पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मार्गदर्शक दीपशिखा

        काल पटलावर आपला ठसा उमटवून गेलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन एखाद्या दीपशिखेसारखे आहे. ही दीपशिखा तिच्या अंगभूत तेजाने तळपत आहे आणि समाजाला वाट दाखवत आहे. समाज जीवनाची उभारणी होताना काही जीवनमूल्यांची चौकट असणे नेहमीच आवश्यक असते. जगामध्ये वेगवेगळ्या मानव समुहांनी आपल्या समूहासाठी काही मूल्ये आपापल्या वाटचालीच्या, अनुभवांच्या आधारे निश्चित केली. ती जीवनमूल्ये पिढ्यानपढ्या संक्रमित होण्यासाठी काही पद्धती प्रथा परंपरा यांची निर्मिती केली. सर्व मानव समूहांना जगाच्या इतिहासात आपापले स्थान आहे. असाच एक प्राचीन मानव समूह भारतीयांचा आहे. भारताला हजारो वर्षांची जी अखंड परंपरा लाभली आहे. तशी परंपरा अन्य कोणत्या मानव समूहाला लाभली आहे याचे उत्तर नकारार्थी आहे. भारतीय मानव समूहाची जीवनमूल्ये ज्यांच्या जीवनात ओतप्रोत भरलेली दिसतात अशा महान व्यक्तींपैकी अहिल्याबाईंचे स्थान अद्वितीय आहे. 


         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

      भारतीय समाज जीवनाचा पाया अध्यात्माचा आहे. जीवनाचे अधिष्ठान जेवढे लौकिक असावे अशी कल्पना आहे तसेच ते अधिष्ठान आध्यात्मिकदेखील असले पाहिजे ही भारताची परंपरा आहे. अहिल्याबाईंच्या जीवनात अतिशय लहानपणापासून त्यांची आध्यात्मिक वृत्ती दिसून येते. भगवान शंकरांवर त्यांची दृढ भक्ती होती. हीच भक्ती व्रत वैकल्ये पूजा अर्चा यातून प्रकट होत राहिली. भारतीय समाजाने आपापल्या पद्धतीने श्रद्धापूर्वक आध्यात्मिक आचरण ठेवले पाहिजे. असे आचरणच भारताची ओळख टिकवून ठेवेल. यासाठी अहिल्याबाईंचे जीवन मार्गदर्शक आहे.

  पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे विवाहानंतरचे जीवन अतिशय संपन्न अशा होळकर परिवारात गेले. तशा अर्थाने त्यांच्या काळातील सर्व सुख सोयी त्यांच्यापुढे हात जोडून उभ्या होत्या परंतु या सगळ्या काळात त्यांनी आपले आचरण हे आदर्श ठेवले. आपल्या या दीर्घ जीवनात अध्यात्म स्वर आधारभूत असल्याने अहिल्याबाईंचे वर्तन सदैव संयमित राहिले.  विज्ञान ,तंत्रज्ञान ,समाज विचार यांच्यामुळे सुखोपभोगाची वेगवेगळी साधने, मार्ग माणसाला आज उपलब्ध आहेत. समाजाचा आर्थिक स्तर उंचावत जातो आहे. काही प्रमाणात यामुळे स्वैराचार वाढताना दिसतो आहे. उपभोगवादाचा अतिरेक होतो आहे.  संपन्नतेतून येणाऱ्या स्वैराचाराच्या पार्श्वभूमीवर अध्यात्मिकता जपत जीवन कसे जगावे हा अहिल्याबाई यांचा आदर्श मार्गदर्शक आणि अनुकरणीय असाच आहे. 

      समाज धारणा होत असताना, समाजाची वाटचाल पुढे पुढे जात असताना त्यामध्ये कुरीती निर्माण होतात. अशा कुरीती जपण्यामुळे काही जणांच्या वर अन्याय, अत्याचार होत जातात. परंतु काळाला आपल्या विचारांची जोड देऊन त्यात बदल करण्याचे सामर्थ्य धैर्यवान व्यक्तींमध्ये असते. अहिल्याबाईंनी आपल्या होळकर संस्थानात हुंडाबंदीचा काढलेला हुकूम हे त्याचेच निदर्शक आहे. यातून समाज धुरीणांना विचारशील राहून काल सुसंगत बदल करण्याचे मार्गदर्शन सदैव मिळत राहील. याबाबत एक विपरीत अनुभवदेखील आहे. आपला मुलगा मालेराव , नातू नाथ्याबा यांच्या अकाली मृत्यूनंतर आपल्या सुनांनी, चिमुरड्या नातसुनांनी सती जाण्याची अमानुष रूढी पाळू नये यासाठी अहिल्याबाईंनी प्रयत्न केले. परंतु ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. वयाने आपल्यापेक्षा लहान असलेल्या सुनांना सती जाताना बघण्याच्या दुःखाने अहिल्याबाईंच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. सामर्थ्यवान व्यक्तीच्या प्रयत्नांना अपयश येण्याचे हे दुःखद उदाहरण आहे. परंतु त्यात अहिल्याबाई यांचे प्रयत्न मात्र उठून दिसतात. 

      समाजाला दिशा देणाऱ्या समाजाची धारणा ठरवणाऱ्या समाज धुरीणांना देखील अहिल्याबाई यांचे जीवन मार्गदर्शक आहे. प्रजेच्या हितासाठी अहिल्याबाई यांनी एक शासक म्हणून वेगवेगळे प्रयत्न केले. प्रजेच्या सोयीसाठी वेगवेगळ्या वास्तु ,यंत्रणा उभारल्या. कोणताही निर्णय घेताना 'प्रजेचे हित' हाच त्यांचा मुख्य विचार असे. 'प्रजाहितदक्षता' हा गुण सर्व समाजधुरणांनी आचरणात आणावा असाच आहे. अन्यथा पद, अधिकार प्रतिष्ठान या सगळ्यामुळे अहंभाव उत्पन्न होऊन समाज विचार मागे पडण्याची शक्यता असते. अशा प्रकारची अनेक उदाहरणे इतिहासात ठीकठिकाणी बघायला मिळतात. परंतु विश्वस्त भूमिकेतून अधिकारांचा उपयोग करणे हे जीवनमूल्य सदैव मार्गदर्शक राहील.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तेजोमय व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!


सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा उल्लेख या लेखांमधून उत्तम रित्या सादर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏

    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तेजोमय व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!

    ReplyDelete
  2. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा
    "प्रजाहितदक्षता" या गुणाचा संदेश या लेखनातून मिळाला आहे ....खूपच सुरेख लेखन.... धन्यवाद सर 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची