माणूस आणि निसर्गाचे सहजीवन
सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरोघरी भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक श्री गणेश मूर्तीचे पूजन होते. श्री गणेशाची मूर्ती उंदीर असल्याशिवाय पूर्ण झाली असे मानले जात नाही. मानव आणि अन्य प्राण्यांच्या सहजीवनाचे हे एक भारतीय उदाहरण आहे असे समजता येईल. अशाचे प्रकारे श्री शंकराच्या पिंडीसोबत नंदी, श्री शंकराच्या मूर्तीसोबत साप, श्री विष्णुच्या मूर्तीबरोबर गरुड, श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीबरोबर गाय आणि कुत्रे आवश्यक मानले गेले आहेत. या प्राण्यांबरोबर देवी लक्ष्मीचे वाहन घुबड, देवी सरस्वतीचे वाहन हंस हीदेखील उदाहरणे आहेत. याचबरोबर पूजेसाठी वेगवेगळी पानेफुलेदेखील आवश्यक मानली गेली आहेत. ही प्रामुख्याने वैदिक हिंदू संस्कृतीमधील उदाहरणे आहेत.
( छायाचित्र इंटरनेटवरून साभार ) पृथ्वीच्या पाठीवर मानवीजीवन हजारो वर्षांपासून सुरू आहे. पृथ्वीवर जशा अन्य प्राण्यांच्या जाती होत्या तशाच मानवप्राण्यांच्याही जाती होत्या. माणसाच्या जातींपैकी होमो सेपिअन्स या जातीने अन्य जातींना संपवले. यासाठी शक्ती, युक्ती दोन्हीचाही वापर केला गेला. आता उरलेल्या होमो सेपिअन्सची संख्या वाढ लागली. शेतीचा शोध लागला नव्हता. तेव्हा फळे, कंदमुळे आणि जनावरांचे मांस यावरच माणसाला आपली भूक भागवावी लागत होती. विशालकाय प्राणी हे माणसासाठी भीतीदायक होते पण त्याचवेळी अन्नाचा प्रचंड साठा म्हणूनदेखील माणूस त्यांच्याकडे पाहत होता. एकटा माणूस एकटा विशाल प्राणी अशी तुलना केली तर माणसाची शक्ती खूपच कमी होती. पण माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करुन परस्पर सहकार्याने आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन मोठ्या प्राण्यांच्या शिकारीचे तंत्र विकसित केले. पद्धतशीरपणे मोठ्या प्राण्यांची शिकार केली. याचा परिणाम म्हणून अनेक छोटेमोठे प्राणी पृथ्वीच्या पाठीवरून नामशेष झाले. असाच प्रकार वनस्पती, मासे यांच्याबाबतीतही झाला. परिणामस्वरूप पृथ्वीवरील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर कमी होत गेली.
हाच टप्पा मानवी संस्कृती निर्माण होण्याचा आणि स्थिरावण्याचा होता. या स्थिरावण्यामध्ये अनेक मानवी समुहांनी काही विशिष्ट प्राणी, वनस्पती यांच्यासोबत जुळवून घेतले. त्यांचे आपल्या उपयोगासाठी रक्षण करणे सुरू केले. यातून काही प्राणी आणि वनस्पती यांचे रक्षण झाले.
या सांस्कृतिक वाटचालीत धर्मपंथ उदयाला आले. त्यांचाही आपापसात संघर्ष झाला. काही धर्मपंथ टिकले आणि विस्तार पावले. यातील आजचे बहुसंख्य असलेले धर्मपंथ हे सेमेटिक आहेत. सेमेटिक धर्मपंथ सेमाईट टोळीच्या समस्यांपासून उत्पन्न झाले आहेत. यामध्ये कालानुक्रमे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मपंथांचा समावेश होतो. या सेमेटिक धर्मपंथांना मान्य असलेल्या तत्वज्ञाननुसार पुरुष हा पृथ्वीचा मालक असून इतर सर्व गोष्टी त्याच्या मनोरंजन आणि उपयोगासाठी आहेत. सेमेटिक धर्मपंथांना मान्य असलेली सृष्टीनिर्मितीची कथा वाचली की हा मुद्दा स्पष्ट होतो. या कथेत गॉडने सुरुवातीला सृष्टी प्राणी इ. निर्माण केले. गॉडचे प्रतिरूप असणारा पुरुष ॲडम निर्माण केला. त्याला सर्वांवर अधिकार दिला. ॲडमला जोडीदाराची आवश्यकता वाटू लागली म्हणून त्याच्या बरगडीपासून ईव्ह ही स्त्री निर्मिली. यातून पुरुष पृथ्वीचा मालक आहे ही भूमिका दिसते. हीच भूमिका पाया असल्याने इतर सर्व सजीव निर्जीव यांच्या अनिर्बंध वापराचा अधिकार पुरुषाला मिळाला. यातूनच पुढे निसर्गाचे शोषण होऊन मोठी हानी झाली.
या पार्श्वभूमीवर भारतीय तत्त्वज्ञान पाहिले तर ते माणसाला ( पुरुषाला ) पृथ्वीचा मालक मानत नाही. या तत्वज्ञानानुसार माणूस हा सृष्टीचा एक घटक आहे. त्याने अन्य घटकांशी जुळवून घेत पृथ्वीचा उपभोग घेतला पाहिजे. यात मालाकार वृत्ती आणि अंगारक वृत्ती अशा दोन प्रकारच्या वृत्ती सूत्ररूपाने सांगितल्या आहेत. मालाकार वृत्ती म्हणजे वनस्पतींवर उगवलेल्या फुलांच्या माला करून त्यातून चरितार्थ चालवणे. तर अंगारक वृत्ती म्हणजे लाकूड जाळून त्याचा कोळसा करून त्यावर चरितार्थ चालवणे. मालाकार वृत्ती निसर्गाचे दोहन दर्शविते तर अंगारक वृत्ती निसर्गाचे शोषण दर्शविते.
मालाकार वृत्तीतून प्राणी, वनस्पती त्यांच्यासोबत सहजीवन असले पाहिजे हा बोध करून देणाऱ्या प्रथा परंपरा सुरु झाल्या. याचेच उदाहरण वेगवेगळ्या देवतांच्या मूर्तींच्या बाबतीत दिसून येते. पृथ्वीवरील जीवन दीर्घकाल टिकण्यासाठी हे उदाहरण महत्वाचे आहे. हे जितके अधिक प्रमाणात अनुसरले जाईल तितक्या अधिक प्रमाणात पृथ्वीवरील जीवन टिकेल.
भारतीय इतिहासात सहजीवनाची जशी उदाहरणे दिसतात तसे संहाराचेही उदाहरण दिसते. महाभारत काळात पांडवांनी आपली नवी राजधानी इंद्रप्रस्थ वसवण्यासाठी खांडववनाचे त्यातील प्राण्यांसह दहन केले. त्यानंतर इंद्रप्रस्थ निर्माण झाले. माणसांची संख्या वाढत गेली आणि तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत गेली तसतशा सुखसोयी वाढत गेल्या पण त्याचबरोबर माणसाने जाणता किंवा अजाणता खांडववन दहनाचा किंवा नष्ट करण्याच उपक्रम चालवला आहे असे अतीव दुःखाने म्हणावे लागते. ह्या उपक्रमातून पृथ्वीवरच्या जीवनाच्या वाटचालीसमोर मोठे संकट उभे आहे. पृथ्वीवर जीवन किती काळ राहू शकेल हा गंभीर प्रश्न उभा आहे. याला निसर्गासोबत सहजीवन ह्याच एका तत्वाने उत्तर मिळू शकेल असे वाटते.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

सुंदर लेखन केले सर... मनुष्य जीव प्राणी आणि वनस्पती यांच्या भोवती फिरणारे आपले संस्कृतीचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.🙏
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Deleteसुंदर....
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteनिसर्ग, मानव आणि अन्य प्राण्यांच्या सहजीवन व मानवाने केलेली प्रगतीचे संकट , सहजीवनासाठी कसे उभे आहे हे या सुंदर लेखनातून दिसत आहे.... सर
ReplyDeleteसर धन्यवाद 🙏
Delete