आचार्य अत्रे : विनोदी साहित्यिक

      विनोदी लिहिणे हे खूप सोपे आहे अशी बऱ्याच जणांची समजूत असते. परंतु विनोदी लिहिणे हे खूप अवघड असते असे आचार्य अत्रे आणि इतर अनेक साहित्यिकांनी वारंवार सांगितले आहे. आचार्य अत्रे यांना विनोदी लेखन सहजपणे जमत गेले याचे रहस्य त्यांच्या मूळच्या खोडकर स्वभावात आहे असे आपल्याला म्हणता येईल. शाळेमध्ये शिकत असताना सुट्टी मिळावी म्हणून उंदीर मारून शाळेत नेऊन टाकणे, दृष्टी अधू असलेल्या शिक्षकांच्या शेजारी उभे राहून वर्गात वाकुल्या दाखवणे, गुरुजींच्या उपरण्याचे टोक कापणे या आणि अशा पद्धतीच्या अनेक खोड्या त्यांनी केल्या यातून अनेक वेळा हशा पिकला तर काही वेळा आचार्य अत्रे यांना याबद्दल मारदेखील खावा लागला.


         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

 परंतु मूळ विनोदी खोडकर स्वभाव केवळ एवढेच असून चालत नाही. तर आचार्य अत्रे म्हणतात तसे , "ज्याला जीवनातील ताल आणि तोल समजतो तोच विनोदी लिहू शकतो." याचबरोबर जीवनाचा असलेला वैविध्यपूर्ण अनुभव हीदेखील आचार्य अत्रे यांची भक्कम जमेची बाजू आहे. त्या आधारावर त्यांना विनोदी लेखन करता आले. हे लेखन अतिशय लोकप्रिय झाले.

          लहानपणापासून आचार्य अत्रे यांनी यांना कविता करण्याचा छंद होता. आपल्या घरातील एका महिलेवर त्यांनी विनोदी पद्धतीने कविता लिहिली होती. तसेच वडिलांच्या परिचयातील एका लंगड्या माणसावर इंग्रजीमधून कविता लिहिली होती. त्यातून आपण असे काही लिहू शकतो याचा अंदाज त्यांना आला.

    पुढे १९११ मध्ये आचार्य अत्रे शिक्षणासाठी पुण्यात आले. ते भावे हायस्कूलमध्ये शिकू लागले. त्यावेळी बालकवी ठोंबरे आणि राम गणेश गडकरी या दोन्ही साहित्यिकांचे लहान भाऊ त्यांच्या वर्गात शिकत होते. या दोघांच्या माध्यमातून अत्रे यांचा बालकवी आणि गडकरी यांच्याशी परिचय झाला. या दोन्ही साहित्यिकांच्या शैलीचा वेगवेगळ्या पद्धतीचा प्रभाव पत्रे यांच्या लेखनावर पडला. त्यातून ते प्रामुख्याने कविता लिहू लागले. त्या काळात वेगवेगळ्या मासिकांमध्ये अत्रे यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. या कविता प्रामुख्याने हळुवार भावना व्यक्त करणाऱ्या होत्या. 

    १९१९ मध्ये बालकवी आणि गडकरी यांचे थोड्या कालावधीच्या अंतराने निधन झाले आणि अत्रे यांच्या भावविश्वाला मोठा धक्का बसला. १९२० च्या सुमाराला फर्ग्युसन कॉलेजमध्ये फारसी भाषेचे प्राध्यापक असणारे माधवराव पटवर्धन यांच्या पुढाकाराने 'रविकिरण' हे कवींचे मंडळ स्थापन झाले. माधवरावांनी कवितेसाठी माधव जुलियन हे नाव घेतले होते. त्यांच्या रचनेवर फारसी भाषेचा प्रचंड पगडा होता. ते मिश्र भाषेमध्ये कविता लिहीत. 'वंदे त्वमेकम् अल्लाहु अकबर' अशा प्रकारच्या रचना ते करीत. त्यांचा प्रभाव रविकिरण मंडळातील अन्य कवींवर देखील पडला. तशाच पद्धतीची रचना इतर कवीही करू लागले. आचार्य अत्रे आणि इतर अनेक काव्यरसिक यांच्या काव्यविषयक कल्पनांना धक्का देणारे हे काव्य होते. त्यामुळे वाचकांमध्ये खूप खळबळ निर्माण झाली.

     १९२२ च्या मे महिन्यात आचार्य अत्रे आपल्या शिक्षक सहकाऱ्यांबरोबर गप्पा विनोद करीत बसले होते. त्यावेळी या मंडळींच्या हाती रविकिरण मंडळाचे नव्यानेच प्रसिद्ध झालेले कवितांचे एक पुस्तक लागले. त्यातील कविता विनोदी पद्धतीने आचार्य अत्रे वाचून दाखवू लागले. यातून खूप हशा पिकला. असा प्रकार सलग दोन चारदिवस चालू होता. यातूनच अचानक आचार्य अत्रे यांना स्फूर्ती झाली आणि त्यांनी या कवितांच्या चालीवरती त्यांच्या विडंबन करणाऱ्या कविता रचल्या. सुमारे आठ दिवसाच्या कालावधीत यातील अनेक कविता लिहिल्या गेल्या. याच कविता पुढे 'झेंडूची फुले' या नावाने लिहिलेल्या काव्यसंग्रहात प्रसिद्ध झाल्या. या विडंबन काव्यात आचार्य अत्रे यांनी कवीच्या शैलीचे विडंबन तर केले आहेत परंतु काही प्रसंगी त्यांनी कवीच्या वैयक्तिक गोष्टींवर देखील विडंबनात्मक टीका केली आहे. ' सदंगी माझ्या सत्कोट , सत्पगडीचा वर थाट, ' आम्हि असू लाडके संपादकांचे, आम्हाला वगळा निष्प्रभ होतील मासिके', 'कषायपेयपात्र पतित मक्षिकेप्रत'( चहाच्या कपात पडलेल्या माशीला उद्देशून ), 'चिंचेच्या झाडावर चंदू चढला 'अशा अनेक कविता या काव्यसंग्रहात होत्या. या विडंबन काव्याला १९२७ मध्ये पुण्यामध्ये भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात खूप प्रसिद्धी मिळाली आणि विडंबनकार म्हणून आचार्य अत्रे हे प्रसिद्धीस आले. ही प्रसिद्धी पुढे वाढतच गेली.

     विडंबन करताना काव्यरचनेच्या तंत्रावरती हुकूमत असणे अतिशय गरजेचे आहे असे आचार्य अत्रे म्हणतात. त्यासाठी ते सर्कशीतील विदूषकाचे उदाहरण देतात. सर्कशीतील विदूषक घोड्यावरून पडण्याचा आभास निर्माण करून हशा पिकवतो. परंतु तो मुळात चांगला घोडेस्वार असतो. तसेच विडंबनकार हा काव्य रचना करण्यात प्रवीण असला पाहिजे. तरच तो चांगला विडंबनकार होऊ शकतो असे आचार्य अत्रे म्हणतात. 

    विडंबन काव्याबरोबरच आचार्य अत्रे यांनी नाटके लेख यांच्या माध्यमातून देखील विनोदी साहित्य निर्माण केले आहे. हे साहित्य लिहिताना त्यांना आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी आढळलेल्या विसंगतीचा उपयोग झाला. लोक बोलतात एक आणि वागतात मात्र दुसरे या विसंगतीचा किंवा दांभिकपणाचा आचार्य अत्रे यांना तिटकारा होता. ही विसंगती हेच आचार्य अत्रे यांच्या विनोदी लेखनाचे भांडवल ठरले. याबरोबरच परिचयातील काही व्यक्तींच्या विनोदी सवयी, लकबी यांचादेखील उपयोग आचार्य अत्रे यांना झाला. यातून त्यांनी प्रेमवीर, अवधूत आणि गोकर्ण, औदुंबर आणि चंडीराम, जाफराबादचा जहागीरदार, बगाराम अशी जवळपास साठ विनोदी पात्रे निर्माण केली. या पात्रांनी‌ समाजाला खळखळून हसवले.

   याचबरोबर अत्रे यांनी मराठी तसेच इंग्रजी वाङ्मयाचे विपुल वाचन केले. त्याचबरोबर त्या काळात प्रसिद्ध असणाऱ्या अनेक वक्त्यांची भाषणे ऐकली. त्यामधील दादासाहेब खापर्डेकर, अच्युतराव कोल्हटकर या दोघांच्या विनोदी शैलीचा प्रभाव अत्रे यांच्यावर पडला. तसेच इंग्लंडमध्ये शिकत असताना येथील सरकारी अधिकारी बी.पी. बेलॉर्ड यांच्या विनोदी वक्तृत्व शैलीचा देखील परिणाम आचार्य अत्रे यांच्यावर झाला. 

   आचार्य अत्रे यांच्या विनोदी लेखनामध्ये त्यांच्या जीवनानुभवाचादेखील मोठा वाटा आह. आचार्य अत्रे यांनी असे म्हटले आहे की 'मला जे व्हायचे होते ते होता आले नाही आणि जे करायचे होते ते करता आले नाही. योगायोगाने मी वेगवेगळ्या क्षेत्रात ओढला गेलो.' वकील बनण्याची इच्छा असणारे अत्रे प्रसिद्ध शिक्षक झाले. योगायोगाने नाटके लिहू लागले  त्या प्रसिद्धीने राजकारणात सहभागी झाले. योगायोगाने चित्रपट, पत्रकारिता या क्षेत्रात सहभागी झाले. स्वातंत्र्याची चळवळ, रक्तरंजित फाळणीच्या वेदना, आपल्या मराठी भाषेचे राज्य व्हावे यासाठी उभारावी लागलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या सर्वांमध्ये ते ओढले गेले. आयुष्याचे खूप विविधरंगी, बहुढंगी अनुभव आचार्य अत्रे यांना आले. या सगळ्यातूनच त्यांच्या विनोदी लेखनाला, विडंबनाला, धारदार वाक्प्रहारांना, शब्दप्रचूर कोट्यांना भांडवल मिळाले आणि आचार्य अत्रे यांचे विनोदी लेखन बहरले. विनोदी लेखक म्हणून आचार्य अत्रे यांनी मराठी साहित्यावर अमीट ठसा उमटवला आहे. 

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. "ज्याला जीवनातील ताल आणि तोल समजतो तोच विनोदी लिहू शकतो'. लेखातले मनाला भावलेले वाक्य... सुंदर सादरीकरण सर🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची