पुस्तक परिचय : गोष्ट नर्मदालयाची

 गोष्ट नर्मदालयाची 

लेखिका प्रव्राजिका विशुद्धानंदा 

(भारती ठाकूर )

प्रकाशक विवेक प्रकाशन 

 


       ' सत्य संकल्प का दाता भगवान है ' या उक्तीचे स्मरण हे पुस्तक वाचताना मला वारंवार होत होते. गोष्ट ऐकायला तर सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे जगामध्ये सर्व भाषांमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी आजपर्यंत सांगितल्या गेल्या आहेत. त्यातील अनेक गोष्टी या काल्पनिक आहेत. तशाच अनेक गोष्टी प्रत्यक्ष घडलेल्यादेखील आहेत. प्रत्यक्ष घडलेल्या काही गोष्टी अशा असतात की त्या काल्पनिक आहेत असे वाटू लागते परंतु त्या मात्र सत्य असतात. अशाच प्रकारची ही गोष्ट आहे नर्मदालयाची.

        भारतामध्ये पश्चिम वाहिनी नदी नर्मदा हिची परिक्रमा करण्याची पद्धत शतकानुशतके चालत आली आहे. नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या नोकरीत असताना एके दिवशी भारती ठाकूर यांना ही परिक्रमा करण्याची प्रेरणा झाली आणि २००५-२००६ मध्ये त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमा करत असताना जे अनुभव आले त्यावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले. परंतु त्या परिक्रमेतून सर्वात महत्त्वाचा बदल घडला तो म्हणजे, ' मी अंतर्मुख झाले' असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.

       नर्मदा माता आणि तिच्याभोवतीचा वंचित समाज यांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. अंतरात्म्यातून आलेल्या हाकेला त्यांनी हो दिली आणि २००९ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेऊन नर्मदा किनारी असलेल्या मंडलेश्वर गावात जाऊन राहायला सुरुवात केली. ' शिक्षणासाठी काम करायचे' एवढी एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात निश्चित होती. परंतु कोणताही आराखडा मात्र निश्चित नव्हता. काय करायचे कसे करायचे हे माहित नव्हते.  सुरुवातीला काही काळ त्यांनी मंडलेश्वर गावातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे असा प्रयोग सुरू केला.  हक्काची सरकारी नोकरी करणाऱ्या त्या शाळेतील कामचुकार शिक्षकांचा अनुभव वैतागवाणा ठरला. स्वतःच नवी वाट तयार करायची असे ठरले. त्यातून आठ किलोमीटर दूर असलेल्या लेपा या गावात जाऊन तेथील मुला-मुलींना शिक्षणाची गोडी लावण्याचा प्रयत्न सुरू झाला. नर्मदेवरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या त्या गावात सरकारी सेवांचा अभाव होता. शिक्षणाविषयी अत्यंत अनास्था होती. कमालीचे दारिद्र्य होते. ऐतखाऊ पुरुष मंडळींची व्यसनी वृत्ती होती. जात पात , स्पृश्य अस्पृश्यता याचा पगडा होता. अशा विपरीत परिस्थितीत त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.

        सर्वच गोष्टी विपरीत होत्या. परंतु एक गोष्ट मात्र ठाम होती ती म्हणजे ' आपल्याला हेच कार्य करायचे आहे' हा निश्चय ! या ठाम निश्चयानेच हळूहळू परिस्थिती बदलत गेली. सुस्वाभावी सज्जन लोक भेटत गेले. त्यांची मदत आवश्यक त्या ठिकाणी कोणतीही योजना न करता परंतु अचूकपणे मिळत गेली. विद्यार्थ्यांबद्दल तेथील समाजाबद्दल असणारी भारतीताईंची अत्यंत आपलेपणाची भावना,  त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विशेषतः त्यांच्या आयांना लवकर उमगली. त्यातून कार्य वाढत गेले. जेमतेम १४ मुलांनिशी सुरू झालेले कार्य दीड वर्षातच पाच गावात ६०० मुलांपर्यंत पोहोचले. 

