संघाचे प्रचारक

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी पूर्ण होत असताना संघाबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे. तसे कुतूहलदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. संघाचे काम चालते कसे त्याचा विस्तार कसा होतो गेला याबाबत देखील बऱ्याच जणांना माहिती हवी असते. संघ कामाच्या वेगवेगळ्या पैलूंपैकी संघाची असलेली प्रचारक यंत्रणा हा एक महत्त्वाचा घटक आहे. 

            ( पुस्तकाचे मुखपृष्ठ )

        भारताच्या प्राचीन परंपरेमध्ये हजारो वर्षापासून संन्यासी वर्गाचा उदय झालेला  बघायला मिळतो. लौकिक जीवनापासून दूर राहून परमेश्वर प्राप्तीसाठी निरंतर साधनारत असणारे अगणित साधू,संन्यासी होऊन गेले. असेच जीवन जगणारे अनेकजण आजही आहेत. या परंपरेचा धागा काही अंशाने संघाच्या प्रचारक व्यवस्थेत बघायला मिळतो. आपले कुटुंब, लौकिक आकांक्षा यांचा त्याग करून संघाच्या योजनेनुसार सांगितलेल्या ठिकाणी सांगितलेल्या पद्धतीचे पूर्ण वेळ काम करणाऱ्या  संघाच्या स्वयंसेवकांना 'प्रचारक' असे म्हणतात. यातील बरेच जण काही वर्षे 'प्रचारक' म्हणून संघकाम करतात आणि नंतर आपापल्या व्यावहारिक गरजा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गृहस्थी आयुष्याला सुरुवात करतात. तर प्रचारक म्हणून काम सुरू केलेल्यांमधील मोजके काहीजण आयुष्यभर प्रचारक म्हणून कार्यरत राहतात.

          संघाची सुरुवात करत असतानाच आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाच्या देशव्यापी कामाची कल्पना केली होती. हे कार्य किती अवघड आहे याची त्यांना निश्चितच कल्पना होती. त्यामुळे त्यांनी स्वतः अविवाहित राहून स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अत्यंत मर्यादित करून संघ विस्तारासाठी आजीवन कष्ट केले. एका अर्थाने 'प्रचारक' हे नाव उपयोगात येण्यापूर्वी त्यांनी स्वतः प्रचारक जीवन जगून दाखवले.

     परंतु डॉ. हेडगेवार यांच्या सर्वत्र जाण्याला मर्यादा होत्या. त्यावर त्यांनी एक तोड काढली. विद्यार्थी स्वयंसेवकांना शिक्षणासाठी भारतात योजनापूर्वक वेगवेगळे ठिकाणी पाठवले. या विद्यार्थी स्वयंसेवकांनी स्वतःच्या शिक्षणाबरोबरच संघाच्या प्रसाराचे कामदेखील केले. विद्यार्थीदशा संपल्यावरही त्यातील अनेकजण पूर्णवेळ संघकाम करत राहिले. डॉ. हेडगेवार यांच्या जीवनकाळात संघाचा विस्तार प्रातिनिधिक स्वरूपात देशभर झाला. त्यांचे देहावसान १९४० मध्ये झाले. परंतु त्यानंतर देशभरात असणारी परिस्थिती स्वातंत्र्य चळवळ,  दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे स्वातंत्र्य मिळवण्याची हीच वेळ आहे अशी वाढतच चालेली समाजाची मनोभूमिका या सर्वांच्या पार्श्वभूमीवर संघाचा विस्तार अधिक वेगाने होण्याची आवश्यकता तत्कालीन सरसंघचालक प.पू. श्री गुरुजी यांना वाटत होती. म्हणून त्यांनी युवा स्वयंसेवकांना संघकार्यासाठी काही वर्षे देण्याचे आवाहन केले. यातून प्रचारक यंत्रणेच्या घडणीला एका अर्थाने सुरुवात झाली. हजारो तरुणांनी संघाच्या कामासाठी आपल्या आयुष्यातील काही वर्षे दिली. त्यांना प्रचारक हे नाव देण्यात आले. महाराष्ट्रात संघाची सुरुवात झाल्यामुळे त्याकाळात तुलनेने महाराष्ट्रात संघाचा विस्तार अधिक झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण मोठ्या संख्येने प्रचारक म्हणून कार्य करु लागले. त्यावेळच्या महाराष्ट्र प्रांताचे प्रचारक कार्यकर्ते ॲड. बाबाराव भिडे यांनी याच प्रचारकांसाठी 'प्रांत स्वयंसेवक' हा शब्द काही काळ वापरला. १९४२ मध्ये प्रचारक म्हणून कार्यरत झालेले बहुतेक जण अविवाहित तरुण होते. पण त्यांच्यातच विवाहित, मध्यम वयाचे असलेले बाबाराव भिडे हेदेखील होते.

        १९४२ मध्ये सुरु झालेली प्रचारक यंत्रणा काळाच्या ओघात हळूहळू स्थिर झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांतून या यंत्रणेच्या कार्याचे संकेत, पद्धती तयार झाल्या. आता या पद्धती मोठ्या प्रमाणावर स्थापित झाल्या आहेत. प्रचारकांमध्ये प्रामुख्याने शिक्षण पूर्ण करून प्रचारक जीवनाला सुरुवात करणाऱ्या स्वयंसेवक बहुसंख्येने आहेत. तसेच काही प्रमाणात गृहस्थी आयुष्यातील जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर प्रचारक म्हणून काम करणारे कार्यकर्तेदेखील आहेत. यात पू. डॉक्टरांच्या काळातील कै. भैय्याजी दाणी, २००० च्या दशकात काम करणारे कै. नाना जोशी ,कै. डॉ.वसंत कुंटे ही त्यामधील काही प्रातिनिधिक नावे आहेत.

      प्रचारक कार्यकर्ते सर्व काळ संघकार्यचाच विचार करत असतात आणि त्याचबरोबर कृतीदेखील करत असतात. एखाद्या स्वयंसेवकाचा प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय झाला की प्रांत स्तरांवरील बैठकीमध्ये त्याच्या कामाचे क्षेत्र आणि कामाचे स्वरुप निश्चित होते. यासाठी त्याचा पूर्वीचा अनुभव, व्यक्तिमत्त्व याचा विचार केला जातो. याच बैठकीत अन्य प्रचारकांच्या क्षेत्रात, जबाबदारीत, कामाच्या स्वरूपात आवश्यकतेप्रमाणे बदल केला जातो. याच बैठकीत काहीजण 'प्रचारक' म्हणून काम थांबवण्याचा निर्णयदेखील घेतात. अखिल भारतीय स्तरावरील बदल हे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या वेळी केले जातात.

         नव्याने प्रचारक म्हणून काम सुरु करणाऱ्या स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षणाची रचना आतापर्यंतच्या अनुभवाच्या आधारावर केली गेली आहे. त्यातून हे कार्यकर्ते लवकरात लवकर आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित कार्य करण्यासाठी सिद्ध होतात.

       नव्याने काम सुरु करणारे प्रचारक हे संघकामाचा आपापल्या ठिकाणचा अनुभव असणारे असतात. आता फरक पडतो तो वेळाचा. संपूर्ण वेळ संघकामाचा विचार कसा करायचा , प्रत्यक्ष कृतीची आखणी कशी करायची हे हळूहळू अधिकाधिक समजत जाते. झालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग होतो. स्वतःच्या कार्यक्षेत्रातील अनुभवातून काही जण आपली शैली विकसित करत जातात. कार्यक्षेत्रातील गृहस्थी कार्यकर्त्यांचीदेखील मदत होते. आधीपासून प्रचारक म्हणून काम करणारे, अधिक जबाबदाऱ्या असणारे प्रचारक हे तर एका अर्थाने नवीन प्रचारकांसाठी 'प्रत्यक्ष उदाहरण ' असते. यातूनही अनेक गोष्टी शिकायला मिळतात. काही गोष्टी कळतनकळत अंगात मुरतात.

    संघाच्या कामाचा आधारभूत असणारा कार्यकर्ता कोणता या प्रश्नाचे उत्तर सामान्य गृहस्थी कार्यकर्ता हेच संघाला अपेक्षित आहे परंतु वेगवेगळा कौटुंबिक व्यावसायिक मर्यादा यामुळे संघ कामाला अपेक्षित असणारा वेळ हा सामान्य गृहस्थी कार्यकर्ता देऊ शकत नाही परंतु संघाच्या कामाचा विस्तार वेगाने झाला पाहिजे याची देखील आवश्यकता आहे. तसेच हा विस्तार होत असताना संघाला अपेक्षित अशा पद्धतीने कार्य पुढे घेत गेले पाहिजे हेसुद्धा महत्त्वाचे आहे. समान पद्धतीने कार्य पुढे गेले तरच त्यात एकसूत्रता राहील. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन पूर्णवेळ फक्त संघाचेच काम अपेक्षित पद्धतीने करणारा कार्यकर्ता म्हणजे प्रचारक या वर्गाची निर्मिती झाली. या वर्गातील कार्यकर्त्यांची फळी जोमाने कामाला लागली.

     जे कार्यक्षेत्र मिळेल त्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या गृहस्थी कार्यकर्त्यांना मदत होईल अशा प्रकारचे काम प्रचारकाने करणे अपेक्षित आहे‌. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे कौशल्य आहे ते माणसांना जोडण्याचे ! संघकामात गुंफण्याचे! वेगवेगळ्या माणसांमधले गुण हेरून त्यांना संघकामात जोडणे, त्यांच्याकडून अपेक्षित काम होईल असे बघणे, एखादा कार्यक्रम पार पाडत असताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे जात आहेत ना याकडे लक्ष देणे, तशी योजना करणे आणि प्रत्यक्ष कार्यक्रम यशस्वी होण्यात सहभागी होणे ही प्रचारकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. कार्यक्रमाचा सर्व किंवा मोठा भाग मीच पार पाडेन अशी भूमिका त्याला घेता येत नाही. तसे अपेक्षित देखील नाही. या कार्यशैलीमुळे कार्यक्रम यशस्वी तर होतोच पण कार्यकर्त्यांची संख्या आणि गुणवत्ता यात वाढदेखील होते. हे प्रचारकाचे महत्त्वाचे योगदान आहे.

      आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यकर्ते अधिक संख्येने निर्माण व्हावेत याकडेदेखील प्रचारकाला लक्ष द्यावे लागते. यासाठी तो आपल्या कार्यक्षेत्रातील नवीन होतकरू स्वयंसेवक हेरतो. त्यांच्याशी स्नेहसंबंध निर्माण करतो. त्यांच्या विकासाला आवश्यक अशा प्रशिक्षणाची औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतींची योजना करतो. यातून तयार होणारे कार्यकर्ते त्या क्षेत्रात संघकामाचा आधार होतात. या भक्कम आधारावर त्या क्षेत्रातील काम स्थिर होते.

       प्रचारकाला काहीवेळा संघटनेसाठी अप्रिय पण आवश्यक अशा गोष्टीदेखील कराव्या लागतात. ही गोष्ट म्हणजे कार्यकर्ते, स्वयंसेवक यांच्यामधील त्रुटी किंवा दोष दाखवून देणे. हे काम अतिशय कौशल्याने करावे लागते. त्यामुळे अशा दोषांची चर्चा चारचौघात न करता वैयक्तिकरित्या भेटून संबंधित व्यक्तिशी आत्मीय भावनेने संवाद साधावा लागतो. स्थळकाळ याचे तारतम्य बाळगून बोलणे करावे लागते. माणसाच्या स्वभावातील दुरुस्तीला लागणारा वेळ लक्षात घेऊन धीर बाळगावा लागतो. एखाद्याचे दोष दाखवून देणे कदाचित त्याला न आवडल्यास तो संघकामातून बाजूला जाऊ शकतो ही शक्यता सदैव गृहित धरून काळजीपूर्वक काम करावे लागते. कुशलतेने केलेल्या अशा दुरुस्तीचा संघकामाच्या वाढीसाठी लाभ होतो.

   पूर्णवेळ संघाचेच काम करणाऱ्या प्रचारक या यंत्रणेमुळे काही अपवाद स्वरूपात दुष्परिणाम झाल्याचे बघायला मिळते. हा दुष्परिणाम म्हणजे स्थानिक गृहस्थी कार्यकर्ते संघकामासाठी कमी वेळ देऊ लागतात. त्यामुळे त्या ठिकाणचे काम प्रचारकाभोवती केंद्रित होते. त्या क्षेत्रात प्रचारक नसेल तर काम खूपच कमी होते किंवा बंद पडते. अशा प्रकारची उदाहरणे काही मोजक्या ठिकाणी अनुभवायला आली आहेत.

        त्यागपूर्ण जीवन जगत असला तरीही प्रचारक हा एक माणूसच असतो. परंतु वैयक्तिक लाभाची अपेक्षा न करता तो संघकाम करत असतो. परंतु 'माणूस हा स्खलनशील आहे.' याचे सदैव भान त्याला ठेवावे लागते. आपले वागणे, बोलणे, सवयी यातून कळतनकळत संघकामाची हानी तर होत नाही ना यासाठी त्याला सदैव जागरूक रहावे लागते. कार्यकर्त्यांच्या घरातील सर्वांशी स्नेहसंबंध जोपासताना अशा संबंधांना अयोग्य वळण लागत नाही ना यासाठी त्याला सतर्क राहावे लागते. अशा स्नेहसंबंधांतून स्वतःला संघकामाला अयोग्य सवयी तर लागत नाहीत ना याकडे लक्ष ठेवावे लागते. या सगळ्यासाठी प्रचारकाची स्वतःची जागरूकता तर महत्वाची आहेच पण यासाठी काही ज्येष्ठ स्थानिक कार्यकर्ते, ज्येष्ठ प्रचारक यांचीदेखील याबाबतीतील भूमिका महत्त्वाची ठरते. ही अनुभवी मंडळी याबाबतीत आवश्यक ते लक्ष देत असतात. 

     नवीन निघालेल्या प्रचारकांचे पालक म्हणून काम करण्याची जबाबदारी बहुतेक ठिकाणी काही स्थानिक गृहस्थी कार्यकर्त्यांना दिली जाते. अशी जबाबदारी ज्यांच्यावर असते असे कार्यकर्ते हे पुरेसे अनुभवी असतात. नवीन प्रचारकाची मूलभूत गरजांच्या बाबतीत आबाळ होणार नाही याकडे ते बारकाईने लक्ष देतात. प्रचारकाच्या वैयक्तिक गोष्टींची ते चौकशी करतात. आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देतात. 

          सगळ्या प्रचारकांसाठी एक महत्त्वाची बाब असते ती म्हणजे जेवणाची. संघाच्या अगदी सुरुवातीच्या काळात गृहस्थी कार्यकर्त्यांची संख्या तुलनेने खूपच कमी असल्याने प्रचारकांच्या जेवणाची खूप आबाळ होई. आता गृहस्थी कार्यकर्ते, काही ठिकाणी संघ कार्यालये यांच्या माध्यमातून ही व्यवस्था चांगली होते. तरीदेखील काही प्रचारकांना नवीन असताना स्वतः एखाद्याच्या घरी "मी  जेवायला येतोय" असे सांगण्याची भीड पडते. पण जेवणासाठी घरोघर जाण्याने स्नेहसंबंध दृढ होतात. घरोघरी असणारा महिलावर्ग आईच्या, बहिणीच्या मायेने जेवायला वाढतात असाच अनुभव सर्व प्रचारकांना येतो. संघकार्य करता करता मानवी भावभावनांची देवाणघेवाण सहज होते. संघाची जबाबदारी किंवा अन्य एखाद्या कारणाने ज्या घरी वारंवार जेवण्याचा योग येतो त्या घरातील सर्वांशीच प्रचारकाचे विशेष आपुलकीचे नाते निर्माण होते. प्रचारक हा जणू त्या घरचाच माणूस होऊन जातो. दिवंगत प्रचारक नानाराव ढोबळे यांनी याबाबत हृद्य लेख लिहिला आहे.

         सर्व प्रचारकांना एक महत्त्वाची शिकवण दिली जाते ती म्हणजे स्वत:चा बडेजाव न माजवता आपण इतरांसारखेच एक कार्यकर्ते आहोत हा भाव सदैव मनात ठेवून काम करण्याची. यातूनच 'अलौकिक नोहावे लोकांप्रती' अशी वागणूक ठेवण्याची सवय प्रचारकांच्या अंगी बाणते. ही सवय त्यांना वृथा अभिमानाची बाधा होऊ देत नाही.

         प्रचारक आपल्या अंगभूत क्षमता, गुण यानिशी काम करत राहतात. त्यांची धडपड वैयक्तिक लाभासाठी नसते तर संघकार्याच्या प्रसारासाठी असते. ते वैयक्तिक मोक्षासाठी साधना करत नसतात तर 'जनता जनार्दनाची आराधाना' करत असतात. हिंदू समाजाची धारणा ही आध्यात्मिकतेच्या आधारावर घडत गेलेली असून वैयक्तिक अभिलाषांचा त्याग करणाऱ्या व्यक्तिविषयीचा आदरभाव हिंदुंच्या अंतर्मनात खोलवर रुजला आहे. त्यामुळे साहजिकच त्यागभावनेने काम करणारे प्रचारक समाजाच्या आदराला पात्र होतात. जे प्रचारक आजीवन कार्य करत असतात ते याकाळातील ऋषी गणले जातात. त्यांचे वर्तन हे त्यांच्या मोठेपणाचे दर्शन घडवते.

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।

विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।

     भगवद्गीतेमधील  या श्लोकात वर्णन केलेला निरहंकारी, आत्मविलोपी , सात्विक कार्यकर्ता म्हणजे प्रचारक. त्यांचे जीवन सात्विक असल्याने दिव्यत्व उजळत जाते आणि मनामध्ये भावना येते

'दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती'!

(साप्ताहिक विवेक मुंबई यांच्यावतीने २०/०९/२०२५ रोजी प्रकाशित झालेल्या 'समिधा' या पुस्तकातील लेख)


सुधीर गाडे पुणे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची