले. भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. भारतात विज्ञान हा विषय लोकप्रिय व्हावा यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. 

        ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

      जयंतराव नारळीकर यांनी आपले जीवनानुभव 'चार नगरातील माझे विश्व' या आत्मचरित्रपर पुस्तकात सांगितले आहेत. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्या पुस्तकामधील काही गोष्टींची आठवण झाली.  हे पुस्तक मी अनेक वर्षांपूर्वी वाचले आहे. त्यामुळे आठवणीच्या आधारावर हे प्रसंग लिहिले आहेत.

     जयंतराव यांचे वडील हे बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते. तेदेखील गणितज्ञ होते. त्या काळात अतिशय अवघड मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होऊन रॅंग्लर झालेले होते. तसेच त्यांच्या आईदेखील उच्चशिक्षित होत्या. वडिलांची कीर्ती अखिल भारतीय असल्यामुळे अनेक लोक आवर्जून त्यांच्या घरी येत असत. त्यापैकी एकाने जयंतरावांच्या वडिलांना सल्ला दिला. जयंतराव त्यावेळी लहान होते. त्या गृहस्थांनी सांगितले की, " मुलांना रात्री नऊ वाजता झोपायचे आणि पाच वाजता उठून दिवसाची सुरुवात करायची अशी सवय लावा." जयंतरावांच्या वडिलांनी तो सल्ला मानला आणि त्याप्रमाणे मुलांना सवय लावली. जयंतरावांना या सवयीचा खूप फायदा झाला असे त्यांनी लिहिले आहे. 

      जयंतरावांनी बनारस मध्ये राहत असताना  वडिलांच्या सांगण्यावरून घराजवळ असलेल्या एका शाळेमध्ये प्रवेश घेतला. जयंतरावांचे शैक्षणिक गुणवत्तेची ख्याती लवकरच सगळीकडे पसरली.  त्याकाळी मॅट्रिकची परीक्षा असे. गावातील दुसऱ्या एका प्रसिद्ध शाळेत परीक्षेचे केंद्र असे. त्या शाळेतील विद्यार्थी दरवर्षी गावात मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला यायचा अशी स्थिती होती. परंतु जयंतरावांची हुशारी समजल्यानंतर त्या शाळेतील शिक्षकांना वाटले की जयंतरावांना त्यांच्या गुणवत्तेनुसार क्षमतेनुसार गुण दिले तर त्यांच्या शाळेतील विद्यार्थी पहिला येणार नाही. म्हणून एका प्रात्यक्षिकाच्या परीक्षेमध्ये जयंतरावांना जेमतेम उत्तीर्ण होतील इतके गुण दिले गेले. परंतु एवढे कमी गुण देऊन देखील जयंतरावांचे इतर विषयातील गुण इतके जास्त होते की ते एकूण राज्यात दुसरे आले. अर्थातच गावातही पहिले आले. हा अनुभव जयंतरावांच्या लक्षात राहिला.

     जयंतरावांना आपल्या वडिलांप्रमाणेच गणिताच्या परीक्षेला बसायचे होते. त्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि जवळपास सहा तास सलग चालणारी परीक्षा त्यांनी दिली. त्या परीक्षेत जेवढे किमान प्रश्न सोडवणे आवश्यक होते तेवढे प्रश्न सोडवून न थांबता त्यांनी पर्यायांसह सर्व प्रश्न सोडवले. त्या परीक्षेत ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले. 

        पुढे विज्ञान क्षेत्रात काम करू लागल्यानंतर संशोधनासाठी जयंतरावांनी काही वर्षे इंग्लंडमध्ये राहायचे ठरवले. तेथील सर्व अनुभव त्यांनी घेतला. परंतु आपले व्यावसायिक जीवन इंग्लंडमध्ये न घालवता भारतात परत यायचे हा त्यांचा निश्चय होता. या निश्चयाला त्यांच्या पत्नी मंगलाताई यांची देखील संमती होती. पती-पत्नींनी एकमताने भारतात परत येण्याचा निर्णय अंमलात आणला.

        भारतात आल्यानंतर सुरुवातीचे अनुभव अतिशय निराशाजनक, आव्हानात्मक असे होते. उदाहरणार्थ टेलिफोन लाईन मिळणे त्यासाठी खूप चकरा सरकारी कार्यालयात घालाव्या लागल्या. असाच प्रकार दैनंदिन गरजेच्या अन्य सोयींबाबतही झाला. परंतु या सगळ्या अनुभवांनी निराश होऊन आपण परत इंग्लंडला जावे असा विचार त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. आहे त्या परिस्थितीत ते आपले योगदान देत राहिले.

     पुढे विज्ञानाच्या प्रसारासाठी 'आयुका' नावाची संस्था निर्माण करण्याचे ठरले. या संस्थेच्या निर्मितीसाठी जयंतरावांचे नाव साहजिकच पुढे आले. जयंतरावांनीदेखील हा प्रस्ताव मान्य केला. आपले ज्ञान, क्षमता, कर्तृत्व या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून त्यांनी आयुका संस्था स्थिरस्थावर केली. नावारूपाला आणली. तसेच संशोधन केवळ संशोधक, विद्यार्थी प्रयोगशाळा या पुरते मर्यादित न राहता सामान्य माणसांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांनी विज्ञानाचा प्रसार चांगल्या पद्धतीने झाला.

      जयंतरावांचा फक्त वैज्ञानिक एवढाच एक पैलू नाही. तर ते चांगले लेखकदेखील होते. अनेक विज्ञान कथा, कादंबऱ्या यांचे लेखन त्यांनी केले आहे. लेखनाची शैली सहजपणे मनाची पकड घेते. लेखनाच्या माध्यमातून विज्ञानाच्या सिद्धांताचा प्रसार देखील होतो.

       भारताच्या प्रगतीसाठी आपले कर्तृत्व दाखवणारे जयंतराव नारळीकर यांना विनम्र श्रद्धांजली!

 सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. अतिशय मुद्देसूद आणि माहितीपूर्ण तरीही संक्षिप्त असा वाचनीय लेख. धन्यवाद. शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. जयंत नारळीकरांवरचा माहितीपूर्ण लेख.. सुंदर शब्दांची मांडणी. धन्यवाद

    ReplyDelete
  3. जयंत नारळीकर सरांविषयी तुम्ही लिहलेले लेख वाचून धन्य वाटले व आयुका येथील त्यांच्यासोबत झालेल्या भेटीचे स्मरण झाले...
    🙏🙏आदरणीय जयंतराव नारळीकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

    ReplyDelete
  4. माहीत नसलेला पैलू सांगीतले.खुप छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची