आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू
आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ या दिवशी झाला. एका सभेत बोलताना आचार्य अत्रे म्हणाले, " माझा जन्म १३ ऑगस्ट चा. भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्टला मिळाले. दोन चांगल्या गोष्टींच्या मध्ये एक वाईट गोष्ट घडावी लागते म्हणून स.का.पाटील यांचा जन्म १४ ऑगस्ट या दिवशी झाला. आपल्या विरोधकांना वेगवेगळ्या प्रकारे उपहासाने नामोहरम करण्याचा हा एक आचार्य अत्रे यांच्या शैलीचा नमुना होता. स. का. पाटील हे त्या काळात मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्राला त्यांचा विरोध होता. " सूर्य चंद्र असतोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही." असे विधान त्यांनी केले होते. त्यावर अत्रे म्हणाले होते की , "सूर्य चंद्र काय तुझ्या बापाचे नोकर आहेत का?" अशा या विरोधकाला हिणवण्याची संधी आचार्य अत्रे यांनी आपल्या वाढदिवसाच्या भाषणात घेतली होती.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
आचार्य अत्रे यांचे यांचा जीवनपट बघताना असे लक्षात येते की त्यांना जे करायचे होते ते करता आले नाही. त्यांना स्वतःला आपल्या काकांसारखे वकील व्हायचे होते. पण आयुष्यात घडत गेलेल्या योगायोगांनी त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश झाला. ज्या क्षेत्रात प्रवेश झाला त्या सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या क्षमतेने, कर्तृत्वाने आपला ठसा उमटवला.
या यशस्वी आयुष्याची आयुष्याचा विचार करताना लक्षात येते ते म्हणजे त्यांची मोठ्या माणसांना भेटण्याची, त्यांचे बोलणे ऐकण्याची, त्यांच्याकडून काही ना काही शिकण्याची वृत्ती! लहानपणापासून आपल्या अंगात काव्य गुण आहे हे अत्रे यांना माहित होते. काही कवितादेखील त्यांनी केल्या होत्या. पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये शिकायला आल्यानंतर योगायोगाने त्यांच्या वर्गात बालकवी आणि राम गणेश गडकरी या दोघांचीही धाकटी भावंडे होती. त्यांच्या माध्यमातून आचार्य अत्रे यांची या दोघांशीही ओळख झाली. आपल्याला अशा मोठ्या लोकांचा सहवास लाभला पाहिजे त्यातून काही शिकले पाहिजे हे आचार्य अत्रे ठरवले. गडकरी यांच्याशी त्यांचे स्नेहबंध जुळले. त्यातून साहित्यिक क्षेत्रातील तंत्राची अत्रे यांना ओळख झाली. याचबरोबर त्या काळात पुण्यात होणाऱ्या प्रसिद्ध वक्त्यांच्या भाषणाला अत्रे आवर्जून जात असत. लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डेकर, अच्युतराव कोल्हटकर अशा अनेक जणांची भाषणे अत्रे यांनी मन लावून ऐकली. लोकमान्य टिळक यांचे तर ते भक्तच होते. या प्रसिद्ध मोठ्या माणसांच्या सहवासाची ही ओढ कळत नकळत आचार्य अत्रे यांच्यावर वेगवेगळे संस्कार करून गेली. याचेच वर्णन अत्रे यांनी, "जन्मभर सद्गुणांच्या दाराशी जी माधुकरी मागितली त्या भांडवलावर मी काहीतरी करु शकलो." अशा शब्दांत केले आहे.
आचार्य अत्रे यांचा दुसरा गुण म्हणजे कष्ट करण्याची तयारी. ज्या ज्या क्षेत्रात ते उतरले त्या त्या क्षेत्राला आवश्यक अशा गोष्टींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यासाठी शेकडो ग्रंथांचे वाचन केले. आपला स्वतःचा ग्रंथ संग्रह तयार केला. सर्व गोष्टी बारकाईने समजावून घेऊन आवश्यक ते कष्ट त्यांनी घेतले. अर्थातच या कष्टाला त्यांच्या अंत:स्फूर्तीची देखील जोड होती. या स्फूर्तीतून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सुचत गेल्या. त्यामुळे १ टक्के स्फूर्ती आणि ९९ टक्के कष्ट ही उक्ती त्यांच्या यशाला लागू पडते.
आचार्य अत्रे यांचा पुढचा गुण म्हणजे त्यांची खचून न जाण्याची वृत्ती. त्यांचे काका दिनकर अत्रे यांनी एक आर्थिक गुंतवणुकीची कंपनी चालवायला घेतली. त्या कंपनीची मूळची योजना सदोष होती. त्यामुळे गुंतवणुकदारांची फसवणूक होत होती. तरीही या फसवणुकीतून मार्ग काढून चांगले काही करण्याच्या उद्देशाने बहुतेक दिनकर अत्रे यांनी ती कंपनी चालवायला घेतली. या फसवणुकीच्या आरोपावरून पोलिसात तक्रार झाली. आचार्य अत्रे यांचा खरतर काही संबंध नसताना वैयक्तिक आकसाने त्यांचे नाव यात गोवण्यात आले. तोपर्यंत ते महाराष्ट्रात शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांच्या बदनामीची वावटळ उठली. शेवटी उच्च न्यायालयात त्यांची निर्दोष मुक्तता झाली. पण या संकटकाळात "काही वेळा आत्महत्या करण्याचा विचार मनात येऊन गेला. पण मी त्या वाटेने गेलो नाही." असे आचार्य अत्रे यांनी लिहिलेले आहे. पुढे चित्रपटक्षेत्रात मिळालेल्या सुरुवातीच्या मिळालेल्या यशानंतर मोठा आर्थिक फटका त्यांना बसला. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. दिवाळखोरीची परिस्थिती ओढवली. पण या संकटातही अत्रे खचले नाहीत. हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे.
आचार्य अत्रे यांची असणारी भव्य दिव्य उद्दिष्टे हा एक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पैलू आहे. कोणतीही गोष्ट करायची तर ती मोठ्या प्रमाणावर करायची असाच त्यांचा खाक्या होता. त्यामुळे वृत्तपत्र निर्मिती, चित्रपट निर्मिती या सर्व क्षेत्रात त्यांनी भव्य दिव्य उद्दिष्टे ठेवली. "नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राइम" असे इंग्रजीत म्हणतात. आचार्य अत्रे यांनी लहान उद्दिष्ट ठरवण्याचा गुन्हा कधीही केला नाही. त्यामुळे पुण्यातील अत्रे सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पु. ल. देशपांडे म्हणाले होते, " अत्रे बे एके बे चा पाढा शिकले नाहीत तर दोन हजाचा पाढा शिकले होते."
आचार्य अत्रे यांची गुणग्राहकता आणि मोकळ्या मनाने गुणवंतांचे कौतुक करण्याची वृत्ती हा त्यांच्या स्वभावाचा एक विशेष पैलू आहे. अनेक गुणवंत व्यक्तींना त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात प्रसिद्धी दिली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक शिवाजी सावंत यांनी 'छावा' ही कादंबरी लिहिली. आचार्य अत्रे यांच्या वाचनात ती कादंबरी आल्यानंतर आचार्य अत्रे यांनी या कादंबरीचे कौतुक करणारा दीर्घ अग्रलेख त्यांच्या लोकप्रिय दै. मराठा या वर्तमानपत्रात लिहिला. त्यामुळे शिवाजी सावंत प्रसिद्धीच्या झोतात आले. शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी आर्थिक ओढाताण सोसून ' राजा शिवछत्रपती ' हा आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. कुठून तरी तो ग्रंथ आचार्य अत्रे यांच्या वाचनात आला आचार्य अत्रे यांनी या ग्रंथावर अग्रलेख लिहिला आणि राजा शिवछत्रपती याची लोकप्रियता वाढू लागली. पु. ल. देशपांडे यांच्या 'बटाट्याची चाळ' या एकपात्री प्रयोगाला आचार्य अत्रे एकदा आले. प्रयोग संपल्यानंतर काहीही न बोलता ते तिथून बाहेर पडले. पहाटे दीड दोनच्या सुमाराला अत्रे यांनी पु.ल. यांना फोन केला आणि सांगितले की , "मी आत्ताच तुमच्या या प्रयोगावर अग्रलेख लिहून पूर्ण केला आहे. तो तुम्ही वाचा." अर्थातच या लेखात पुलंच्या प्रयोगाचे कौतुक केलेले होते. मोकळ्या मनाने दुसऱ्यांच्या कलागुणांना वाखाणणे हा अत्रे यांचा गुण लक्षात घेण्यासारखा आहे.
कोणत्याही रूढ चाकोरीत न बसणारे जीवन आचार्य अत्रे जगले. यशस्वीदेखील झाले. पण "मी जीवनाचा एक यात्रेकरू आहे." असे ते म्हणत. खिडकीतून डोकावणाऱ्या मांजराच्या उत्सुकतेने आपण आयुष्यकडे बघतो असे ते म्हणत. ही उत्सुकताचा त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात घेऊन गेली. "आपण आयुष्याभर अनेक चांगल्या गोष्टी केल्या. अनेकजणांशी वाद घातले. अनेक चुकादेखील केल्या. पण कृतघ्नपणा कधीही केला नाही." अशा शब्दांत त्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल सांगितली आहे. निःसंशयपणे आचार्य अत्रे यांचे जीवन महाराष्ट्रातील एक पर्व होते.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
आचार्य अत्रे यांना ऐकण्याची व पहाण्याची संधी मला वयाच्या नवव्या वर्षी बारामती येथील बारामती कॉलेजच्या स्नेह संमेलनाच्या वेळेस मिळाली. त्यावेळेस त्यांचे भाषण त्या वयात सुद्धा मला इतके भावले की नंतर जेंव्हा जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा तेंव्हा त्यांच्या भाषणाला मी हजेरी लावत असे. त्यांचे शेवटचे भाषण १९६८ पुणे येथे ऐकले. त्या त्या प्रसंगाच्या वेळेस त्या वेळेला अनुसरून टीकात्मक , उपहासात्मक विनोदी, कौतुकास्पद अशी भाषणे करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या भाषणामध्ये श्रोते इतकी तल्लीन होत असत की फक्त विनोदी भाषणाच्या वेळेस हास्याचे फवारे उडत असत बाकीच्या वेळेस सभेमध्ये पूर्ण शांतता असे. माझ्या कॉलेजच्या काळात बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेल्या एका घटनेच्या बाबतीत त्यांनी एक उपहासात्मक टीकात्मक आणि विनोदी असा अग्रलेख लिहिला होता. त्याची खूपच चर्चा संपूर्ण पुण्यामध्ये झाली होती.
ReplyDeleteसुधीर गाडे सरांचा आदर्श असणाऱ्या व्यक्तिंचा गाढा अभ्यास आणि त्यातील सार आम्हा वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या हातोटी बद्दल त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच पडेल.
खूप खूप धन्यवाद सर, अशा आणखी भरपूर लेखांची आतुरतेने वाट पाहत आहे
डॉक्टर धन्यवाद!
Deleteकोटी करण्यात प्रसिद्ध असणारे अत्रे पुन्हा समजून घेता आले
ReplyDeleteधन्यवाद सर!
नमस्कार मॅडम 🙏
Deleteआचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू तुमच्या लेखनाद्वारे समजला धन्यवाद सर🙏
ReplyDeleteसर नमस्कार 🙏
Delete