नामवंतांची पहिली भाषणे
शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः |
वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ||
असे एक संस्कृत सुभाषित आहे. याचा अर्थ शंभरात एक जण शूर असतो. हजारातील एक जण विद्वान असतो. दहा हजारातील एक वक्ता असतो. पण दाता होईल किंवा नाही हे सांगता येत नाही.
साधारणपणे सामान्य माणसाला ज्या गोष्टींची जास्त भीती णीऋ आणि भ फभ आहे वाटते त्यात वक्तृत्व ही गोष्ट मोठ्या प्रमाणावर आढळते. याला इंग्रजीमध्ये याला 'स्टेज फियर' असे म्हणतात. तर मराठीमध्ये अशी भीती नसणे याला 'सभाधीटपणा' असे म्हणतात. एक वेगळा मुद्दा म्हणजे दोन शब्द प्रयोगांमधून व्यक्त होणारा एकाच गोष्टीकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टीकोन. या लेखामध्ये नंतर जे वक्ते म्हणून प्रसिद्ध झाले अशा काही नामवंत व्यक्तींच्या पहिल्या भाषणाची उदाहरणे आहेत. अगदी काटेकोरपणे बोलायचे झाले तर ही भाषणे पहिली नाहीत. यात वर्णन केलेले प्रसंग हे या मोठ्या व्यक्तींचे एका विशिष्ट समुदायापुढे बोलण्याचे हे पहिले प्रसंग असल्यामुळे आणि त्यांच्या या अनुभवांत थोडेफार साम्य असल्याने हे शीर्षक दिले आहे.
( सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून साभार )
कालानुक्रमे यातील पहिले भाषण केलेली महान व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. आपले गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलेले 'कालीमातेचे कार्य' कोणते याचा शोध घेत ते १८९० ते १८९३ मध्ये संपूर्ण भारत फिरले. या भारत यात्रेत त्यांना शिकागो येथे होणाऱ्या सर्वधर्मपरिषदेची माहिती मिळाली. गुरूंचा दृष्टांतही झाला आणि स्वामीजी अमेरिकेत पोहोचले. परिषदेच्या पुष्कळ आधी स्वामीजी अमेरिकेत पोचले होते. होणारा खर्च थोडा कमी व्हावा या हेतूने ते बोस्टन परिसरात राहू लागले. काही ठिकाणी औपचारिक भाषणेदेखील त्यांनी केली. प्रा. राईट यांचे " या माणसाला परिचय पत्र विचारणे म्हणजे सूर्याला प्रकाश देण्याचा कोणता अधिकार आहे असे विचारणे होय." असे शिफारस पत्र घेऊन स्वामीजी सर्वधर्मपरिषदेच्या आदल्या रात्री शिकागो येथे पोहोचले. पत्त्याची चिट्ठी हरवल्यामुळे त्यांना रात्र रेल्वेच्या डब्यात काढावी लागली. परत सकाळी शोध सुरू केल्यानंतर श्रीमती हेल यांच्या मदतीने ते परिषदेच्या ठिकाणी पोहोचले. सुरुवातीच्या सत्रात ते सर्व धर्मांच्या प्रतिनिधींच्या मिरवणुकीत सहभागी झाले. परिषदेच्या व्यासपीठावर एका मागून एका वक्त्यांची लिखित, नियोजित भाषणे प्रभावी पद्धतीने होऊ लागली. सत्राच्या अध्यक्षांनी स्वामीजींना बोलण्याची सूचना केली. काय बोलायचे याची कोणतीही तयारी स्वामीजींनी केली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यावेळी बोलण्याचे नाकारले. असे दोन-तीन वेळा घडले. आता ही शेवटची संधी असे सांगितले गेल्यानंतर स्वामीजी बोलायला उभे राहिले. आपल्या पूजनीय गुरूंचे त्यांनी मनोमन स्मरण केले आणि त्यांच्या मुखातून शब्द उमटले, " अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधुनो...." स्वामीजींच्या हृदयातील ती हाक सर्वांच्या मनाला स्पर्शून गेली आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. स्वामीजींचे हे छोटेखानी भाषण 'सर्व धर्म सत्य आहेत' ही हिंदू श्रद्धा व्यक्त करणारे आणि वैश्विक शांतीची दिशा दाखवणारे आहे. स्वामीजींच्या या भाषणाने काल पटलावर आपला ठसा उमटवला आहे.
