स्वामी विवेकानंद यांचा पीडित महिलांविषयीचा दृष्टिकोन

       स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यापैकी त्यांच्या ठिकाणी असणारा करुणाभाव विलक्षण आहे. या करुणा भावाची काही विशिष्ट उदाहरणे या लेखात मांडली आहेत.

         ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

      या लेखात वर्णिलेल्या महिलांसाठी या शब्दासाठी कोणते विशेषण वापरावे हा प्रश्न मला पडला होता. कारण या लेखामधील उल्लेख देहविक्रय करणाऱ्या महिलांबाबत आहेत. अशा महिलांना साधारणपणे 'पतित' असा शब्द वापरण्याची पद्धत आहे. परंतु माझ्या समजुतीप्रमाणे देहविक्रय करणारी कोणतीही महिला स्वखुशीने त्या मार्गाला जात नाही. नाईलाज झाल्यावरच ती त्या मार्गाला जाते. काही बाबतीत फसवणुकीने अशा महिला त्या मार्गावर ढकलल्या जातात. त्यामुळे 'पीडित' हा शब्द वापरला आहे. अशा महिलांमुळे समाजाचे पतन होते की समाजाच्या अध:पतनाचे निदर्शक अशा स्त्रिया आहेत हा चर्चेचा किंवा वादाचा विषय आहे. पण तो बाजूला ठेवून स्वामीजींच्या जीवनातील काही प्रसंग बघूयात.

           स्वामीजींच्या पूर्व जीवनात त्यांना देहविक्रय करणाऱ्या महिलांची घृणा वाटत असे. याप्रकारे आयुष्य कंठणाऱ्या महिलांच्या वस्तीच्या आसपासही कोणत्याही कारणाने फिरकू नये अशी त्यांची भावना असे. परंतु श्री रामकृष्ण परमहंस यांच्या आशीर्वादाने स्वामीजींमध्ये आमुलाग्र परिवर्तन झाले आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात परमेश्वराचा अंश आहे ही त्यांची दृढ धारणा झाली. त्या भूमिकेतूनच ते सर्वांकडे पाहू लागले.

   राजस्थानात खेत्री नावाचे एक छोटे संस्थान आहे. त्याचे संस्थानिक राजा अजितसिंह यांचा परिचय नरेंद्रनाथांशी झाला. अजितसिंहांनी त्यांना गुरू मानले आणि विवेकानंद हे नाव धारण करण्याची विनंती केली. अमेरिकेतील सर्वधर्मपरिषदेसाठी जाण्याचे निश्चित झाले होते. याच सुमारास आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने आपल्याला मुलगा झाला म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अजितसिंहांनी स्वामीजींना खेत्रीमध्ये पाचारण केले. तेथील समारंभात स्वामीजींनी भाग घेतला. स्वामीजींना निरोप देण्यासाठी म्हणून अजितसिंह खेत्रीवरून जयपुरपर्यंत आले. आपल्या तेथील वाड्यामध्ये स्वामीजींच्या मनोरंजनासाठी म्हणून अजितसिंहांनी एका नर्तिकेच्या नृत्यगायनाचा कार्यक्रम ठेवला. ( ही नर्तिका तत्कालीन परिस्थितीप्रमाणे वारांगना असावी.) परंतु आपण सर्वसंगपरित्याग केलेले संन्यासी आहोत. या नर्तिकेचे गाणे कसे ऐकायचे म्हणून ते गाणे ऐकण्यासाठी न थांबता स्वामीजी तेथून उठून गेले. ही नर्तिका एक अतिशय समंजस स्त्री होती. तिने संत सूरदासांचे एक प्रसिद्ध गीत गाण्यास सुरुवात केली.

हमारे प्रभु अवगुण चित ना धरो|

समदरशी है नाम तिहारो |

अब मोहे पार करो| हमारे प्रभु|| 

जवळच असलेल्या स्वामीजींच्या कानांवर हे शब्द पडले. भावव्याकुल अशा त्या स्वरांनी स्वामीजींची जणू कानउघाडणी केली. गाणे संपताच स्वामीजी त्या नर्तिकेजवळ आले आणि त्यांनी हात जोडून तिची क्षमा मागितली. पुढे आयुष्यभर स्वामीजी हा प्रसंग विसरले नाहीत. आपल्या शिष्यांना ते वारंवार हा प्रसंग ऐकवत आणि सांगत की पद, प्रतिष्ठा , व्यवसाय यावरून माणसाची परीक्षा करू नका . माणासातील परमेश्वर बघायला शिका!

       अमेरिका आणि युरोप यांच्या दौऱ्यावर स्वामीजी दोन वेळा गेला होते. सन १९०० मध्ये दुसऱ्या दौऱ्यावरून परत येताना त्यांच्या सोबत मॅडम काल्व्हे या प्रसिद्ध गायिका आणि अन्य शिष्य मंडळी होती. मॅडम काल्व्हे यांनी आपल्या आठवणी लिहून ठेवले आहेत. या प्रवासात ही मंडळी इजिप्तमधील कैरो या शहरात गेली. ते सर्वजण शहरात फेरफटका मारायला निघाले. परंतु शहराची माहिती नसल्यामुळे त्यांचा रस्ता चुकला आणि ते एका घाणेरड्या , दुर्गंध सुटलेल्या गल्लीत येऊन पोहोचले. या गल्लीत अनेक अर्धनग्न स्त्रिया हसत खिदळत बसल्या होत्या. बहुधा त्या देहविक्रय करणाऱ्या असाव्यात. स्वामीजींचे सुरुवातीला त्यांच्याकडे लक्ष नव्हते. पण त्या स्त्रियांनी मोठ्याने हसत स्वामीजींना जवळ बोलावले. तेव्हा स्वामीजींचे त्यांच्याकडे लक्ष गेले. स्वामीजी त्यांच्याजवळ जाऊन उभे राहिले आणि उद्गारले "अरेरे दुर्दैवी बिचाऱ्या ! बापड्या आपल्या रूपाच्या उपासनेत भगवंताला विसरल्या आहेत! अहाहा, यांच्याकडे अंमळ बघा."  एवढे बोलल्यानंतर स्वामीजींच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. स्वामीजींच्या पवित्र व्यक्तिमत्त्वाची त्या स्त्रियांनादेखील जाणीव झाली. त्यातली एक जण पुढे आली. ती स्वामीजींच्या वस्त्राचा पदर चुंबून स्पॅनिश भाषेत म्हणाली, "होम्ब्रे डी डिऑस! होम्ब्रे डी डिऑस ! (साक्षात्कारी पुरुष! साक्षात्कारी पुरुष!) दुसऱ्या एका स्त्रीने आपले तोंड दोन्ही हाताने झाकून घेतले. स्वामीजींच्या विशाल अंतकरणातील करुणा डोळ्यावाटे अश्रूंच्या रूपाने घळाघळा बाहेर पडत होती. जणू ती या पीडित आयुष्यांना मांगल्याचा अभिषेक करत होती.

       श्री रामकृष्ण परमहंस यांचे एक गृहस्थी शिष्य गिरीश चंद्र घोष ( जीसी बाबू) हे तत्कालीन बंगाली रंगभूमीवर प्रसिद्ध कलाकार होते. त्यावेळी रंगभूमीवर काम करणाऱ्या बहुतेक सर्व महिला ह्या देहविक्रय करणाऱ्या असत. एकेदिवशी जीसीबाबूंनी स्वामी विवेकानंद यांना 'बिल्वमंगल' या नाटकाच्या प्रयोगाला बोलावले. प्रयोग झाल्यानंतर जीसीबाबूंनी स्वामीजींना कलाकारांसाठी गाण्याची विनंती केली. अर्थात कलाकारांमध्ये स्त्रियादेखील होत्याच. स्वामीजी हे उत्तम गायक आणि संगीताचे मर्मज्ञ होते हे जीसीबाबूंना माहिती होते म्हणूनच त्यांनी ही विनंती केली होती. स्वामीजींनी कोणेतेही आढवेढे न घेता सुस्वर आवाजात काही भक्तीगीते म्हटली. त्याचा परिणाम सर्वांवर विशेषत्वाने स्त्री कलाकारांवर झाला. 'या सत्पुरुषाच्या उपस्थितीत आपल्या मनात गैर विचार आले तर काय अशी भीती आम्हाला वाटत होते.' असे या स्त्रियांनी दुसऱ्या दिवशी जीसीबाबूंना सांगितले. पण स्वामीजी सर्वांकडेच समभावाने पाहत होते.

          स्वामीजींनी आपले गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचा जयंती उत्सव सुरू केला. रामकृष्ण मठामध्ये हा उत्सव भक्तिभावाने, उत्साहाने साजरा होऊ लागला. त्यासाठी रामकृष्णांच्या भक्त मंडळीची गर्दी होऊ लागली. पश्चिमेकडील पहिल्या दौऱ्यानंतर स्वामीजी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्या प्रसिद्धीमुळे अनेक नवनवीन लोक मठातील उत्सवात सहभागी होत असत. यात कोलकात्यातील अभिजन वर्गाची गर्दी असे. बंगाली भाषेत अशा लोकांना भद्र लोक असे म्हणतात. परंतु स्वामीजींच्या सक्षील व्यक्तीमत वाकडे आकर्षित होऊन काही वारांगना देखील या उत्सवात सहभागी होऊ लागल्या. यावर अभिजन वर्गातील लोकांनी टीका करायला सुरुवात केली. त्यांना उत्सवात सहभागी होऊ देता कामा नये अशा प्रकारचे विचार व्यक्त होऊ लागले. त्यावर स्वामीजी म्हणाले, " श्री रामकृष्ण परमहंसांसारख्या महापुरुषाच्या जीवनाचा स्पर्श ज्यांच्या आयुष्याला झाला पाहिजे अशा या स्त्रिया आहेत. रामकृष्णांच्या जीवनाचा संदेश यांच्यासाठी देखील आहे त्यांना उत्सवात सहभागी होण्याची मनाई  करता येणार नाही." आपल्या गुरुंच्या सत्शील जीवनाच्या परिसस्पर्शाची आवश्यकता इडित लोकांना जास्त आहे असेच जणू स्वामीजी सांगत होते.

        मार्च १९०१ मध्ये स्वामीजी तत्कालीन पूर्व बंगालमध्ये प्रवासासाठी गेले. ते ढाक्क्यामध्ये उतरले होते. त्यांच्या भेटीसाठी , दर्शनासाठी लोकांची गर्दी उसळली. एके दिवशी शहरातील एक वारांगणा नटून थटून तिच्या आईसोबत स्वामीजींना भेटायला आली. स्वामीजींच्या सोबत असणाऱ्यांनी थोडे आढेवेढे घेत तिला स्वामीजींची भेट घेऊ दिली. त्या स्त्रीला दम्याचा खूप त्रास होत असे. स्वामीजी त्या त्रासावर काही औषध देतील अशा आशेने तिच्या आईने स्वामीजींना तशी विनंती केली. पण स्वामीजी म्हणाले, " आई बघा. मी स्वतःच दम्याच्या रोगाने कासावीस झालो आहे. स्वतःचाच रोग मला बरा करता येत नाही. माझी मनापासून इच्छा आहे की तुमची व्याधी दूर व्हावी. माझ्या जर तसे सामर्थ्य असते तर मी तुम्हाला निश्चित बरे केले असते." स्वामीजींचे हे आत्मीयतापूर्ण उद्गार त्या दोघींबरोबरच तिथे उपस्थित सर्वांच्या मनावर विलक्षण परिणाम करून गेले. हे उद्गार म्हणजे स्वामीजींच्या अंत:करणातील करुणेचेच उच्चारण होते.

       या सर्व उदाहरणांतून स्वामीजींचा पीडित महिलांच्याविषयी असलेला दृष्टिकोन स्पष्ट होतो. अशा महिलांना अपवित्र पापी मानून त्यांचा धिक्कार करू नये. करुणाभावाने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. त्यांच्यामध्ये असलेल्या ईश तत्त्वाचे जागरण केले पाहिजे ही स्वामीजींची भूमिका होती.

        आपल्या अंतःकरणात असणारी करुणा केवळ शब्दावाटे प्रकट करणारे वाचीवीर स्वामीजी नव्हते. तर 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' अशा प्रकारचे करुणामय व्यक्तिमत्व त्यांचे होते. पीडित दुःखीत त्रस्त माणसाबद्दल त्यांच्या मनात अपार करुणा होती. ही करुणा प्राप्त व्यक्त होण्यासाठी समोरच्या व्यक्तीची जात,पात, धर्म,भाषा, लिंग असा कोणताही भेद स्वामीजींच्या मनावर परिणाम करू शकत नसे. करुणामूर्ती असलेले स्वामीजी मानवमित्र होते. त्यांना विनम्र अभिवादन!

सुधीर गाडे पुणे 

(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. स्वामी विवेकानंद यांच्यावरील हा लेख सुंदर आणि प्रेरणादायी आहे.. उत्तम लिखाण आणि नेहमीप्रमाणे सुंदर सादरीकरण 🙏

    ReplyDelete
  2. सर तुमचे स्वामी विवेकानंदांवरील लेख नेहमीच फारच सुंदर असतात आणि त्या संदर्भातील भाषण सुद्धा फारच सुंदर असतं बऱ्याचदा वाचण्याचा आणि ऐकण्याचा योग आला

    ReplyDelete
  3. स्वामी विवेकानंद यांचे करुणामय व्यक्तिमत्व कसे होते हे सर तुम्ही उदाहरणांसहीत दिले आहेत..खूपच सुंदर लेखन केले आहे सर.......🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची