खाद्यपदार्थांच्या काही आठवणी

मध्यंतरी एक घरगुती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात पदार्थ कसे झाले आहेत हे आधी चाखून बघायचे होते. ते करत असताना एक माझा फोटो काढला गेला. तो बघताना मनात विचार आला की कोणकोणते पदार्थ पहिल्यांदा खाल्ल्याच्या आठवणी आहेत. तर वेगवेगळे पदार्थ आणि ते खाण्याचे प्रसंग आठवत गेले. त्यातील हे काही मोजके प्रसंग. ( छायाचित्रकार कु.शंतनू गाडे ) मी त्यावेळी इयत्ता नववीमध्ये शिकत होतो. आमच्या साखरवाडीमधील शाखेची सहल पुण्यात काढली होती. त्या सहलीचे नियोजन त्यावेळचे फलटण तालुका प्रचारक श्री. मिलिंदराव फडके आणि साखरवाडीमधील संघाचे कार्यकर्ते श्री. संजयकाका वाळिंबे यांनी या सहलीचे नियोजन केले होते. वर्ष बहुतेक १९८७ असावे. पुण्यात लालमहाल, शनिवारवाडा, पर्वती, सिंहगड किल्ला अशा काही ठिकाणांना भेट दिल्याचे आठवते. याच पुण्याच्या सहलीत पहिल्यांदा पाणीपुरी हा प्रकार खाल्ल्याचे आठवते. तोपर्यंत साखरवाडीमध्ये कधी पाणीपुरी खाल्ल्याचे आठवत नाही. एका घासात मोठ्ठा आ करून ती एक पाणीपुरी खायची. पहिली खाऊन व्हायच्या आत पाणीपुरीवाल्याची पुढची ...