गुरू कधी भेटतात?
२०१३ मध्ये एका महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने व्याख्यान देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी कार्यक्रमानंतर एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की , "गुरु कधी भेटतात?" मी त्याला उत्तर दिले , "मला याबाबत फारशी माहिती नाही. परंतु जे वाचले आहे त्याप्रमाणे त्यानुसार योग्य वेळ झाली की गुरू भेटतात." गेले काही दिवस याच मुद्द्याचा विचार करत असतांना वेगवेगळी उदाहरणे लक्षात आली. ती उदाहरणे या लेखात दिली आहेत.
( संत तुकाराम आणि संत बहिणाबाई यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
सतराव्या शतकामध्ये १६२८ मध्ये संत बहिणाबाई यांचा मराठवाड्यातील एका ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. लहानपणी त्यांचे लग्न गंगाधर पाठक यांच्याशी लावून देण्यात आले. बहिणाबाई यांना देखील अध्यात्माची गोडी होती. परिवारामध्ये वेदांचे अध्ययन होते परंतु भक्ती मार्गाची उपासना मान्य नव्हती. कोल्हापूर येथे हे कुटुंब राहायला गेले असताना तेथे जयराम स्वामी यांच्या कीर्तनांतून संत तुकाराम यांची वचने बहिणाबाईंच्या कानी पडली. आपल्याला संत तुकाराम यांचे शिष्यत्व मिळावे अशी इच्छा बहिणाबाई यांच्या मनात आली. पती गंगाधर पाठक यांचा सुरुवातीला असलेला विरोध नंतर मावळला. बहिणाबाई यांना स्वप्नामध्ये वाद्य पंचमी १५६९( सन १६४७) यादिवशी संत तुकाराम यांचा अनुग्रह प्राप्त झाला. नंतरचे सर्व आयुष्य या दांपत्याने देहू परिसरात काढले.' ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस' ही प्रसिद्ध रचना बहिणाबाई यांची आहे.
( भैरवी ब्राह्मणी आणि रामकृष्ण परमहंस यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
श्री रामकृष्ण परमहंस हे १९ व्या शतकात होऊन गेलेले महान आध्यात्मिक गुरू! स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या अन्य शिष्यांनी जगभर अध्यात्म प्रसार केला. १८३६ मध्ये श्री रामकृष्ण परमहंस यांचा बंगालमधील कामारपुकुर येथे जन्म झाला. लहानपणापासून त्यांची वृत्ती ही विरक्तीची होती. घरच्या परिस्थितीप्रमाणे त्यांनी कोलकात्याजवळ दक्षिणेश्वर येथे असलेल्या कालीमातेच्या मंदिरात पुजारी म्हणून नोकरी पत्करली. हे मंदिर राणी रासमणी यांनी बांधले होते. त्याची सर्व व्यवस्था रासमणी यांचे जावई मथुरबाबू पाहत होते. श्री रामकृष्ण यांची आधीच अध्यात्म क्षेत्रात पुष्कळ प्रगती झाली होती. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत. परंतु या अनुभवांचा अर्थ काय हे त्यांना उमजत नव्हते. १८६१ मध्ये एके दिवशी दक्षिणेश्वरी 'भैरवी ब्राह्मणी ' यांचे आगमन झाले. सगुण , तांत्रिक मार्गाने आध्यात्मिक साधना करण्यामध्ये त्या पारंगत होत्या. रामकृष्ण यांना पाहून त्या म्हणाल्या, "बाळा, तुलाच मी किती दिवसांपासून शोधत होते." ह्या भेटीनंतर त्यांनी रामकृष्णांना दीक्षा दिली. त्यांच्याकडून विविध प्रकारांनी साधना करून घेतली. संत, विद्वान यांची सभा भरवून "श्री रामकृष्ण हे परमेश्वराचे अवतार आहेत." हे सर्वानुमते मान्य करून घेतले.
( तोतापुरी गोसावी आणि रामकृष्ण परमहंस यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
१८६४ मध्ये अजून एक प्रसंग घडला. अद्वैत मत मानणारे, ज्ञानमार्गाने साधना करणारे महान आध्यात्मिक पुरूष 'तोतापुरी गोसावी' हे अचानकपणे दक्षिणेश्वर येथे आले. त्यांनी श्री रामकृष्ण यांचे निरीक्षण केले. त्यांची आध्यात्मिक योग्यता गोसावी यांच्या लक्षात आली. त्यानंतर तोतापुरी गोसावी यांनी अद्वैत मताची दीक्षा प्रयत्नपूर्वक रामकृष्ण यांना दिली. या गुरु शिष्यांमध्ये अजून एका वेगळ्या प्रकारचे आदान प्रदान झाले आतापर्यंत फक्त ज्ञानमार्ग, अद्वैत यावरती श्रद्धा असणारे तोतापुरी गोसावी यांना भक्ती मार्गाचे लक्षात आले. नंतरच्या आयुष्यात त्यामुळे त्यांच्या विचारात बदल घडला.
कोणतीतीही वेगळी खटपट न करता दोन वेगवेगळे गुरु श्री राम कृष्ण यांच्या आयुष्यात आले. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दीक्षा त्यांना दिल्या.
( रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे नरेंद्र दत्त यांची श्री रामकृष्ण परमहंसाशी ओळख त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य विल्यम हेस्टी यांचा बोलण्यातून झाली. नातेवाईक रामचंद्र दत्त यांच्यामुळे प्रत्यक्ष भेट झाली. सुरुवातीला नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद यांना राम कृष्ण परमहंस यांच्या आध्यात्मिक स्थानाबद्दल शंका होती. काही वेळा आपल्या गुरुची त्यांनी चेष्टा केली, परीक्षा घेतली, कडाक्याचा वादविवाद केला. परंतु अंतिमतः रामकृष्णांचे शिष्यत्व स्वामीजींनी पत्करले.
( किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
विसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रात नाट्य क्षेत्रात प्रभाकर पणशीकर यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांचे पुत्र रघुनंदन यांना लहानपणापासूनच गाण्याची गोडी होती. गाण्याचे आपल्या पद्धतीने सराव देखील करत होते परंतु या साधनेसाठी गुरू हवा असे त्यांच्या मनात येत होते. त्याचा शोध ते घेत होते. प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या नाट्यसंस्थेच्या वतीने 'तिची वाट वेगळी' नावाचे नाटक निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. त्याला संगीत देण्याचे काम गान सरस्वती किशोरी आमोणकर यांनी करावे असे प्रभाकर पणशीकर यांनी ठरवले मुलगा रघुनंदन याची गाण्यातील गोडी लक्षात घेऊन किशोरीताईंना मदत करण्याची जबाबदारी रघुनंदन यांच्याकडे दिली. अनेक महिने रघुनंदन यांना किशोरीताईंचा सहवास लाभला. एके दिवशी किशोरीताई आपल्या शिष्याला गाणे शिकवत होत्या. पण त्याला ते काही जमत नव्हते. त्यावेळी शेजारी असलेले रघुनंदन यांनी गाणे म्हणून दाखवले. यामुळे रघुनंदन यांची गाण्यातील गती किशोरीताईंच्या लक्षात आली आणि त्यांनी रघुनंदन यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारले.
या घटना वाचल्या की लक्षात येते की योग जुळून यावा लागतो वेळ यावी लागते. मग गुरु शिष्य यांची भेट झाल्याशिवाय राहात नाही.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा यासाठ वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
योग जुळून यावे लागतात त्याच वेळेस गुरु भेटतात.. उत्तम उदाहरण प्रस्तुत केली सर... नेहमीप्रमाणे उत्कृष्ट लेखन 🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteसामान्य जणांना सुद्धा कुठला गुरू केव्हा आणि कुठे भेटेल हे सांगता येत नाही. मलाही वैद्यकीय क्षेत्रात असेच एक डॉक्टर अमिन नावाचे गुरू मुंबईत भेटले. त्यांच्या हाताखाली काम करीत असताना पहिल्या दिवशी शस्त्रक्रियेचा कुठलाही अनुभव नसताना माझ्या आयुष्यातील पहिली शस्त्रक्रिया करण्यास त्यांनी मला उद्युक्त केले. त्यांच्या ह्या गुरु मंत्राचा अमलात आणून पुढील आयुष्यात काही अनुभव नसणारे जवळजवळ १३० प्रयोगशाळा आणि क्ष किरण तंत्रज्ञ त्या त्या विषयात पारंगत केले व आजपर्यंत ते आपला चरितार्थ उत्तमपणे चालवत आहेत आणि विशेष म्हणजे गुरु पेक्षा शिष्य सवाई या उक्तीप्रमाणे काहीजण तर माझ्याही पेक्षा चांगल्या प्रकारे चालवत आहेत.
ReplyDeleteनेहमीप्रमाणे सरांचे लिखाण, सांगणे उत्तम आणि कौतुकास्पद. तरुणाईने अवश्य सरांचे लेखन वाचत जावे कारण अशा बऱ्याच गोष्टी आजकाल त्यांना माहीत नसतात. त्रिवार अभिनंदन सर.
धन्यवाद डॉक्टर.
Deleteतुमचा अनुभव चांगला आहे.
This comment has been removed by the author.
Deleteछान आणि माहितीपूर्ण लेख सुधीर जी, गुरू मिळण्यासाठी शिष्याची त्याप्रती उत्कटता हवी तेव्हाच तो भेटतो असे वाचनात आले आहे. तसे असेल तेव्हा ते योग येतोच
ReplyDeleteअगदी बरोबर.
Deleteधन्यवाद सत्यजित