दुसरे भाषण आहे साधारण १९१५ मध्ये मुंबईत झालेले. बॅरिस्टर झालेले महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत कायदे विषयक सल्लागार म्हणून गेले. स्वतःला आलेल्या अपमानास्पद अनुभवानंतर तेथील सार्वजनिक आयुष्यात ते सक्रीय झाले. तिथेच त्यांना सत्याग्रह ही कल्पना सुचली आणि त्याचे प्रयोग त्यांनी तिथे केले. भारतात परत यायचे ठरले. आपले गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सूचनेनुसार त्यांनी भारत यात्रेला सुरुवात केली. मुंबईमध्ये त्यांचा कार्यक्रम ठरवण्यात आला. त्या ठिकाणी गांधीजींनी भाषण करून आपल्या कल्पना, विचार सगळ्यांपुढे मांडायचे असे ठरले. परंतु आपण चांगले भाषण करू शकणार नाही असे गांधीजींना वाटले. म्हणून त्यांनी भाषण लिहून काढले. ते भाषण वाचण्याचे कामदेखील दुसऱ्या व्यक्तीने केले. महात्माजींच्या या भाषणाच्या अनुभवानंतर मात्र ते हळूहळू भाषण करायला लागले. त्यांच्या वक्तृत्वाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लाखो लोकांना प्रेरणा मिळाली.
तिसरे भाषण १९२० मध्ये एका जहाजावर झाले आहे. भारतीय अध्यात्मिक अलौकिक महापुरुष महावतार बाबाजी यांचे शिष्य लाहिरी महाशय. त्यांचे शिष्य स्वामी युक्तेश्वर आणि त्यांचे शिष्य स्वामी योगानंद. स्वामी योगानंद यांनी 'ऑटोबायोग्राफी ऑफ ॲन योगी' हे त्यांचे आत्मचरित्र लिहिलेले आहे. त्यांना अध्यात्म विचार प्रसारासाठी अमेरिकेत जाण्याची आज्ञा त्यांच्या गुरूंनी केली. जहाजातून अमेरिकेच्या दिशेने प्रवास सुरू झाला. स्वामी योगानंद यांचे ज्ञान आणि व्यक्तिमत्व यांचा प्रभाव सहप्रवाशांवर पडला. त्यातील एकाने स्वामींना भाषण करण्याची विनंती केली. स्वामींनी ही विनंती मान्य केली. अडचण एकच होती. ती म्हणजे आतापर्यंत स्वामींनी इंग्रजी भाषेतून कधीही भाषण केले नव्हते. परंतु गुरुकृपेवर स्वामींची दृढ श्रद्धा होती. भाषणाच्या वेळी ते सर्वांसमोर जाऊन उभे राहिले. परंतु तोंडातून शब्द बाहेर फुटेनात. स्वामी योगानंद जवळपास दहा मिनिटे तसेच मौन उभे राहिले. उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. परंतु दहा मिनिटानंतर अचानक स्वामींना स्फूर्ती झाली आणि त्यांनी भाषण केले. या भाषणाचे कोणतेही टिपण त्यांनी काढले नव्हते. उपस्थित लोकांनी त्यांनी सांगितलेले मुद्दे नंतर कळवले. त्यातून आपल्या भाषणात काय बोलणे झाले हे स्वामी योगानंद यांना कळले. स्वामींनी पुढे 'योगदा सत्संग सोसायटीच्या' माध्यमातून अध्यात्म प्रसाराचे अमेरिकेत केले.
या तीनही वक्त्यांच्या जीवनाला अध्यात्माचे अधिष्ठान होते. दोघांच्या बाबतीत त्यांच्या गुरूंची त्यांच्यावर कृपा होती. गांधीजींच्या पाठीशी स्वतःचा अनुभव होता. समाजाच्या हिताची तळमळ सर्वांच्याच हृदयात होती. त्यामुळेच या सर्व महान व्यक्तींच्या वक्तव्यांचा, भाषणांचा समाजावर सखोल परिणाम झाला. लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले. ते बघितले की स्वामी विवेकानंद यांचे उद्गार सहज पटतात. स्वामीजींनी म्हटले आहे , "बोलणाऱ्या वक्त्याच्या भाषणाचा प्रभाव एक तृतीयांश असतो. तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दोन तृतीयांश असतो. "
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
तुमच्यामुळे या तिन्ही महान व्यक्तींची भाषणातला सारांश वाचायला मिळाला धन्यवाद सर🙏
ReplyDeleteसर नमस्कार 🙏
Delete