उत्तराखंड सहलीतील अनुभव

     हिमालय पर्वत आणि गंगा नदी गेली हजारो वर्ष भारतीय माणसाला भुरळ घालीत आहे. या दोन्हीचेही पावित्र्य मनामध्ये खोलवर झिरपले आहे. त्यामुळे हरिद्वार हृषिकेश येथे सहलीला जायचे असा विचार आला. या सहलीला जायचे निश्चित केले. दुसरी गोष्ट म्हणजे कडक उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये काही दिवस थंड हवेचे अनुभवता येतील या विचाराने मी , पत्नी सौ. शैलजा, साडू श्री जवाहर उपासे व सौ. शुभदा उपासे अशा चौघांनी बरोबर जाण्याचे निश्चित केले. १३ मे ते १९ मे अशी उत्तराखंडमध्ये सात दिवस आणि सहा रात्रींची ही सहल होती. गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या या सहलीमध्ये दिल्ली, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, नैनीताल, मसुरी, हृषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणांचा समावेश होता. त्यामुळे काही नवीन ओळखी झाल्या.

    या सहलीत विमानाचा प्रवास झाला तसा हृषिकेशमध्ये सहासीटर रिक्षाचाही प्रवास झाला. एसीबसने प्रवास झाला तशी वल्ह्याच्या होडीतून नैनीतालमधील तलावात फेरी झाली. हृषिकेशमध्ये मोटरबोटीतून गंगा नदी ओलांडली ते वेगळे . दिल्लीला कडक उन्हाळा अनुभवला तशी नैनिताल आणि मसुरी येथील अल्हाददायक थंडीदेखील अनुभवली. मैदानी प्रदेशात रखरखते ऊन होते. तर डोंगर शिखरांवर शीतल थंडावा होता. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या नद्या नाले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात दिसले. तशी हृषिकेश हरिद्वार येथे खळाळणारी विशाल गंगा नदी देखील दिसली. नैनिताल मसूरी येथील हिरव्यागार झाडांनी नजर निवली. तर मैदानी प्रदेशात दिसलेल्या वाळलेली झाडे झुडपे दृष्टीला बोचली.  देवीच्या ५२ शक्तिपीठांपैकी नैनीताल येथे माता नैनादेवी मंदिरात, दिल्लीच्या अक्षरधाममध्ये स्वामीनारायण मंदिरात भक्तिभावाने नतमस्तक झालो. हृषिकेश येथे गंगा नदीच्या दर्शनाने तर हरिद्वार येथे गंगास्नानाने प्रसन्न झालो. हरिद्वार येथील गंगारतीचा विलक्षण अनुभव मनावर कायमचा कोरला गेला.


      ( जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील संग्रहालयातील छायाचित्र )

       या सहलीत काही वेगळे प्रसंग लक्षात राहिले तर काही दृश्ये मनावर ठसली. 

   नैनीतातालमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुभाषितवजा वाक्ये लिहिली होती. रोपवेच्या ठिकाणी लिहिलेली वाक्ये होती. 'अपना पद और परिचय देकर शर्मिंदा ना करे|' 'आपका बर्ताव ही आपका परिचय है|' नैनीतालमध्ये दुपारचे जेवण ज्या हॉटेलमध्ये होते तिथे लिहिले होते, 'जिंदगी में सुकून ढूंढना‌ सीखें क्योंकी जरुरतें कभी पूरी नहीं होती|' येथेच माता नैनादेवी मंदिरात स्वामी विवेकानंद येऊन गेल्याचा फलक लावला होता. त्यावर संभावित अभिजनांचा विरोध डावलून स्वामीजींनी नर्तिकांना दर्शन दिले हा उल्लेख स्वामीजींच्या विशाल हृदयाचा परिचय देणारा वाटला. या मंदिराबाहेर तिबेटी नागरिकांची दुकाने आहेत. आताच्या दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याचे चीनच्या सरकारने अपहरण करून वर्षे लोटली आहेत. त्यांचा ठावठिकाणा कळावा अशी मागणी त्या दुकानांवर असलेल्या फलकावर लिहिलेली होती. दुर्बल सज्जनांना दडपशाहीला सामोरे जावे लागते असा  विचार मनात येऊन गेला.

       हृषिकेश येथे रामझूला ओलांडातना एका वृद्ध आईला चालवत नव्हते. तेव्हा तिच्या मुलाने तिला पाठीवर उचलून घेतले. सुनेने सासुच्या चपला हातात उचलल्या. जणू आताचा श्रावणबाळ आणि त्याची पत्नी!

     हृषिकेशमध्ये चोटीवाला नावाचे प्रसिद्ध हॉटेल आहे. त्याच्या दोन शाखा आहेत. रामझुल्याजवळील हॉटेलसमोर त्यांच्या बोधचिन्हाप्रमाणे दिसणारी दोन माणसे होती. एक जण एका दरवाजाशेजारी सिंहासनावर बसलेला होता. तर दुसरा दुसऱ्या दरवाजाशेजारी उभा होता. 

    अनेक ठिकाणी फळांच्या फोडी विक्रीला ठेवल्याचे दिसते. पण हृषिकेशमधील शत्रुघ्न मंदिराजवळ नारळाच्या फोडी विक्रीला मी पहिल्यांदाच पाहिले. 

      चांगला माणूस मेल्यानंतर स्वर्गात जातो असे म्हणतात पण स्वर्गाश्रमात जाण्याचा मार्ग मात्र हृषिकेशमध्ये दिसला.

      

     मसुरीमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिलो. ही ब्रिटिश कालीन इमारत असावी तिचा बाहेरचा भाग ब्रिटिश पद्धतीची आठवण करून देणारा होता.  याच हॉटेलमध्ये जुन्या जाहिराती, चित्रे एका भिंतीवर चिकटवली होती. यामध्ये विविध गोष्टींच्या जाहिरातीबरोबरच महात्मा गांधी चंद्रशेखर आजाद आणि लक्स साबणाची जाहिरात करणारी सुंदरी यांची देखील चित्रे होती.

      



     मसुरीजवळ केम्टी वॉटरफॉलजवळ भर दुपारी तापलेल्या रस्त्यावरून चालत निघालेला एक संन्यासी दिसला.


       मसूरीमध्ये फिरताना मद्रास कॅफे नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथले खाद्यपदार्थ चविष्ट होते. गेल्या पाच वर्षांपासून दोन शीख तरुण बहिणी परिश्रम करून हे हॉटेल चालवीत आहेत. त्या मुलींच्या वडिलांचीदेखील तिथे भेट झाली. तुमच्या मुली चांगल्या पद्धतीने हॉटेल चालवताहेत असे म्हटल्यावर त्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसला नाही तर चेहरा थोडा कठोर झाला. कारण काही लक्षात आले नाही.

   मसुरीमध्येच पुणेरी पाटीची आठवण करून देणारी एक पाटी दिसली. 

     मसुरीमध्ये मॉल रोडवर टाकण्याचे स्मारक उभारलेले आहे. स्वातंत्र्याची ज्योत सर्वांनी मिळून उंचावल्याचे प्रातिनिधीक शिल्प तेथे  आहे. उत्तराखंडचे गांधी म्हणून ज्यांना ओळखतात त्या थोर स्वातंत्र्यसेनानी इंद्रमणि बडोनी यांचा पुतळा बघून कर्मवीर भाऊराव पाटील यांची आठवण आली. याचा चौकात अगदी जुन्या काळातील सिनेमाचा कॅमेरा ठेवण्यात आला आहे. पर्वतीय प्रदेशातील जनजीवन दाखवणारे एक शिल्पदृश्य येथे आहे.





   येथील प्रत्येक ठिकाणीच अजून एक दोन दिवस राहायला मिळायला हवे होते श्री हुरहूर  मनाला लागली. निसर्गसौंदर्याचा आनंद आणि प्राचीन परंपरेचे पावित्र्य या दोन्हीचाही अनुभव देणारी ही सहल कायम स्मरणात राहील.

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

      





Comments

  1. उत्तराखंडची अद्भुत विविधता सुंदर वर्णन केले सर ..'अपना पद और परिचय देकर शर्मिंदा ना करे|' हे वाक्य आयुष्यभर लक्षात राहील

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची