महात्मा बसवेश्वर आणि श्रमप्रतिष्ठा
महात्मा बसवेश्वरांनी मांडलेल्या विचारांमध्ये श्रमप्रतिष्ठा हा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. जगण्यासाठी शारीरिक श्रम करणे आवश्यक आहे असा विचार त्यांनी सांगितले. या श्रमांतून उच्च स्थान प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले. कन्नड भाषेतील त्यांचे वचन आहे 'कायकवे कैलास'. कायक म्हणजे शारीरिक श्रम. कैलास म्हणजे उच्च स्थान (मोक्ष) !
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
जगभर मानव समुहात राहू लागल्यानंतर हळूहळू समाजात माणसांच्या श्रेणी पडल्या. कोणाला तरी श्रेष्ठ किंवा अभिजन मानले जाऊ लागले आणि कोणाला तरी कनिष्ठ किंवा नीच मानले जाऊ लागले. श्रेणी पाडण्याची किंवा मागण्याची जगभरातील पद्धत वेगवेगळी असली तरी पण सर्वत्र एक गोष्ट समान घडली. ती म्हणजे कनिष्ठ मानलेल्या गेलेल्या लोकांना श्रमाचे काम करणे भाग पडले. पण त्या श्रमांतून निर्माण झालेल्या संपत्तीचा उपभोग जास्त प्रमाणात श्रेष्ठ मानलेल्या लोकांनी घेतला. भारतात यात अजून एक भर पडली ती म्हणजे श्रमिक गटातील लोकांना अस्पृश्य मानले जाऊ लागले. मानवतेवरचा कलंक अशी समाजव्यवस्था निर्माण झाली. महात्मा बसवेश्वरांनी या सर्वांचा तीव्र विरोध केला. श्रमांना आणि श्रमिकांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे ही आग्रही भूमिका घेतली.
समाजातील श्रमिक वर्गातील लोकांची त्यांनी समतेचे, बंधुत्वाचे स्नेहाचे नाते जोडले. आपुलकीच्या व्यवहाराने त्यांच्याशी संबंध दृढ केले. या व्यवहाराने सर्व श्रमिक माणसे त्यांच्याकडे स्वाभाविकपणे आकर्षित झाली. त्यांच्या चळवळीत आपसूकच जोडली गेली. महात्मा बसवेश्वर यांचे केवळ शब्द नव्हते तर त्याला जोड होती ती रोकड्या व्यवहाराची. हे त्यांचे वेगळेपण होते.
माणसांला इतर प्राण्यांपेक्षा विशेष श्रम करण्याचे कौशल्य अवगत झाले आहे. त्यातून मानवी समाजात वेगवेगळ्या सुविधांची निर्मिती झाली. अर्थात यासाठी माणसाला स्वतःला कष्ट करावे लागले. तसेच यातील काही श्रमांसाठी त्याने प्राण्यांना माणसाळवले आणि त्यांच्याकडूनही कष्ट करवून घेतले. यातून समाज, संस्कृती घडत गेली.
महात्मा बसवेश्वरांनी जवळपास ९०० वर्षांपूर्वी श्रम प्रतिष्ठेचे तत्व आग्रहाने मांडले. पण आजही समाजात हे तत्व संपूर्णपणे स्वीकारले गेले आहे असे दिसत नाही. काहीजणांना अजूनही शारीरिक श्रम कमी प्रतिष्ठेचे वाटतात असे लक्षात येते. अशा व्यक्तींची मनोभूमिका बदलण्याची आवश्यकता आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न आवश्यक आहे. या प्रयत्नांमागे आपुलकीची भावना असणेदेखील आवश्यक आहे. या प्रयत्नांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कौशल्य निर्मितीसाठी शालेय शिक्षणात काही बाबींचा समावेश केला गेला आहे. त्यातून हे चित्र काही प्रमाणात हळूहळू बदलेल असे वाटते.
श्रम प्रतिष्ठेच्या तत्वाबाबत विचार करताना अजून एक मुद्दा आहे. समाज जसजसा घडत गेला तसतसा समाजात एक वर्ग निर्माण होत गेला तो म्हणजे ज्यांना उपजीविकेसाठी शारीरिक श्रम न करता बौद्धिक श्रम करावे लागतात. सर्व काळात सर्व समाजांत असे गट होते. आजही आहेत. अशा गटांच्या मनात श्रमांबद्दल प्रतिष्ठा असणे तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनात शारीरिक श्रमांना काही स्थान असणे यासाठी विचार आणि प्रयत्न आवश्यक आहेत.
श्रम प्रतिष्ठेच्या तत्वाला अजून एक आव्हान तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रगतीने निर्माण केले आहे. गेल्या काही शतकात क्रमाने औद्योगिक प्रगती होत गेली. तंत्रज्ञानाचा विकास होत गेला. हा वेग गेल्या काही दशकात खूप गतीने वाढला आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग सुरुवातीला मानवाचे श्रम कमी करणे हा होता. पण तो हळूहळू श्रमांसाठी माणसांची आवश्यकता भासू नये ,सगळे काम स्वयंचलित पद्धतीने व्हावे या दिशेने गेलेले दिसून येते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसते. सध्याचे अद्ययावत तंत्रज्ञान म्हणजे 'कृत्रिम बुद्धिमत्ता' ! या तंत्रज्ञानाच्या संभाव्य प्रगतीने मानवी जीवनात मोठ्या प्रमाणावर बदल घडणार आहेत. या पार्श्वभूमीवर श्रमांचे महत्व हे तत्त्व लक्षात घेऊन समाजरचना घडवण्याचे एक मोठे आव्हान मानवासमोर आहे. कमीत कम गुंतवणुकीत प्रचंड नफा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून जगाच्या व्यवहारावर प्रभाव पाडणाऱ्या भांडवलदारांच्या विचारात बदल होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाची प्रगती कितीही झाली तरी काही ना काही शारीरिक श्रम करावे लागतीलच. हे लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि श्रम करणारा माणूस यात समन्वय घडला पाहिजे. ' तंत्रज्ञानाने कष्ट करणाऱ्या माणसालाच कामातून काढून टाकले असे न होता तंत्रज्ञान माणसाचे कष्ट कमी होण्यासाठी सहाय्यक ठरावे. ' हे सूत्र दिशादर्शक आहे.
महात्मा बसवेश्वर यांच्या श्रमप्रतिष्ठेचे विचार सर्व समाजात कसे अमलात आणता येतील हे बघणे महत्वाचे आहे. हे समाजजीवनाला सर्वकाळ निश्चितच महत्त्वाची दिशा देतील.
कायकवे कैलास'. कायक म्हणजे शारीरिक श्रम. कैलास म्हणजे उच्च स्थान (मोक्ष) ! महात्मा बसवेश्वरांनी खूप सुंदर माहिती मांडली असं लेखात🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteमहात्मा बसवेश्वर यांच्या श्रमप्रतिष्ठेचे विचार ,
ReplyDeleteया आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये देखील समाजाला दिशा देण्याचे काम करील असे या लेखातून दिसून येते खूपच छान लेखन ...... सर 🙏🙏
सर धन्यवाद 🙏
Delete