    यामध्ये अनेक अनुभव आले. त्यांनी काळीज पिळवटून निघाले. वडिलांनी वेळेवर औषधोपचार न केल्यामुळे पाय कुजून गँगरीन होऊन मृत्युमुखी पडलेला मुलगा, अत्यंत गरीब घरात जन्माला आलेले जन्मतः कावीळ झालेले पाच दिवस कोणतेही उपचार न मिळालेले लाकडासारखे कडक झालेले अर्भक दवाखान्यापर्यंत हातात घेऊन जावे लागणे, तिथे ते मृत आधीच झाल्याचे डॉक्टरांनी सांगणे असे अनेक अनुभव. त्यातून धक्का बसला परंतु मूळ निश्चय अधिक पक्का होत गेला. आणि वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन उपक्रम सुरू झाले. अर्थातच त्याला मदत करणारे हात देखील न मागता पुढे झाले. त्यामध्ये वयोवृद्ध असणारे खोचे काका आणि काकू, तिथल्या धरण प्रकल्पाचे व्यवस्थापक असणारे गांगुली, ज्यांच्याशी कधीच बोलणे झाले नाही परंतु स्वतःहून ज्यांनी आपला आश्रम स्वाधीन केला असे तलवारबाबा , नाशिकमधील स्नेही मंडळी, सख्खी भावंडे , जसजशी माहिती वेगवेगळ्या मार्गाने पोहचत गेली तसतसे जोडत गेलेले ठिकठिकाणचे हितचिंतक असे अनेकजण होते. या सगळ्याच्या आधारावर नर्मदालय प्रकल्पाची वाटचाल पुढे पुढे जात राहिली.

       या पुस्तकाची लेखन शैली सहज, प्रभावी, हितगुज केल्यासारखी, गोष्ट सांगितल्यासारखी आहे. त्यातच एक वैशिष्ट्य आहे ती म्हणजे 'सखी' ! सखी ही वेगळी कोणी नसून हा लेखिकेच्याच अंतर्मनाचाच एक भाग आहे. तो प्रत्येक घटनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिकवतो. प्रसंगी धीर देतो. सल्ला देतो. प्रेरणा देतो. हा संवाद लेखिकेचा आंतरिक विचार प्रवाह उलगडून दाखवणारा आहे.

        अनेक प्रसंग त्याच्यातील विलक्षणतेमुळे लक्षात राहतात. असे काही प्रसंग म्हणजे रात्रीच्या अंधारात लेखिकेच्या खुर्ची खाली येऊन बसलेली घोरपड , टेबलवरील पुस्तकांवर येऊन बसलेला विषारी साप, नर्मदालय प्रकल्पाला मदत म्हणून चित्रे काढून देण्यासाठी आलेल्या कदम यांच्याकडे अपरात्री काम चालू असताना येत असलेला काळा विंचू. पण या सर्व प्रसंगी ईश्वराचीच कृपा असल्यामुळे प्रसंग निभावले. अंत:प्रेरणेतून जणू पूर्व सूचना मिळाव्या आणि गोष्टी घडाव्या अशा घडलेल्या अनेक गोष्टी. ज्यामध्ये शाळेचे बांधकाम चालू आहे तिथे असलेली प्राचीन मूर्ती हलवण्याचा गुन्हा करण्याबद्दल तक्रार नोंदवण्यासाठी आलेला सरकारी अधिकारी तक्रार लिहायला सुरुवात करणार त्या क्षणी भारतीताईंचे तिथे पोहोचणे, आठवडाभरानंतर भेटण्याआधीच फडके आजी यांना भेटण्यासाठी पुण्यात येणे, त्यांची भेट होणे, त्यांनी आपुलकीने मदत करणे आणि दोन तासातच त्यांचे निधन होणे असे अनेक प्रसंग विलक्षण योगायोगाचे आहेत. 

     नर्मदा नदीच्या परिसरातील मुलामुलींच्या शिक्षणाचे काम करीत असताना शिक्षणाच्या साचेबद्ध विशेषतः शहरी पद्धतीच्या शिक्षणाच्या कल्पना मोडीत काढून मुलांना आवश्यक असे त्यांच्या कलागुणांना, कौशल्याला वाव देणारे असे शिक्षण देण्याचा प्रयोग सिद्ध होत गेला. आपुलकीच्या भावनेने वेगवेगळी माणसे जोडली गेली. सर्वांनी शुद्ध भावनेने काम केल्यामुळे शिकणाऱ्या मुलामुलींवर देखील त्याचा चांगला परिणाम झाला. त्यातूनच गाण्याच्या स्पर्धेत मिळालेले पैसे स्वतःसाठी न वापरता ते नर्मदालयाच्या गरजेसाठी वापरण्याची मुलींनी स्वतःहून दाखवलेली तयारी , गोशाळेतील दिवस भरत आलेल्या गाईचे बाळंतपण मी करतो असे आत्मविश्वासाने सांगणारा नववीतील विद्यार्थी, रोज पैसे देणारे पण व्यसनांकडे वळवणारे काम सोडून मला परत नर्मदालयात यायचे आहे असे सांगणारा विद्यार्थी असे अनेक प्रसंग मनावर ठसतात. 

       सरकारी यंत्रणांमधील काही लाचखोर माणसांशी झालेले संघर्ष हे चीड उत्पन्न करतात. पण आपली मूळची भूमिका शिक्षण देण्याची असून कोणाचेही मूल्यमापन करण्याची नाही ही जाणीव मनात सतत ठेवून त्या कार्य करत राहिल्या. याच सरकारी यंत्रणेमध्ये काही भली माणसेदेखील भेटली. त्यांनी स्वतःहून मदत केली. त्याचादेखील कृतज्ञ उल्लेख या पुस्तकामध्ये आढळतो 

     नर्मदालयाची गोष्ट सांगताना त्यामध्ये कोठेही आत्मप्रौढी येऊ न देण्याची शैली विलक्षण आहे. आपल्यावर सतत रामकृष्ण परमहंस, शारदा माता यांची कृपा आहे. त्यांच्या कृपेने संकटांमधून सहज मार्ग निघतो आहे. ही जाणीव सतत व्यक्त होत राहते. ही गोष्ट सांगत असतानाच कळत नकळत तेथील समाज जीवनाचे चित्रणदेखील या पुस्तकात वाचायला मिळते. त्यातून तेथील परिस्थिती कशी आव्हानात्मक आहे, दुःखदायक आहे हे सर्व समोर येते. परंतु या सगळ्याबाबत केवळ हळहळ व्यक्त न करता आपल्याला मार्ग दृढपणे चालत राहण्याचा निश्चय दिसतो. 

    आंतरिक ओढीतून आपल्या हातून सुरू झालेले कार्य हे आपल्या एकटीचे कर्तृत्व नाही त्यामागे सद्गुरूंची कृपा आहे आणि संन्यास स्वीकारणे हे आपले इप्सित आहे ही लेखिकेची भूमिका. प्रकल्पाची बारा वर्षांची वाटचाल ते लेखिकेने संन्यास घेणे इथपर्यंतची वाटचाल या पुस्तकात सांगितली गेली आहे. प्रख्यात मानसतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना आणि प्रसिद्ध शिक्षण तज्ञ डॉ.स्वर्णलता भिशीकर यांचा अभिप्राय या पुस्तकाचे वाचनमूल्य वाढवतो. विलक्षण प्रेरणा देणारे हे पुस्तक अवश्य वाचावे असे आहे. 

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. सुंदर विश्लेषण केले पुस्तकाचं... 🙏

    ReplyDelete
  2. सुंदर विश्लेषण.......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची