परदेशप्रवास आणि शाकाहार
भारतामध्ये शाकाहाराला काही समाजवर्गांमध्ये विशेष स्थान आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे भारतात सर्वत्र शाकाहारी अन्न सहजपणाने मिळते. विशेष अडचण येत नाही. परंतु अशा शाकाहारी व्यक्तींना ज्यावेळी परदेशी जाण्याची वेळ येते त्यावेळी मात्र अडचण होते. कारण परदेशात प्रामुख्याने मांसाहाराचा समावेश अन्नामध्ये होतो. याबाबत दोन ऐतिहासिक व्यक्तींचे अनुभव सांगणारा हा लेख आहे.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
महात्मा गांधी यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. ते निवारण्यासाठी परदेशी जाऊन शिक्षण घेऊन येणे हा पर्याय पुढे आला. तो पर्याय सगळ्यात जास्त योग्य वाटत होता. परंतु महात्मा गांधींच्या आई पुतळीबाई यांना आपल्या मुलाने परदेशी जाऊ नये असे वाटत होते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशी गेल्यावर आपल्या मुलाचे राहणीमान बदलून जाईल. आपल्या कुटुंबाच्या परंपरेला धरून ते राहणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे महात्मा गांधी यांनी परदेशी जाण्यापूर्वी आपल्या आईला वचन दिले ते म्हणजे, " परदेशी मी मांसाहार, मदिरा आणि परस्त्री यांच्यापासून दूर राहीन." आईचे पूर्णपणे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांच्या परिचयातील एका जैन साधुंच्यासमोर देखील गांधीजींनी हेच वचन दिले. त्यानंतर त्यांचा परदेश प्रवास करण्याचा निर्णय निश्चित झाला.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
आईला दिलेल्या वचनाला जागून आपल्या आहारात शाकाहाराचा समावेश असला पाहिजे याचा प्रयत्न गांधीजी करू लागले. परंतु त्यांच्या बोटीवरच्या प्रवासात 'इंग्लंडमध्ये मांसाहाराशिवाय तुमचा निभाव लागणार नाही' अशा प्रकारचा सल्ला त्यांना वारंवार मिळत गेला. इतकेच काय परंतु इंग्लंडमध्ये ते ज्या परिचितांकडे उतरले होते त्यांनी देखील हाच सल्ला दिला. " तुमच्या आईला इथल्या परिस्थितीची कल्पना नसल्यामुळे तिने मागितलेले वचन पाळण्याचे बंधन तुमच्यावर नाही." असेदेखील सुचवले. परंतु आई वरच्या प्रेमापोटी महात्मा गांधी यांनी आपले वचन पाळणे सुरू ठेवले. परंतु खाण्यापिण्याची खूपच आबाळ होत होती. ब्रेड आणि काही मोजके पदार्थ उपलब्ध होते. महात्मा गांधी भारतात असताना मांसाहाराचे महत्व त्यांना वाटत असे. त्यामुळे मन दोलायमान होण्याचे प्रसंग येऊन गेले. पण आपले वचन मोडण्याची वेळ गांधीजी यांनी येऊ दिली नाही. याच सुमाराला त्यांना शाकाहाराचे महत्त्व सांगणारे सॉल्ट यांचे "The Logic of Vegetarianism: Essays and Dialogues" हे पुस्तक गांधीजींना वाचायला मिळाले. त्यातून शाकाहाराची तर्कशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी त्यांना पूर्णपणे पटली आणि त्यांनी त्यानंतर शाकाहाराचा मनापासून स्वीकार केला. याचबरोबर लंडनमध्ये शाकाहाराची चळवळ चालवणाऱ्या क्लबमध्ये त्यांचा प्रवेश झाला. गांधीजींनी अनेक इंग्रजी लेखकांनी लिहिलेली शाकाहाराविषयीची पुस्तके वाचली. या लेखकांनी अंड्यामधून नवीन जीव निर्माण होत नाही त्यामुळे अंडी खाणे म्हणजे मांसाहार नव्हे अशी मांडणी केली होती. ती गांधीजी यांना पटली. त्यातून काही दिवस त्यांनी अंडी खाणे सुरू ठेवले. पण नंतर त्यांनी विचार केला, ' मी आईला वचन दिले आहे. तिच्या मतानुसार अंडी हा मांसाहाराचा भाग आहे. त्यामुळे अंडी खाणे योग्य नाही. ' हा विचार करून त्यांनी अंडी खाणे सोडून दिले पुढील आयुष्यात महात्माजींनी शाकाहाराचे काटेकोर पालन केले.
( नानासाहेब परुळेकर यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
दुसरे उदाहरण आहे ते दै. सकाळ हे वृत्तपत्र सुरू करणारे नारायण भिकाजी तथा नानासाहेब परुळेकर यांचे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले भारतातील शिक्षण पूर्ण करून नानासाहेब यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचे ठरवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. जेव्हा ते कोलंबिया येथे पोहोचले त्यावेळी त्यांचे प्राध्यापक रेंच यांनी नानासाहेबांना आपल्या घरी नेले. नानासाहेब हे शाकाहारी आहेत असे लक्षात आल्यावर त्या दिवशी केवळ भात, कडधान्य , गोड पदार्थ असे जेवण झाले. रेंज यांच्या पत्नी म्हणाल्या, " आम्ही शक्यतो भात खात नाही." अमेरिकेत मांसाहार केल्याशिवाय तुमचा निभाव लागणार नाही असा सल्ला अनेक लोकांनी नानासाहेबांना दिला. पण शाकाहार करायचा हा नानासाहेबांचा निश्चय होता. त्यांनी त्यावर एक उपाय शोधला. त्यांच्या विद्यापीठात आहार शास्त्राचा अभ्यास असलेल्या माणसांकडून आपल्या आहाराचा एक तक्ता बनवून घेतला. रोज सुमारे २००० कॅलरीज मिळतील अशा प्रकारे अमेरिकेत उपलब्ध शाकाहारी अन्नाचा तक्ता तयार झाला. त्यामध्ये दूध, कडधान्य, मटार, चीज यांचा प्रामुख्याने समावेश होता. आपद्धर्म म्हणून 'नॉन फर्टीलाइज्ड एग्ज' हे त्यांनी आपल्या अन्नाचा भाग म्हणून स्वीकारले. या तक्त्यातील आहाराचे पालन करत त्यांनी आपले अमेरिकेतील वास्तव्य पूर्ण केले.
दोघांच्याही विचारातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चवीसाठी अन्न खाण्याऐवजी ते गरज म्हणून खाल्ले पाहिजे. 'स्वादाचे खरे स्थान जीभ नसून मन आहे.' असे गांधीजींनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. हेच पथ्य दोघांनी पाळले.
सध्या जगात शाकाहाराची 'वेगन' ही विशेष चळवळ आहे. त्यामध्ये मांसाहाराबरोबरच दूध आणि दुधाचे पदार्थ यांचे देखील सेवन वर्ज्य मानले जाते. एका आकडेवारीनुसार एका भारतात सुमारे दहा टक्के लोक वेगन आहेत तर भारताबाहेरील देशात दोन ते चार टक्के लोक वेगन आहेत.
महात्मा गांधी किंवा नानासाहेब परुळेकर यांच्या काळापेक्षा आता जगभरात भारतीय माणसांची संख्या सर्व देशात पुष्कळ वाढली आहे. त्यामुळे तुलनेने आता शाकाहारी माणसासाठी जास्त सोयी उपलब्ध आहेत. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची निश्चय प्रवृत्ती या दोघांच्या वागण्यातून दिसून येते.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )
दोन्ही महान व्यक्तींची उदाहरणे उत्तम, नेहमीप्रमाणेच सुंदर लेखन🙏
ReplyDelete