आचार्य अत्रे यांच्या घरगुती आठवणी

    प्रसिद्ध व्यक्तिंच्या खाजगी आयुष्याबद्दल स्वाभाविकपणे अनेकजणांना कुतुहल असते. आचार्य अत्रे यांच्या आयुष्याबाबतदेखील त्या काळात अनेक लोकांना कुतुहल होते. त्यांच्या कन्या प्रसिद्ध साहित्यिक शिरीष पै यांनी नियतकालिके , वृत्तपत्रे आणि  'पपा' या आपल्या पुस्तकात आचार्य अत्रे यांच्या घरगुती अनेक आठवणी लिहून या कुतुहलाचे काहीसे शमन केले आहे. 'कवी दिसतो कसा आननी?' यांसारख्या प्रश्नाचे काही उत्तर त्यातून मिळते.


( आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि मीना देशपांडे. छायाचित्र हर्षा देशपांडे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार )

    ‌‌ मनस्वी जगणारे, चांगल्याचे भरभरून कौतुक करणारे आणि आपल्या विरोधकांवर आवेशाने तुटून पडणारे अत्रे घरगुती वातवरणात प्रेमळ पती, पिता, आजोबा अशा अनेक भूमिका पार पाडत होते. मुलींच्या विवाहांदरम्यान आनंदाने भावूक होऊन अश्रू गाळत होते. त्यांचे कोडकौतुक करत होते. परदेशी गेल्यावर आवर्जून नातवंडांसाठी भेटवस्तू, खेळणी आणत होते. 

      शिरीष पै आवर्जून लिहितात की त्या लहान असताना दिवसा माणसांच्या गराड्यात असलेले हास्याची कारंजी विनोदाचा धबधबा उसळवणारे त्यांचे पप्पा जसे त्यांना भावत असत तसेच रात्री दिवाणखान्यात एकटेच बसून एकाग्रतेने लेखनात गुंग झालेले पप्पादेखील त्यांना भारावून टाकत. कधी कधी झपाटा दाखवून सर्व कामांचा फडशा पाडणारे त्यांचे पप्पा कधी कधी इतके आळसावत की नुसते गादीवर लोळत राहत आणि गुळ शेंगदाणे हा आवडीचा खाणे संपवत राहत. उत्कृष्टतेचा विलक्षण ध्यास त्यांच्या पप्पांना होता. जे काही करायचे , आणायचे किंवा मिळवायचे ते उत्कृष्ट असा त्यांना ध्यास असे. त्यामुळे अतिशय उत्कृष्ट महागड्या वस्तू ,कपडे ते सहजी खरेदी करत असत. परंतु अशा गोष्टींची काळजी मात्र ते घेत नसत निष्काळजीपणे त्या वस्तू वापरत.

       आचार्य अत्रे आपल्या दोन्ही मुलींच्या लग्नात भाव व्याकुळ झाले होते. त्यावेळी त्यांच्यातील वात्सल्याचे हृद्य दर्शन मुलींना घडले. या दोनही मुलींच्या विवाह प्रसंगी अत्रे आलेल्या पै पाहुणे निमंत्रित नातेवाईक यांच्यासोबत जेवायला बसले नाहीत. तर सर्व पंगती उठल्यानंतर वाढपी नोकर यांच्यासोबत जेवायला बसले. त्यांच्यातल्या माणुसकीचे दर्शन घडवणारीच ही कृती!

        शिरीष पै यांना आपण लिहिलेल्या लेखाचा अनुवाद करायला अत्रे यांनी सांगितले. तो अनुवाद केल्यानंतर अत्रे यांनी मुलीचे भरभरून कौतुक केले. शिरीष पै यांच्यातील लेखनाचा गुण बरेच दिवस अत्रे यांना माहीत नव्हता. परंतु एका स्पर्धेसाठी शिरीष पै यांनी पाठवलेल्या कथेला बक्षीस मिळाल्यानंतर हा गुण अत्रे यांना समजला. त्याचा त्यांना विलक्षण आनंद झाला. त्यांनी सदोदित आपल्या मुलीला लेखनासाठी प्रोत्साहन दिले. तिचे तोंड भरून कौतुक आल्या गेल्या सर्वांजवळ केले. (आचार्य अत्रे यांच्या दुसऱ्या कन्या मीना देशपांडे यादेखील साहित्यिक होत्या.)

          ' श्यामची आई ' हा आचार्य अत्रे यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला चित्रपट प्रदर्शित झाला. त्या सुमारास त्यांच्या आईचे निधन झाले. तिच्या अस्थी गंगेत विसर्जनासाठी घेऊन गेले असताना याच चित्रपटाला राष्ट्रपतींचे प्रथम पारितोषिक मिळाले. ते पारितोषिक घेऊन अत्रे परत मुंबईत आले. त्यावेळी नुकताच शिरीष पै यांच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला होता. त्याच्या गळ्यात त्यांनी ते पदक अतिशय प्रेमाने घातले आणि चुंबन घेतले. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले याची आठवण राहावी म्हणून या नातवाचे नाव राजेंद्रप्रसाद असे ठेवले. लाडाने राजू असे संबोधत असत. राजूने काही मागावे आणि अत्रे यांनी ते पुरवावे. असे आजोबा नातू यांचे मेतकूट होते. एके वेळी आईच्या हातून न जेवणारा लहानगा राजू आपल्या आजोबांच्या हातून जेवला. तो रांगू लागला. त्यावेळी कौतुकाने आचार्य अत्रे देखील घरभर रांगले आणि आपल्या नातवाचे त्यांनी कौतुक केले. 

      आपल्या सर्वच नातवंडांवर अत्रे यांचे भरभरून प्रेम होते. लंडनला व्याख्यानासाठी गेले असतांना परत आल्यावर आठवणीने त्यांनी सर्वांसाठी काही ना काही भेटवस्तू आणल्या होत्या. ज्यांच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या त्यामध्ये पत्नी, मुली, जावई नातवंडे यांच्याबरोबरच घरातील नोकरचाकर मंडळींचा देखील समावेश होता. त्यामुळे सर्वांवर लोभ असणारे अत्रे आपल्याला दिसून येतात. 

     आचार्य अत्रे यांचे पाळीव कुत्र्यांवरतीदेखील प्रेम होते. अनेक कुत्रे त्यांनी पाळले. पण त्यातील जॅक नावाचा एक कुत्रा मात्र त्यांच्या अतिशय जवळचा होता. ते कौतुकाने त्याचे लाड करीत. त्याला शिकवण्यासाठी एक प्रशिक्षकदेखील नेमण्यात आला होता. स्वतःला आवडणारे पेढे अत्रे जॅकला भरवत असत. तो देखील त्यांचा फन्ना उडवीत असे. मग अत्रे म्हणत की,‌ " मी एक शोध लावला आहे. कुत्र्यांना मटणापेक्षा गोड पदार्थ जास्त आवडतात." या जॅकला घेऊन अत्रे एकदा नाटकासाठी गेले. जॅकने संपूर्ण नाटक शांतपणे बघितले याचे त्यांना फार कौतुक वाटले. ते सर्वांजवळ त्यांनी बोलून दाखवले. नंतर एकदा व्याख्यानाला जाताना आचार्य अत्रे जॅकला आपल्या गाडीतून घेऊन गेले त्याला. गाडीत सोडून वर सभागृहात व्याख्यानासाठी गेले. पण आचार्य अत्रे यांचे व्याख्यान सुरू झाले आणि जॅक गाडीतून उतरून धावत जाऊन व्यासपीठावर आचार्य अत्रे यांच्या पायाशी बसला. त्याने ते पूर्ण भाषण ऐकले. हीदेखील आचार्य अत्रे यांच्यासाठी अतिशय कौतुकाची बाब ठरली. या दोघांच्या जिव्हाळ्याचे संबंध दोन्ही बाजूने होते. शेवटच्या काळात जॅकचा धक्का लागून आचार्य अत्रे पडले आणि त्यांचा पाय मोडला. तरी त्यांनी जॅकला घरातून काढू दिले नाही. आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर जॅक सैरभैर झाला. काही दिवसांनंतर आचार्य अत्रे यांची रेकॉर्ड केलेली भाषणे ऐकून त्याला अत्रे असल्याचाच भास झाला. तिथेच तो घुटमळत राहिला.

    आचार्य अत्रे हे गर्दीत रमणारे आणि एकटेपणा हवे असणारे असे होते.कधी कधी ते एकटेच आपल्या खंडाळ्याच्या बंगल्यावर निघून जात. त्यावेळी शिरीष पै त्यांना म्हणाल्या की, "पप्पा ,तुम्हाला एकटेपणाचा कंटाळा येत नाही का?" त्यावर आचार्य अत्रे म्हणाले, " अशा वेळी मी एकटा नसतो. मला माझीच सोबत असते आणि मी माझ्याशीच गप्पा मारत असतो." सर्जनशील व्यक्तीचा मनस्वीपणा या उत्तरातून दिसतो. पण हेच अत्रे एकटे फार काळ राहू शकत नसत. खंडाळ्याला गेले की लवकरच फोन लावून खंडाळ्याला आपण असल्याची बातमी अनेकांना सांगत. त्यांना बोलावून घेत आणि पुन्हा एकदा माणसांच्या गर्दीत रमून जात.

       आचार्य अत्रे यांचे हे घरगुती दर्शन मनाला स्पर्श करून जाते. प्रचंड कर्तृत्व गाजवलेल्या माणसात देखील सामान्य माणसासारख्याच भावभावन आढळून येतात हे समजते.

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची