यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

     'काशीस जावे नित्य वदावे' ही श्रद्धाळू हिंदू समाजाची हजारो वर्षांपासूनची पद्धत आहे. भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये काशीचे स्थान अनन्यसाधारण आहे. यामुळे काशीला जाणे ही एक पवित्र गोष्ट आहे. यावेळी आमचे काशीला जायचे ठरले ते अयोध्या यात्रेमुळे‌. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर रामललाचे भव्य मंदिर पुन्हा उभे राहिले. २२ जानेवारी २०२४ ला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे अयोध्येला जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची ओढ होती. यापूर्वी २००७ मध्ये काशी प्रयागराज यात्रा घडली होती. पण त्यावेळी अयोध्येला जाता आले नव्हते. तो योग यावेळी आला. ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२४ या दिवसांत आमची ही यात्रा पार पडली.

        माझे साडू आणि मी आमच्या दोघांच्या या कौटुंबिक यात्रेचे नियोजन आमचा भाचा कु. सिद्धांत उपासे याने केले होते. आता इंटरनेटवर बऱ्याच सुविधा उपलब्ध असल्याने फोनवरून सगळे नियोजन करता आले.

       पुण्यातून निघाल्यावर पहिल्या दिवशी दुपारी प्रयागराजला पोचलो. पुण्यापेक्षा तिथे सूर्यास्त लवकर होत असल्याने हॉटेलमध्ये सामानसुमान ठेवून लगेच संगमावर गेलो. सूर्यास्ताला थोडाच वेळ राहिला होता. त्या सुमारास होडीतून संगमावर जाऊन गंगामातेचे दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी निघून काशीमध्ये पोचलो. त्यादिवशी आवरून गंगाआरतीसाठी घाटावर पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री विश्वनाथ मंदिरात, अन्नपूर्णा मंदिरात दर्शन घेतले. होडीतून गंगाविहार करून काशीचे घाट पाहिले. काळभैरवाचे दर्शन लांबूनच घेतले‌. बनारसी साडी खरेदी ही तर अनिवार्यच होती. संध्याकाळी दशाश्वमेध घाटावर गंगाआरतीसाठी गेलो. 

      काशीहून सकाळी निघून दुपारपर्यंत अयोध्येजवळ पोचलो. रामललाचे, हनुमानगढीचे दर्शन, शरयू आरती बघितली. पुढच्या दिवशी पहाटे निघून लखनौला पोचलो. लखनवी कापडाची खरेदी, लखनौ पाहून रात्री पुण्याला पोचलो.

       २००७ आमच्या कौटुंबिक सहलीपेक्षा काही फरक ठळकपणे जाणवले. त्यावेळी कुंभमेळा होणार नव्हता. पण यावेळी महाकुंभमेळा होणार होता. त्याची तयारी चालू होती. काशीच्या जंगमवाडी मठाला आमचे आजोबा कै. कृष्णाजी पांडुरंग गाडे यांनी १९६० मध्ये ₹ १,००,०००/- दान केले होते. त्यांच्या नावाच्या पाटीखाली उभे राहताना अभिमान आणि आनंद वाटला.


          ( जंगमवाडी मठ प्रयागराज )

       २००७ मध्ये काशीमध्ये विश्वनाथ कॉरिडॉर नव्हता. त्यामुळे गल्लीबोळातून जात मंदिराचे दर्शन झाले होते. ज्ञानवापी मशिदीमध्ये असलेल्या नंदीचे दर्शन जवळच्या एका दुकानाच्या माडीवरून घेतले होते. पण आता कॉरिडॉर झाला असल्याने सर्व परिसर प्रशस्त झाला आहे. देशभर खडतर प्रवास करुन हिंदू धर्माला दृढ करणारे आद्य शंकराचार्य आणि औरंगजेबाने पाडलेले मंदीर उभे करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे बघून विशेष आनंद झाला. गंगेमधून काशीच्या घाटांचे विलोभनीय दर्शन झाले. नदीतून मनकर्णिका घाट पाहत असतानाच एक प्रेतयात्रा घाटावर येताना दिसली. आयुष्याच्या अंतिम गंतव्याचे एका अर्थाने दर्शन झाले. काशीतील गल्लीबोळातून फिरताना वेळेचा अंदाज हमखास चुकत होता. सायकलरिक्षातून फिरणे झाले. आम्ही ज्या रिक्षात बसलो होतो त्या रिक्षावाल्याच्या कष्टांची जाणीव झाली. आयुष्याच्या संघर्षाने तो अगदी पिचून निघाला होता. त्याला बघताना एक प्रकारची वेदना मनामध्ये दाटली. गंगाआरतीसाठी घाटावर जाताना जो रिक्षावाला भेटला तो नोकरीसाठी काही काळ महाराष्ट्रात राहिला होता. पण मोठ्या भावाच्या आग्रहाने परत काशीत आला होता. आता आपल्या गावाजवळच राहतोय, सर्व आयुष्य काशीविश्वनाथाच्या कृपेने मार्गी लागले अशी त्याची भावना होती. दोन्ही दिवसांच्या गंगाआरतीच्यावेळी रावणाने रचलेले शिवतांडव स्तोत्र म्हटले गेले. वेदपंडित असणारा रावण हा मूळनिवासी आणि वेदविद्यापारंगत श्रीराम हे आक्रमक आर्य असे मानणारे अजूनही काही भारतीय आहेत याची आठवण झाली. इंग्रजांचा कुटिलकावा आजदेखील कसा काम करतोय हे लक्षात येऊन दु:ख वाटले.


             ( काशी विश्वनाथ मंदीर )
       

     

      अयोध्येत पोचण्याची ओढ होतीच. रामललाच्या मंदिरात पोचलो तेव्हा गर्दी फार नव्हती. त्यामुळे मूर्तीसमोर १-२ मिनिटे जास्त उभे राहून दर्शन घेता आले. हा क्षण अतिशय भावूक करून गेला. डोळे पाणावले. श्रद्धास्थानांसाठी ५०० वर्ष सर्व प्रकारचा संघर्ष करुन हे मंदीर उभे राहिल्याची जाणीव मनाला स्पर्श करणारी होती. अयोध्या मंदिराच्या उभारणीसाठी संघकार्य म्हणून गेली काही वर्षे तिथे राहून काम करणाऱ्या सौ. आफळेवहिनींची भेट आनंद देणारी होती. जगदीशकाका आफळे एका बैठकीत होते म्हणून भेट झाली नाही. त्याची रुखरुख वाटली.

( श्री रामलला मंदीर अयोध्या )

       लखनौमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्येजवळ महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोघांचेही पुतळे पाहून अभिमान वाटला. पण त्याचवेळी उद्यानात तत्कालीन मुख्यमंत्री कु. मायावती यांनी स्वतःचे उभारलेले पुतळे पाहून माणसाला स्वप्रतिमेचे किती प्रेम असते याची जाणीव झाली.

        भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत ज्यांंनी स्वकर्तृत्वाने आपला ठसा उमटवला आहे त्या लोकमान्य टिळकांचा अर्धपुतळा पाहून आनंद झाला.

     


     ही यात्रा मनाला अतिशय समाधान देऊन गेली. ती नेहमीच संस्मरणीय राहील.

सुधीर गाडे, पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. जय श्रीराम. हर हर गंगे भागीरथी .ॐ नमः शिवाय.

    ReplyDelete
    Replies
    1. जय बाबा विश्वनाथ! जय श्रीराम!

      Delete
    2. खूप छान लिहले आहे, आणि १९६० मध्ये १ लाख म्हणजे आजचे जवळपास ५कोटी ( सोन्याच्या हिशेबात )

      Delete
  2. सुंदर वर्णन केले आहे काशीचे... सर्व ठिकाणी डोळ्यासमोर उभे राहिले🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट