शब्दांविना संवाद
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीमध्ये 'शब्देवीण संवादु' असा उल्लेख येतो. माणसाला संवाद साधण्यासाठी स्वाभाविकपणे भाषेचा म्हणजेच शब्दांचा वापर करावा लागतो. परंतु काही वेळा शब्दांशिवाय देखील संवाद होतो.
संवाद म्हणजे काय तर एकमेकांकडे असलेली माहिती ,विचार ,भावभावना एकमेकांकडे पोहोचवणे. या देवाणघेवाण करण्याला संवाद म्हणतात. या संवादाबद्दल अनेक प्रकारची चर्चा होत असते. संवाद कौशल्याच्या दृष्टीने शब्दातून संवाद किंवा आणि शब्दांशिवाय संवाद म्हणजे कृती किंवा हावभाव यातून संवाद असे त्याचे दोन प्रकार सांगितले जातात. एकूण होणाऱ्या संवादामध्ये दोन्हीही प्रकारांचा समावेश होतो आणि दोन्हीही प्रकारांचे प्रमाण लक्षणीय आहे.
काही वेळा माणसे मौन राहतात. परंतु अशा मौन अवस्थेत देखील कधीतरी अशी काही घटना घडते की साधारणपणे निःशब्द राहणारेदेखील बोलू लागतात. गीत रामायणामधील ' राम जन्मला ग सखी राम जन्मला' या गीतामध्ये शब्दप्रभू ग .दि. माडगूळकर यांनी 'मौनालाही स्फुरले भाषण' असे राम जन्माच्या वेळचे वर्णन केले आहे. यातून त्या प्रसंगाचा झालेला परिणाम प्रभावीपणे व्यक्त झाला आहे .
काही वेळा हे मौन एखाद्या साधनेचा भाग म्हणून स्वीकारले जाते. भारतात अनेक प्रकारच्या आध्यात्मिक साधना प्राचीन काळापासून केल्या जातात त्यातील एक साधना 'विपश्यना' ही होय. यामध्ये शाब्दिक मौनाची पुढची पायरी आचरणात आणणे आवश्यक असते. याला 'आर्य मौन 'असे म्हणतात. यामध्ये शब्द आणि कृती या दोन्हीहीद्वारे संवाद न साधण्याचे पथ्य पाळावे लागते. अनेक जणांना ते अडचणीचे, गैरसोयीचे वाटते. परंतु अनेकांना त्याचा चांगला परिणाम झाला आहे असा अनुभव येतो.
महात्मा गांधी यांच्यासारख्या लोकोत्तर पुरुषाने मौनाचे सामर्थ्य ओळखले होते. आपल्या पत्रव्यवहाराला वेळ मिळावा या हेतूने त्यांनी मौन पाळण्याची सुरुवात केली. परंतु त्यातील उपयुक्तता लक्षात घेऊन पुढे आपल्या नियमित आचरणात त्यांनी मौनाचा समावेश केला. दर सोमवारी गांधीजी मौन पाळत असत. अर्थात त्यांना भेटायला येणारे लोकांची गर्दी असे. त्या लोकांशी ते प्रसंगी लिहून संवाद साधत असत. या साधनेमुळे आपली आंतरिक शक्ती वाढण्याचा अनुभव येतो असे गांधीजींचे म्हणणे होते.
आध्यात्मिक साधना जसजशी वाढत जाते तसतशा त्या माणसाला विविध सिद्धी प्राप्त होत जातात. यातील एक सिद्धी म्हणजे शब्दांशिवाय संवाद साधण्याची. आध्यात्मिक व्यक्तिंच्या शब्दांविना साधलेल्या संवादाची ही काही उदाहरणे.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
इंदूरमधील स्वामी माधवनाथ आणि नाशिकमधील गोविंददास हे दोघेही १९,२० व्या शतकातील प्रसिद्ध आध्यात्मिक सत्पुरूष. एकदा श्री माधवनाथ महाराज श्री गोपालदास महंतांकडे गेले. तेथे गेल्यावर त्यांनी त्यांच्याकडे पाहून आपले दंड थोपटले. ते पाहून गोपाळदासांनी आपल्या मांडीवर थाप मारली. त्यावर माधवनाथांनी तोंडाशी हात घेऊन मोठा ध्वनी केला. तसेच गोपाळदासांनी पण तसेच केले. अशा खुणा सामान्य माणसांच्या बुद्धीला समजणे शक्यच नाही. ते फक्त संतच जाणतात. ह्याचे श्री माधवनाथ महाराज चरित्रात वर्णन केले आहे. या प्रसंगात दोघांनी कृतीचा वापर करून एकमेकांशी संवाद साधला.
योगदा सत्संग सोसायटीच्या माध्यमातून जगभर क्रिया योगाचा प्रसार करणारे परमहंस योगानंद हे आपले गुरु युक्तेश्वर स्वामी यांच्या अंत्यसमयी त्यांच्याजवळ उपस्थित नव्हते. स्वामी युक्तेश्वर यांनी जगन्नाथ पुरी येथे देह ठेवला. त्यावेळी स्वामी योगानंद हे कोलकात्याजवळच्या आश्रमात होते. त्यामुळे गुरूंची भेट झाली नाही. याचे योगानंद यांना अतिशय दुःख झाले. गुरूंच्या आज्ञेनुसार ते पुढील कार्याला लागले. भारतातले वास्तव्य पूर्ण करून पुन्हा एकदा अमेरिकेत जाण्यासाठी ते मुंबईला पोहोचले. परंतु त्यांच्यासोबत पाठवल्या जाणाऱ्या गाडीबाबत तांत्रिक अडचण उत्पन्न झाली. त्यामुळे अमेरिकेला जाण्याचा बेत पुढे ढकलला गेला. स्वामी योगानंद आपल्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. गुरु ज्यांच्या शारीर रूपामध्ये पुन्हा एकदा भेटावे अशी अतिशय तीव्र इच्छा स्वामी योगानंद यांच्या मनात उत्पन्न झाली आणि त्यांचे गुरू सदेह त्यांच्या खोलीत प्रकट झाले. अंतःकरण गहिवरून टाकणारी भेट झाली. स्वामी युक्तेश्वर आपल्या पुढच्या कार्याबद्दल योगानंद यांना सांगू लागले. या कार्याची माहिती देताना काही वेळा संवाद शब्दाविना झाला आहे असे स्वामी योगानंद यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ ॲन योगी' या पुस्तकात लिहून ठेवले आहे. ही घटना सण १९३६ मध्ये घडली.
१९४० ते १९७३ असा दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परम पूजनीय सरसंघचालक म्हणून श्री गोळवलकर गुरुजी यांनी काम केले. संघाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी श्री गुरुजी विरक्त वृत्तीने सारगाछी या बंगालमधील रामकृष्ण मठाच्या आश्रमात काही काळ राहिले होते. तिथेच त्यांना श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी अखंडानंद यांच्याकडून संन्यास दीक्षा मिळाली होती. पुढे श्री गुरुजी संघाच्या कार्यात सहभागी झाले. या कार्यासाठी ते देशभर प्रवास करीत असत. या प्रवासात अनेक संत सज्जन यांच्या भेटी ते घेत असत. अशाच एका प्रवासातील प्रसंग पूजनीय श्रीगुरुजींच्या संदर्भात आठवणींमध्ये माननीय सुदर्शनजी यांनी लिहून ठेवला आहे. पॉंडेचरीला श्री माताजींची भेट घेण्याकरता पूजनीय श्रीगुरुजी आले होते. त्यांच्या भेटीच्या वेळेला सुदर्शनजी आणि अन्य काही कार्यकर्ते प्रबंधक म्हणून बरोबर होते. माताजींच्या आश्रमात पूजनीय श्रीगुरुजी प्रबंधकांसह पोहोचले. सुदर्शनजी आणि एक कार्यकर्ता गुरुजींच्या बरोबर माताजींच्या खोलीपर्यंत गेले असता तेथील शिष्यांनी त्या तिघांना माताजींच्या खोलीत जायला सांगितले. श्रीगुरुजींना एका खुर्चीवर बसायला त्यांनी खूण केली. हे दोघेजण कडेला उभे राहिले आणि तो माताजींना बोलावण्याकरता बाहेर पडला. 'माताजी येत आहेत' असं त्याने परत येऊन सांगितलं. पूजनीय श्रीगुरुजी उभे राहिले. माताजी आत आल्यानंतर दोघांनी परस्परांना नमस्कार केला. माताजींनी त्यांना परत खुर्चीवर बसण्याकरता खूण केली व आपण दुसऱ्या खुर्चीवर बसल्या. या दोन खुर्च्यांच्या मध्ये अनेक लाल गुलाब एका मोठ्या पात्रामध्ये सुंदर सजावट करून भरून ठेवले होते. काही क्षणानंतर माताजी उभ्या राहिल्या त्यांनी श्रीगुरुजींकडे एकटक पाहिलं, त्या पात्रामधील एक गुलाबाचे टवटवीत फूल उचलून त्यांनी पूजनीय श्रीगुरुजींच्या हाती दिलं. दोघांनी परस्परांना नमस्कार केला आणि दोघेही खोलीच्या बाहेर पडले.
सुदर्शनजींनी ही आठवण लिहीताना म्हटले आहे की, 'दोघांचा शब्दाविना संवाद काय असतो हे मला त्यादिवशी समजले.'
अशा घटना आपल्याला आश्चर्यचकित करतात. परंतु यामागचा कार्यकारणभाव तपशील सहजपणे नाही. शब्दांविनादेखील संवाद होतो एवढेच यातून समजते.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
मौनम सर्वार्थ साधनम... खूप छान लेख सर
ReplyDeleteसर धन्यवाद
Deleteशब्देवीण संवादु काही गोष्टी न बोलताही सांगता येतात.. आणि ज्याला ही शब्दविण भाषा उमगते तो कोणाच्याही मनाचा ठाव येऊ शकतो. सुंदर लेख लिहिला सर🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteखूपच सुंदर लेख. आपल्या अभ्यासू लेखांमुळे आमच्या सारख्यांना अनेक नवनवीन गोष्टींचा परिचय होतो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. पुढच्या लेखाची वाट पाहत आहे.
ReplyDeleteडॉक्टर धन्यवाद. तुमचा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे. 🙂
ReplyDeleteछान लेख सुधीर जी, असा नेमका संवाद करण्याची योग्यता साधनेने येते हे खरे आहे
ReplyDeleteहोय. सत्यजित धन्यवाद
Delete