आचार्य अत्रे यांची पत्रकारिता
आचार्य अत्रे यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रातलादेखील प्रवेश अतिशय योगायोगाने झाला. सुरुवातीला शिक्षण क्षेत्र, नाट्य क्षेत्र व्याख्याने यामधून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले होते. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कारणांनी त्यांनी त्यावेळी चालू असलेल्या नियतकालिकात लेखन केले होते. परंतु स्वतः पत्रकार क्षेत्रात प्रवेश केला नव्हता.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
नवयुग चित्रपट कंपनीची स्थापना करताना अत्रे यांचा संबंध बापूराव राजगुरू यांच्याशी आला. राजगुरू हे 'राष्ट्रीय सुविचार प्रसारक मंडळी' यांच्या वतीने प्रसिद्ध होणारे ' दैनिक लोकशक्ती' हे वर्तमानपत्र चालवित असत. अचानकपणे हे काम त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. परंतु संपादक आणि इतर कर्मचारी यांना मात्र संस्थेने कामावर घ्यायचे नाकारले. आचार्य अत्रे राजगुरू यांच्यासोबत या सर्व लोकांना भेटायला गेले असतांना त्यांच्यावर कोसळलेली बेकारीची कुऱ्हाड लक्षात घेऊन आचार्य अत्रे यांनी 'मी साप्ताहिक सुरू करतो.' असे आश्वासन दिले. काही दिवसातच त्यांनी 'नवयुग' हे साप्ताहिक सुरू केले. हे वर्ष होते १९४०.
त्या काळात वृत्तपत्रांपेक्षा साप्ताहिकांचा खूप हा जास्त असे हे लक्षात घेऊन अत्रे यांनी देखील साप्ताहिक सुरू केले. त्या काळाच्या इतर वृत्तपत्र आणि साप्ताहिक यांच्यामध्ये कला, काव्य,विनोद यासारख्या गोष्टींना जास्त महत्त्व दिले जात असे. परंतु राजकारणाकडे मात्र फारसे लक्ष कोणी देत नसे. त्याविषयीचे लिखाण फार होत नसे. १९३८ मध्ये आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेवर काँग्रेसच्या वतीने सभासद म्हणून निवडून आले होते. तसेच ते स्थायी समितीचे अध्यक्ष देखील होते. आपली 'काँग्रेस कार्यकर्ता' ही भूमिका लक्षात ठेवून त्यांनी नवयुगमधून काँग्रेसच्या विचारांचा प्रसार करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर काँग्रेसच्या विचारांना विरोध करणाऱ्यांवर त्यांनी कठोर शब्दात टीका करायला सुरुवात केली. त्यांच्या संपादकात्वाखाली असलेल्या नवयुगमध्ये आधी अन्य एका लेखकाने आणि नंतर स्वतः अत्रे यांनी सावरकर यांच्या विचारांवर टीका केली. त्यातून अत्रे यांना दोन वेळा व्याख्यानांच्या निमित्ताने बोलावून केल्या गेलेल्या शारीरिक हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. तसेच आचार्य अत्रे यांच्या लेखनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायीदेखील अत्रे यांच्यावर रागावलेले होते. याशिवाय आचार्य अत्रे यांनी केलेल्या टिप्पणीमुळे मध्य प्रांताचे माजी मुख्यमंत्री डॉ.ना.भा. खरे यांनी आचार्य अत्रे यांच्यावर खटलादेखील भरला होता. परंतु तो खटला खरे यांच्याशी संवाद साधून संपवण्यात अत्रे यांना यश आले. भारतच्या स्वातंत्र्याच्या वेळी जसजसे धर्मांध मुस्लिमांचे अत्याचार वाढत गेले तस तसे अत्रे यांना काँग्रेस नेत्यांनी धर्मांध मुस्लिमांचे केलेले लांगूलचालन चुकीचे आहे हे लक्षात आले आणि हळूहळू त्यांची मते काँग्रेसच्या विरोधात गेली. भारताची फाळणी, त्या पार्श्वभूमी वरती झालेली लक्षावधी लोकांची, कत्तल माता-भगिनींवर झालेले अत्याचार, यातून तर काँग्रेसच्या धोरणाचे फोलपण अत्रे यांना लक्षात आले आणि ते पूर्णपणे काँग्रेसच्या विरोधी झाले. आपल्या नवयुग साप्ताहिकातून त्यांनी काँग्रेसवरती टीकेचे आसूड ओढले. या काळात आपण " लिहिले ते शाईने, नाही तर हृदयातील रक्ताने! लाव्हारसाने!" असे अत्रे यांनी म्हटले आहे.
ही पत्रकारिता करत असताना त्यांचे साहित्यिक प्राध्यापक ना सी फडके यांच्याशी देखील वाद झाले या वादांसाठी अत्रे यांनी नवयुग यामधून तर फडके यांनी त्यांच्या झंकार या साप्ताहिकातून एकमेकांवरती टीका केली बराच काळ चाललेला वाद हा नंतर अन्य काही साहित्यिकांच्या पुढाकाराने संपला.
याच दरम्यान काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 'शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष नाहीत' अशा आशयाचे महाराजांचे अवमान काढणारे करणारे उद्गार काढले होते. याच सुमारास अहिल्यानगर येथे झालेल्या मराठी पत्रकार संमेलनात या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. काही जणांनी हा विषय 'मराठी पत्रकार संमेलनाचा नाही' अशी भूमिका घेतली. त्यावेळी अत्रे यांनी जोरदार भाषण करून 'शिवाजी महाराज नसते तर आपल्याला उर्दू मधून लिहावे लागले असते' असे सांगून ठरावाला विरोध करणाऱ्यांची भंबेरी उडवून दिली. नंतर तो ठराव संमत झाला.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशभर भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागली. काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व विशेषतः पंडित नेहरू यांचा भाषावार प्रांत रचनेला विरोध होता. नेहरू यांचीच भूमिका राज्य पातळीवरचे नेते पुढे नेत होते. या विरोधात आचार्य अत्रे यांनी नवयुग मधील लेखांमधून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. हळूहळू संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोर धरू लागली. या चळवळीच्या प्रसारासाठी वृत्तपत्राची आवश्यकता भासू लागली. त्यातून कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या भरीव मदतीमुळे 'मराठा' नावाचे वृत्तपत्र १९५६ मध्ये आचार्य अत्रे यांनी सुरू केले. या वृत्तपत्राला 'मराठा' हे नाव सेनापती बापट यांच्या सूचनेनुसार देण्यात आले होते. मराठा वृत्तपत्रातून आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा अधिक धारदार केला. त्यांचे सोप्या भाषेतील तर्कशद्ध विचार समाजाच्या तळागाळात पोचले. त्यातून समाजात अधिक जागृती होत गेली. या सगळ्या चळवळीचे पर्याय संयुक्त महाराष्ट्रात झाले आणि आचार्य अत्रे यांना काहीसे समाधान मिळाले. रुखरुख याची राहिली की बेळगाव , कारवार डांग हे प्रदेश मात्र महाराष्ट्रात जोडले गेले नाहीत.
वर्तमानपत्र चालवीत असताना अत्रे यांना वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले. एकदा तर अन्य सर्व वर्तमानपत्रांच्या कामगारांनी संप केला. परंतु मराठा मध्ये संप झाला नाही. याचे कारण अत्रे आपल्या कामगारांना वेळेवर, चांगला पगार देत असत. वर्तमानपत्राचे आर्थिक गणित जमवताना खूप अडचणी अत्रे यांच्या पुढे उभ्या राहिल्या. एके प्रसंगी छापखाना विकण्याची देखील पाळी आली. परंतु या सगळ्यात अत्रे मात्र डगमगले नाहीत. ते आपले काम निष्ठेने करीतच राहिले.
आचार्य अत्रे यांनी आपल्या पत्रकार या भूमिकेतून केवळ राजकारणच मांडले असे नाही तर समाजात घडणाऱ्या बऱ्यावाईट गोष्टींना त्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली. अन्यायाला वाचा फोडली. सज्जन कृतिशील लोकांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले.
आचार्य अत्रे यांचे पत्रकार म्हणून केलेले योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात ठळकपणे नोंदवले गेले आहे.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
आचार्य अत्रे आणि पत्रकारिता, उत्तम सादरीकरण माझ्यासाठी आचार्य अत्रे यांचा पैलू नवा आहे.. 🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteआचार्य अत्रे आणि पत्रकारिता सुंदर लेखन केले आहे... सर
ReplyDeleteसर धन्यवाद
Delete