खाद्यपदार्थांच्या काही आठवणी

       मध्यंतरी एक घरगुती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात पदार्थ कसे झाले आहेत हे आधी चाखून बघायचे होते. ते करत असताना एक माझा फोटो काढला गेला. तो बघताना मनात विचार आला की कोणकोणते पदार्थ पहिल्यांदा खाल्ल्याच्या आठवणी आहेत. तर वेगवेगळे पदार्थ आणि ते खाण्याचे प्रसंग आठवत गेले. त्यातील हे काही मोजके प्रसंग.


      ( छायाचित्रकार कु.शंतनू गाडे )

         मी त्यावेळी इयत्ता नववीमध्ये शिकत होतो. आमच्या साखरवाडीमधील शाखेची सहल पुण्यात काढली होती. त्या सहलीचे नियोजन त्यावेळचे फलटण तालुका प्रचारक श्री. मिलिंदराव फडके आणि साखरवाडीमधील संघाचे कार्यकर्ते श्री. संजयकाका वाळिंबे यांनी या सहलीचे नियोजन केले होते. वर्ष बहुतेक १९८७ असावे. पुण्यात लालमहाल, शनिवारवाडा, पर्वती, सिंहगड किल्ला अशा काही ठिकाणांना भेट दिल्याचे आठवते. याच पुण्याच्या सहलीत पहिल्यांदा पाणीपुरी हा प्रकार खाल्ल्याचे आठवते. तोपर्यंत साखरवाडीमध्ये कधी पाणीपुरी खाल्ल्याचे आठवत नाही. एका घासात मोठ्ठा आ करून ती एक पाणीपुरी खायची. पहिली खाऊन व्हायच्या आत पाणीपुरीवाल्याची पुढची पुरी तयार असायची. ही मोठीच कसरत तेव्हा वाटली होती. पण पाणीपुरी खाण्याचा हा पहिला प्रसंग लक्षात राहिला.

       १९८८ ते १९९० मध्ये मी पुण्यात स.प.महाविद्यालयात शिकलो. तेव्हा महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होतो. तिथे अनेक मित्र मिळाले. नंतर १९९० ते १९९४ मध्ये मी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकलो. स.प.महाविद्यालयाच्या वसतिगृहातील वेगवेगळे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी शिकण्यासाठी गेले. त्यातील एक संतोष देशपांडे. त्याचे वडील अंमळनेरला प्रताप महाविद्यालयात प्राध्यापक होते तर आई अंमळनेरलाच एका विद्यालयात शिक्षिका होत्या. साताऱ्यात शिकत असताना एका सुट्टीत बहुतेक १९९३ च्या डिसेंबरमध्ये मी अंमळनेरला संतोषकडे गेलो होतो. साधारण ६-७ दिवस तिथे राहिलो.  संतोषच्या आईंचे माहेर गुजरातमधील. त्यांनी तिथे असताना एकदा उंधियो हा गुजराती पदार्थ केला‌ होता. अतिशय चविष्ट असा तो झाला होता. उंधियो खाण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. पण तो पदार्थ मला फार आवडला आणि माझ्या आवडीच्या पदार्थांमध्ये त्याचा समावेश झाला.

    १९९९ ते २००१ या दोन वर्षांत मी संघाचा धुळे जिल्हा प्रचारक म्हणून काम केले. त्यावेळचे देवगिरी विभाग प्रचारक असणारे श्री. विजयराव पुराणिक हे आधी काही वर्षे धुळे जिल्हा प्रचारक होते. त्यांनी मला आधीच कल्पना देऊन ठेवली होती की धुळे जिल्ह्यात रात्री जेवायला तूरडाळ, तांदूळ यांची खिचडी असते. "वर्षातल्या ३६५ दिवसांपैकी ३६६ वेळा खिचडी खाण्याची तयारी ठेव ."असे त्यांचे गंमतीशीर वाक्य होते. कुणाकडेही जेवायला गेलात तरी रात्री हीच खिचडी हमखास असते. तशी खिचडी धुळ्यात मी पहिल्यांदा खाल्ली.

       संघ आणि अन्य संस्थांचे पूर्णवेळ काम करणाऱ्या नाशिक विभागातील कार्यकर्त्यांची निवासी बैठक २००० च्या दिवाळीत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे होते. एक केळी बागाईतदार कार्यकर्त्यांच्या शेतावर ही व्यवस्था केली होती. याच बैठकीत 'डाळ गंडोरी' ही भाजी मी पहिल्यांदा खाल्ली. वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ टाकून केलेली ही मिरच्यांची भाजी. खाण्यापूर्वी असं वाटलं की ही मिरच्यांची भाजी आपण कशी खाणार. पण या मिरच्या फार तिखट नव्हत्या. भाजीत घातलेल्या अन्य पदार्थांनी ही भाजी अतिशय चविष्ट झाली होती.

 प्रचारक कालावधी‌ पूर्ण करून गृहस्थी आयुष्याला सुरुवात करायची हे २००१ मध्ये ठरवले. धुळ्यातून निघायचे. आता जाण्यापूर्वी सर्व गावी जाऊन कार्यकर्त्यांना भेटायचे‌ असा प्रवास सुरू झाला. या प्रवासात मी दोंडाईचा या गावाजवळ असणाऱ्या मेथी या गावी गेलो. तिथे श्री. भीमसिंह गिरासे हे कार्यकर्ते होते. त्यांच्या घरी गेलो. बोलताना विषय निघाला की मी मांडे खाल्ले की नाही. तोपर्यंत मी मांडे खाल्ले नव्हते. धुळे जिल्ह्यातील मांडे म्हणजे  मातीच्या भांड्यावर भाजली जाणारी मोठी पुरणाची पोळी. त्याबद्दल मी ऐकले होते. पण ती तोपर्यंत खाल्ली मात्र नव्हती. भीमसिंहजी म्हणाले, "मग आज तो बेत करू." त्यांनी लगेच घरात सांगितले आणि घरच्या मंडळींनी सुग्रास असे मांडे करून खायला घातले. मांडे खाण्याचा योग तेव्हा आला.

       असे खाण्याचे प्रसंग आठवले की वाटते 'खाण्यासाठी जन्म आपुला'! तसेच घरोघरच्या माता, भगिनी असे सुग्रास पदार्थ करून खायला घालतात तेव्हा आपसूकच उद्गार येतात 'अन्नदाता सुखी भव'!


सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. वर्णिलेले सर्व पदार्थ आपण खावेच असे आता वाटू लागलं आहे. मस्त आठवणी

    ReplyDelete
  2. खूप छान लेख. जुन्या आठवणी जाग्या झाल्या!

    ReplyDelete
    Replies
    1. माझीही हीच भावना आहे. धन्यवाद मित्रा

      Delete
  3. मांडे माझा आवडता गोड पदार्थ आणि त्याच्याबरोबरच्या गोड आठवणी... सुंदर लेखन केले सर🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची