मैत्रीची गाडी
( काल्पनिक कथा )
" विचार करतोय एखादी चारचाकी गाडी घ्यावी. बघूया कधी जमतंय ते." धीरज म्हणाला. "अरे, मीपण या १०-१५ दिवसांत नवीन गाडी घेणार आहे." राजीव म्हणाला. नंतर थोड्या वेळात बोलणं संपलं आणि दोघं आपापल्या दिशांनी निघून गेले.
( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )
धीरज आणि राजीव शाळेच्या असल्यापासूनचे मित्र. शेजारी शेजारी राहायचे. एकत्रच सायकलवर शाळेत जायचे परत यायचे. अभ्यास, दंगामस्ती, सणवार सगळं काही एकमेकांसोबतच. शाळा संपल्याच्या वळणावर वाटा वेगळ्या झाल्या. दोघंही आपापल्या मार्गाला लागले. अधूनमधून भेटी होत. ख्याली खुशाली समजत राहायची. यातल्या राजीवची आर्थिक प्रगती झपाट्याने झाली. शिक्षण, उच्च शिक्षण, स्वतःचा व्यवसाय. त्यात बसलेला जम. असं करत करत तो अधिकाधिक श्रीमंत होत गेला. एका टप्प्यावर आधीचे घर सोडून नवश्रीमंतांच्या वस्तीत राहायला गेला.
इकडं धीलचंही बरं चाललं होतं. आधीदेखील तो मध्यमवर्गीय घरातला होता. शिक्षण, नोकरी यामुळे त्याचीदेखील परिस्थिती सुधारली. त्यानंदेखील एका चांगल्या मध्यमवर्गीय सोसायटीत फ्लॅट घेतला.
राजीव, धीरज यांची यथावकाश लग्नं, मुलबाळं हीदेखील प्रगती होत गेली. राहण्याची ठिकाणं वेगवेगळी झाली होती. त्यामुळे रोजच्या रोज काही भेट होत नसे. पण दोघेही ठरवून दोन चार दिवसांनी भेटायचेच. सुखा दुःखाच्या गोष्टी व्हायच्या. जुन्या नव्या आठवणी निघायच्या. क्वचित एकत्र फिरायला जाणं, एकमेकांच्या घरी येणंजाणं असं चालू असेच. मैत्रीचा हा धागा दोघांच्या बायकांमध्येही नकळत विणला गेला होता. त्याही आपलं दुखलंखुपलं एकमेकींना मनमोकळेपणाने सांगायच्या. असं सगळं कसं सुरात चालू होतं.
राजीवची आर्थिक प्रगती चांगली असल्याने पाच सहा वर्षांच्या अंतराने त्यानं दोन वेळा गाड्या बदलल्या होत्या. नवीन गाडी घेताना अजून चांगली, अधिक सुखसोयी असलेली गाडी घेणं त्याला शक्य झालं होतं. आतादेखील त्याला अजून चांगली गाडी घ्यायची होती. दरम्यान धीरजदेखील आपल्याला परवडेल अशी एखादी चारचाकी गाडी घ्यावी या निर्णयापर्यंत आला होता. अर्थात गाडी घ्यायला त्याला अजून थोडासा वेळ लागणार होता.
आजच्या भेटीनंतर घरी परतताना राजीव नवीन घ्यायच्या गाडीबद्दलच विचार करत होता. अचानक एक कल्पना त्याच्या डोक्यात चमकली. घरी गेल्यावर लगेच बायकोशी म्हणजे लताशी बोलायचं असं त्यानं ठरवलं. घरी गेल्या गेल्या लताशी तसं त्यानं बोलणंही केलं.
नंतरचे काही दिवस असेच गेले. एके दिवशी राजीवनं सकाळी सकाळी धीरजला फोन केला. त्यानं धीरजला आपण आज सायंकाळी भेटू असं सांगितलं. धीरजदेखील हो म्हणाला. फक्त एकच गोष्ट धीरजला वेगळी वाटली की आजचं भेटीचं ठिकाण नेहमीपेक्षा वेगळंच होतं. अजून एक गोष्ट राजीवनं आवर्जून सांगितली होती ती म्हणजे, "सुधावहिनींनादेखील घेऊन यायचंंच." का? कशाला? याचं उत्तर काही राजीवनं दिलं नाही. संध्याकाळी कळेलच असं म्हणत सोडून दिलं होतं.
धीरजंन हे सगळं आपल्या बायकोला म्हणजेच सुधाला सांगितलं. तेव्हा तिलाही जरा नवलच वाटलं. पण असेल काहीतरी म्हणून तिनंही फार विचार केला नाही. तीदेखील पुढच्या कामाला लागली.
दुपार टळून संध्याकाळ झाली. धीरज आणि सुधा गडबडीनंच ठरल्या ठिकाणी पोचलं. राजीव अजून आला नव्हता. पण थोड्याच वेळात तोही पोहचला आणि गंमत म्हणजे त्याची लतादेखील बरोबर होती. आल्याआल्या राजीव म्हणाला, " वहिनी, धीरज आता एक सरप्राइज आहे. आम्ही तुमचे डोळे बांधून तुम्हाला एके ठिकाणी घेऊन जाणार आहोत. हो. हो. का? कुठे ? हे आता विचारू नका. कळेलच थोड्या वेळात." हा काय प्रकार म्हणून धीरज आणि सुधानं एकमेकांकडे पाहिलं. पण राजीव आणि लतानं दोघांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. अलगद हाताला धरून राजीवच्या गाडीत बसवलं आणि गाडी निघाली. जेमतेम काही मिनिटांतच गाडी थांबली. परत राजीव आणि लता यांनी हाताला धरून गाडीतून खाली उतरवलं. काही पायऱ्या चढून सगळी मंडळी वर गेली.
राजीव म्हणाला, " वहिनी, धीरज, तयार बरं का? आता सरप्राइज दिसेल तुम्हाला." आता काय बघायला मिळतंय असं धीरज आणि सुधाच्या मनात येतंय न येतंय तोच दोघांच्याही डोळ्यांवरच्या पट्ट्या सोडल्या आणि दोघंही समोर बघू लागले. धीरज आणि सुधाच्या लक्षात आलं की ते एका भारी कारच्या शोरूममध्ये आहेत. समोर दोन एकसारख्या गाड्या आहेत. फक्त एकच फरक होता तो म्हणजे दोन्ही गाड्यांचे क्रमांक एकाने कमी जास्त होते.
धीरजला क्षणभर समोर काय दिसतंय याचा अर्थच कळेना. एक दोन मिनिट शांततेत गेल्यावर तो म्हणाला, " अरे राजीव ह्या कुणाच्या गाड्या आहेत?" राजीव म्हणाला, " ओळख पाहू?" " अरे सांग बाबा एकदाचा." धीरज. राजीव म्हणाला, " जिचा नंबर पहिला आहे ती तुझी आणि दुसरी माझी. आहेत की नाही शाळेत असतानाच्या आपल्या एकसारख्या सायकलींप्रमाणे?"
धीरज आणि सुधा आता एकदम थक्क झाले होते. त्यांना अजून याचा उलगडा होत नव्हता. धीरज सावकाश म्हणाला, " अरे पण एवढी महागडी गाडी माझी कशी असेल?" तेव्हा राजीव आणि लता या दोघांनी हाताला धरून धीरज आणि सुधाला शोरूममधल्या कोचावर नेऊन बसवलं. पाणी मागवलं.
थोड्या वेळाने राजीव सांगू लागला," अरे धीरज आपलं मधे नवीन गाड्या घेण्याबद्दल बोलणं झालं. त्यादिवशी घरी परत जाताना माझ्या मनात आलं की शाळेत असताना आपल्या दोघांच्या सायकली एकसारख्याच होत्या मग आताही एकसारख्या गाड्या घ्याव्यात मी लगेच लताला सांगितलं तिलाही ते पटलं आणि म्हणून मी या दोनही गाड्या आपल्या दोघांच्या नावे खरेदी केल्या आहेत." धीरज आणि सुधाने हे ऐकून चक्क आ वासला. धीरज म्हणाला , "अरे पण एवढे पैसे मी तुला कधी देणार? मला नाही बाबा एवढी महागडी गाडी परवडणार." राजीव म्हणाला , "एवढे पैसे तू द्यायचेच नाहीत. तुझं जेवढे बजेट आहे तेवढेच पैसे तू मला द्यायचे. उरलेले मी आपल्या मैत्रीखातर घातलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे याला नाही म्हणायचंच नाही. गाडीची कागदपत्रे तयार झाली आहेत. हो की नाही गं लता?" लतानं देखील हसतहसत त्याला दुजोरा दिला.
पुढे बराच वेळ धीरज आणि सुधानं नाही म्हणायचा आटोकाट प्रयत्न केला. पण राजीव आणि लता यांनी अजिबात काही ऐकलं नाही. शेवटी निरुपाय होऊन धीरज आणि सुधा यांना ते मान्य करावं लागलं. दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. धीरज हात हातात घेऊन राजीव हलकेच थोपटत होता. तर लताना सुधाला जवळ ओढून कुशीत घेतलं होतं. चौघेही गाड्यांच्या मागच्या बाजूला गेले. दोन्ही गाड्यांवर लिहलं होतं 'मैत्रीची गाडी'.
सुधीर गाडे,पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
Comments
Post a Comment