पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत घेण्याचा अनुभव

        "तुम्ही नेहमी मुलाखती घेता का?" ५/१०/२५ यादिवशी एका व्यक्तीने मला विचारले. निमित्त होते जनजाती कल्याण आश्रम पुणे महानगर यांच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेचे. २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री चैत्रामजी पवार यांच्या हस्ते स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये नुकतेच झाले. यावेळी त्यांची मुलाखत मी घेतली.मी घेतलेली ही तिसरी मुलाखत. ही मुलाखत संपल्यानंतर श्रोत्यांपैकी एका व्यक्तीने मला हा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा मला आनंद झाला. साधारणपणे भाषणे करणाऱ्या माणसाला मुलाखत घ्यायला सांगितले म्हणजे मुलाखत घेणारा जास्त बोलेल अशी शक्यता असते. परंतु कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते श्री. विनायक खाडे यांनी आग्रहपूर्वक हे काम मला सांगितले. कार्यक्रमानंतर बऱ्याच जणांनी मुलाखत घेण्याची पद्धत आवडल्याचे आवर्जून सांगितले. त्यावरून मी श्री खाडे यांना अडचणीत आणले नाही असे म्हणता येईल.


      या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वैयक्तिक संस्मरणीय योग आला. सन १९८८ ते १९९० अशी दोन वर्षे मी इयत्ता अकरावी बारावीचे शिक्षण स.प. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहून घेतले. ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले त्या महाविद्यालयाच्या सभागृहात सत्कार होण्याचा आनंददायक योग या निमित्ताने आला.

   


      बारीपाडा हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील डोंगरावर वसलेले एक छोटेसे गाव. या गावातील श्री चैत्राम पवार यांनी एमकॉम पर्यंत शिक्षण घेतले. शिकत असताना ते वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या डॉ. आनंद फाटक यांच्याशी संपर्कात आले. एमडी असलेले डॉक्टर फाटक सेवेचे व्रत घेऊन बारीपाडा याच्या जवळ असणाऱ्या वार्सा या गावात सेवाभावी वैद्यकीय केंद्र चालवीत होते. डॉक्टर फाटक यांची निरलस वृत्ती , सेवाभाव , ध्येयनिष्ठा यांसारख्या गुणांचा परिचय चैत्राम भाऊ यांना झाला आणि हळूहळू त्यांना आपल्या कार्याची दिशा स्पष्ट होत गेली. सैन्यदल आणि बँक या दोन ठिकाणांहून आलेल्या नोकऱ्यांचे प्रस्ताव त्यांनी नाकारले आणि गावात राहून काम करायचे ठरवले. वृक्ष संवर्धन या कामापासून सुरुवात झाली. मग क्रमाक्रमाने बचत गट , जलसंधारण शेती सुधारणा, उद्योजकता विकास , नवनवीन उपक्रम यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या. चैत्राम भाऊ यांचे शांत ,सुस्वाभावी, निगर्वी, व्यक्तिमत्व सर्वांना आपलेसे करणारे आहे. त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील त्यांना साथ आहे. सरकारी योजनांच्या मागे न लागता गावकऱ्यांच्या एकजुटीच्या आधारावर त्यांनी आखलेल्या योजना यशस्वी केल्या. या कार्याची दखल जिल्हा पातळीपासून ते थेट अंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत घेतली गेली आहे. आपल्या अनुभवाचे संचित केवळ गावापुरते मर्यादित न ठेवता चैत्राम भाऊ यांनी त्याचा विस्तार आजूबाजूची ४४ गावे आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या योजनेतून सात राज्यांत केला आहे. यासाठी ते महिन्यातील सुमारे २५ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करीत असतात. २६ जानेवारी २०२५ ला त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

   चैत्रामभाऊ यांचे कार्य प्रेरणादायक तर आहेच. पण मुलाखती दरम्यान त्यांनी दिलेली प्रांजळ उत्तरे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची आणि विचारांची खोली दाखवून गेली. मी ठरवून चालून आलेली नोकरी नाकारत गावात राहून काम करण्याचे ठरवले. विकास नेमका किती करायचा आणि कुठे थांबायचे हे कळले पाहिजे. पुरस्कार मला नाही तर माझे गाव बारीपाड्याला मिळाला आहे. ज्या वनवासी कल्याण आश्रमामुळे मला पुरस्कार मिळाला त्या कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते पुरस्कार प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिले पाहिजेत असा विचार मी केला आणि त्याप्रमाणे योजना केली. जंगलातील वाढवलेल्या झाडांची किंमत लक्षात घेण्याबरोबर त्यातून होणारे पर्यावरणाचे लाभ देखील मोजले पाहिजेत. माझ्या मोबाईल मध्ये ८००० पेक्षा जास्त जणांचे क्रमांक आहेत हीच माझी श्रीमंती आहे. आम्ही स्वतः कधी स्वतःसाठी कपडे घेतलेला नाही परंतु लोकांनी आम्हाला काही कमी पडू दिले नाही. यासारखी अनेक वाक्ये त्यांनी सहजगत्या सांगितली.

     


    पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक श्री प्रल्हाद राठी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते भगवद्गीता ही अनेक क्षेत्रात मार्गदर्शक आहे. कल्याण आश्रमाचे काम निष्काम असल्यामुळे ते वेगाने यशस्वी होते. अशा प्रकारचे मनोगत यांनी व्यक्त केले. कल्याण आश्रम पुणे महानगर समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश धोका यांचे अमृत महोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.


कल्याण आश्रम पुणे महानगरातील कार्यकर्त्यांचे परिश्रम नियोजन देखील उत्तम होते. नाशिक जिल्ह्यातील गुही येथे जनजाती समाजाच्या मुला मुलींसाठी सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून वस्तीगृहे गेल्या पाच-सहा वर्षांत बांधण्यात आली आगामी वर्षभरामध्ये सुमारे १५ कोटी खर्चून शाळा बांधण्याचा उपक्रमासाठी आवाहन करण्यात आले अवघे पाऊणशे वयमान असणारे कल्याण आश्रम महानगर समितीचे अध्यक्ष श्री प्रकाशजी धोका यांच्या मार्गदर्शनाखाली हे आव्हान देखील पूर्ण होईल असा सर्वांना विश्वास आहे.


 ही संध्याकाळ माझ्यासाठी संस्मरणीय झाली.


सुधीर गाडे पुणे


( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची