मन झाले नितळ

               ( काल्पनिक कथा )

       ( मन झाले मोकळे या कथेचा पुढचा भाग. आधीची कथा कॉमेंटमधील दुव्यावर )

        उद्यानातून परतल्यावर राजे विक्रमगुप्त निश्चयपूर्वक कामाला लागले. आपल्याकडे दिवस अतिशय थोडे राहिले आहेत याची त्यांना जाणीव झाली होती. म्हणून कोणत्या क्रमाने गोष्टी करायच्या याचा विचार त्यांनी उद्यानात असतानाच करून ठेवला होता. परंतु या सर्व गोष्टी करत असताना अतिशय काळजीपूर्वक त्या कराव्या लागणार होत्या कारण त्यांच्या बोलण्यातून अथवा कृतीतून येणाऱ्या प्रसंगाची कोणालाही कल्पना येऊ द्यायची नव्हती. 


        ( छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने )

     उद्यानातून परतलेले राजे विक्रमगुप्त जवळपास आधीसारखेच वागत आहेत हे राणी शीलवती यांच्या लक्षात आले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. गेले आठवडाभर त्यांच्याही जीवात जीव नव्हता. राजेसाहेबांच्या अस्वस्थतेमुळे त्यादेखील बेचैन झाल्या होत्या. मनात नाही नाही त्या शंका उपस्थित झाल्या होत्या. सगळ्यात मोठे दुःख राजेसाहेब काहीच सांगत नव्हते याचे होते. परंतु आता त्यांना हायसे वाटले. असेच एक दोन दिवस गेले. राजे विक्रमगुप्त यांनी राणीसाहेबांकडे सहज बोलता बोलता राज्यकारभाराची चर्चा सुरू केली. आपल्या दरबारातील सर्व मंडळी कशी आहेत, त्यांच्याबद्दल राणीसाहेबांचे मत काय आहे ही सगळी माहिती विक्रमगुप्त यांनी बोलता बोलता काढून घेतली. बोलण्याच्या ओघात राजेसाहेब म्हणाले, " राणीसाहेब या सगळ्या राज्याचा कारभार चालवायचा तर विश्वासू माणसं हवीत." " होय तर. हे काय विचारणं झालं?" शीलवती म्हणाल्या. त्या तशाच पुढे म्हणाल्या, "माणसे विश्वासू तर हवीच पण आपल्या मर्जी अथवा नामर्जीची पर्वा न करता परखडपणे योग्य सल्ला देणारी हवीत. अगदी गुणवर्मांसारखी!"  गुणवर्मा यांचं नाव राणीसाहेबांनी घेतलं आणि एकदम त्या गप्प झाल्या. संवाद अचानक खुंटल्यासारखा झाला होता.

           संवाद थांबण्याचं होण्याचं कारणही तसंच होतं. गुणवर्मा हे राजे विक्रमगुप्त यांच्या दरबारातील एक महत्त्वाचे मंत्री होते. राजेसाहेब आणि प्रजा यांच्या कल्याणाची त्यांना सदैव चिंता असे.  यासाठी अनेक वेळा त्यांनी विक्रमगुप्त यांच्याशी तळमळीने चर्चा केली होती. परंतु सहा महिन्यांपूर्वी विक्रमगुप्त आणि गुणवर्मा यांच्यातील चर्चा वादळी ठरली होती. त्याचं कारणही तसंच होतं. राजे विक्रमगुप्त यांना आपल्या निवासासाठी अजून एक राजवाडा बांधण्याची इच्छा झाली होती. परंतु गेले दोन तीन वर्षे झालेल्या दुष्काळामुळे राज्यभांडारात पुरेसे धन जमा झाले नव्हते. यावर्षीचा पाऊसकाळ गेल्या वर्षांच्या तुलनेत चांगला झाला होता. त्यामुळे राजवाड्यासाठी आवश्यक धन याच वर्षी जमा व्हावे या उद्देशाने विक्रमगुप्त यांनी प्रजेवरील कर चौपट करण्याचे ठरवले होते. महाराजांचा हा प्रस्ताव जेव्हा मंत्रिमंडळासमोर आला त्यावेळी महाराजांचा कल लक्षात घेऊन बहुतेक सर्वांनी राजांच्या निर्णयाचे समर्थन केले होते. परंतु एकट्या गुणवर्मांनी अचानक एवढी वाढ करणे योग्य नाही अशी भूमिका घेतली होती. अन्य मंत्री जेवढ्या आग्रहाने करवाढीच्या प्रस्तावाचे समर्थन करीत होते तेवढ्याच निग्रहाने गुणवर्मा हा प्रस्ताव कसा अन्यायकारक , नव्हे नव्हे जुलमी आहे असे सांगत होते. गुणवर्मांच्या जुलमी या शब्दामुळे राजांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी गुणवर्मा यांना ताबडतोब जायला सांगितले. त्यांना आपल्या राज्यातूनदेखील हाकलून दिले. ही सर्व घटना एकदमच विक्रमगुप्त आणि शीलवती यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि संवाद खुंटला. 

      " तुम्ही म्हणताय ते खरं आहे राणीसाहेब. गुणवर्मांसारखे लोक हे परखड बोलत असते असतील तरी ते हिताचे असते. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे. तुमचे म्हणणे लक्षात घेऊन मी गुणवर्मा यांचा शोध करायला माणसे पाठवतो आणि त्यांना बोलावून घेतो. " हा संवाद तिथेच संपला.

       विक्रमगुप्त यांनी लगेच आपल्या मंत्र्यांना बोलावून गुणवर्मा यांचा शोध तातडीने घ्यायला सांगितला आणि त्यांना शोधून सन्मानाने घेऊन येण्याची आज्ञा केली. सर्व मंडळी कामाला लागली.

      राजेसाहेब आता विचार करीत होते की राज्य स्थिर असण्यासाठी प्रजा समाधानी असणे आवश्यक आहे. प्रजेचे समाधान कशात आहे तर अन्न वस्त्र निवारा या त्यांच्या गरजा सहजपणे भागल्या पाहिजेत. दुष्काळाची ओढवलेली परिस्थिती लक्षात घेता सगळीकडे नियोजनपूर्वक तलावांचे काम सुरू केले पाहिजे. याचा तपशीलवार विचार करून त्यांनी याबाबतची कार्यवाही सुरु केली. दररोज याचा आढावा ते घेत असत. प्रगती समजावून घेत असत. हे करत असताना युवराज शौर्यगुप्त यांना सदैव ते आपल्यासोबत ठेवत. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा त्यांच्यासोबत करत. आपल्या अनुभवांतून आलेले शहाणपण ते युवराजांकडे विचारपूर्वक सोपवत होते. तलावांची योजना पूर्ण झालेली बघण्यासाठी आपण असणार नाही याची मधूनमधून त्यांना खंत वाटत असे. पण आपले काम प्रजेला दीर्घकाळ उपयोगी पडणारे आहे. त्यातूनच आपली स्मृती राहणार आहे यावर ते समाधान मानत होते.

      उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी राजे विक्रमगुप्त आपली योजना कुठपर्यंत आली याची माहिती घेत. त्याचबरोबर त्यांना उत्सुकता लागली होती ती गुणवर्मा यांच्या शोधाची. जवळपास तीन आठवडे गेल्यानंतर अखेर गुणवर्मांचा शोध लागला आणि त्यांना सन्मानाने घेऊन राजांची माणसं परत आली. 

   गुणवर्मांनी विक्रमगुप्त यांना नम्रपणाने अभिवादन केले. विक्रमगुप्त यांनी आपल्या आधीच्या वागण्याबद्दल क्षमायाचना केली. गुणवर्मा म्हणाले, " राजेसाहेब आपल्या क्षमा याचनेची आवश्यकता नाही. परंतु रजेचे मन राखूनच आपल्याला कारभार सुखाने करता येईल हे आपण सदैव ध्यानात घ्यावे." राजेसाहेबांनी देखील गुणवर्मा यांचे म्हणणे मान्य केले. राज्यातून घालवून दिल्यानंतर गुणवर्मा कुठे होते, त्यांनी काय केले याची माहिती विक्रमगुप्त यांनी घेतली. गुणवर्मांनीदेखील सगळी माहिती सांगितली. राजेसाहेबांनी त्यांना विनंती केली की , "तुम्ही उदार अंतःकरणाने झालेली गोष्ट विसरून राज्याच्या कारभारात योग्य तो सल्ला देण्याचे काम तसेच पुढे सुरू ठेवावे." गुणवर्मा यांनी ही विनंती मान्य केली. त्या दिवसापासून प्रजेच्या कल्याणाच्या योजना योजनांची चर्चा होत असताना गुणवर्मादेखील त्यात सहभागी होऊ लागले आणि त्यांच्या कल्पना मोकळेपणाने मांडू लागले. बघता बघता प्रजेच्या कल्याणाच्या वेगवेगळ्या योजना आकार घेऊ लागल्या. क्रमाक्रमाने त्या पुढे जाऊ लागल्या. 

       मावळणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपले जगातील किती दिवस राहिले याचा हिशोब विक्रमगुप्त करीत होते. परंतु क्षत्रियाने जसे रणांगणावरील मरण धैर्यपूर्वक स्वीकारले पाहिजे तसेच या मरणाला सामोरे जाण्याचा त्यांनी निश्चय केला होता. हा निश्चय ठेवून ते सर्व कारभार चालवत होते.

       अखेर धीरानंद यांनी सांगितलेला दिवस उजाडला. राजेसाहेब शांतचित्ताने आपले सर्व व्यवहार पार पाडत होते. कोणत्या क्षणी जगाचा निरोप घ्यावा लागेल हे माहीत नसल्यामुळे त्यांनी राणी शीलवती, युवराज शौर्यगुप्त, मंत्री गुणवर्मा यांच्या सहवासात आपला दिवस घालवण्याची योजना केली होती. दिवस मावळला. आता अखेरची वेळ ही रात्री असेल अशा विचाराने राजेसाहेब शयनकक्षात गेले. झोप येण्याचा प्रश्न नव्हता. पूर्ण रात्र सरली परंतु राजेसाहेब ठणठणीत होते. पहाट झाली आणि विचार करता करता राजेसाहेबांना अचानक काहीतरी लक्षात आले. त्यांनी टाळी वाजवून सेवकाला बोलावले.‌ धीरानंद यांच्या आश्रमात जाण्याची सिद्धता करण्यास सांगितले.

     सर्व सिद्धता झाली. विक्रमगुप्त, शीलवती, शौर्यगुप्त, गुणवर्मा या सर्व मंडळींसह लवाजमा धीरानंद यांच्या आश्रमात पोचला. राजेसाहेबांनी निघताना बरोबर फळे, फुले यांचा उपहार सोबत घेतला होता. तो त्यांनी धीरानंद यांना आदरपूर्वक अर्पण केला आणि नम्रपणाने त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले. विक्रमगुप्त म्हणाले , " स्वामीजी आपल्या भेटीनंतर दोन महिने आणि सात दिवस पूर्ण झाले. आपल्या बोलण्याचे सदैव स्मरण माझ्या मनात होते. त्यामुळे मी सर्व गोष्टी अतिशय विचारपूर्वक केल्या. माझ्याकडून गुणवर्मा यांच्यावर जो अन्याय झाला तो मी दूर केला. प्रजेच्या सुखासाठी योजनांची आखणी केली. आता मी अटळ सत्याला सामोरा जाण्यासाठी सिद्ध आहे. माझ्या मनावर आता कशाचेही ओझे नाही."

      धीरानंद स्मितपूर्वक विक्रमगुप्त यांचे बोलणे ऐकत होते ते म्हणाले, " हे राजा असत्य कथन करणे हे पाप आहे. तसेच माहिती असून देखील एखाद्याचा मृत्युसमय सांगणे शास्त्रानुसार अनुचित आहे. या दोनही गोष्टी मी केल्या. परंतु गुणवर्मासारख्या निष्ठावान व्यक्तीवर होणारा अन्याय दूर होणे हे तितकेच किंबहुना त्यापेक्षाही महत्त्वाचे होते. तसेच राजा म्हणून प्रजेचे हित हेच तुझे कर्तव्य आहे याची जाणीव तुझ्या मनात सदैव जागी राहणे सगळ्यात आवश्यक होते. यासाठी मी तुला असत्य सांगितले. त्याचा दोष माझ्या माथी आहे. परंतु त्याची मला तमा नाही. ज्या कर्तव्यकठोर बुद्धिने तू गेले दोन महिने आचरण केले तसेच आचरण आजीवन कर हीच माझी तुला आज्ञा आहे. या नितळ मनाने तू राज्यकारभार करत राहशील तर तुझी स्मृती चिरंतन राहील."

      धीरानंद यांच्या बोलण्याने सर्वांना झाल्या घटनांचा उलगडा झाला. धक्का, आश्चर्य, दुःख, आनंद अशा भावनांचा कल्लोळ सर्वांच्या मनात उत्पन्न झाला. सर्वांनी नम्रतापूर्वक धीरानंद यांना प्रणिपात केला. सर्वजण पुन्हा राजधानीच्या दिशेने मार्गस्थ झाले. 

सुधीर गाडे, पुणे 

( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. https://sangatosudhir.blogspot.com/2025/10/blog-post_28.html

    ReplyDelete
  2. कथेस अगदी समर्पक शीर्षक आहे मन झाले निथळ... सुंदर कथा🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची