महायोगी श्री अरविंद

         महान विभूती स्वतःच्या जीवनाला स्वकर्तृत्वाने आकार देऊन जगात भर घालतात की त्यांचे जीवन हे एका व्यापक योजनेचा निश्चित भाग असतो हा एक प्रश्न आहे. महायोगी श्री अरविंद यांच्या जीवनचरित्रावरून गोष्टी योजल्याप्रमाणे घडतात असे म्हणावे लागते. त्यांच्या जीवनातील २४ नोव्हेंबर १९२६ या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच दिवशी परमेश्वर संदेशाचे दिव्य अवतरण झाले अशी श्रद्धा आहे. हा दिवस 'सिद्धी दिन' म्हणून अरविंद आश्रमाच्या वतीने साजरा केला जातो.

                  ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )

     १५ ऑगस्ट १८७२ ते ५ डिसेंबर १९५० असे ७८ वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले श्री अरविंद यांचे जीवन म्हणजे विधात्याच्या योजनेनुसार वळत गेलेला पुण्यप्रद जीवनप्रवाह आहे. त्यांचे वडील डॉ. कृष्णधन घोष यांनी जाणीवपूर्वक अरविंद आणि त्यांच्या भावडांना भारतीय सनातन धर्म, संस्कृती, विचार यांच्याशी कोणताही संपर्क येऊ नये म्हणून इंग्लंडमध्ये रेव्हरंड यांच्या घरी ठेवले तरीही अरविंद अंत:करणात देशभक्ती उफाळून आली कारण 'झरा मूळचाची खरा'. तीव्र बुद्धिमत्ता आणि बहुभाषाकोविद असलेले अरविंद वडिलांच्या इच्छेनुसार आयसीएस या तत्कालीन प्रशासकीय परीक्षेला बसले पण ती उत्तीर्ण होऊन अन्यायी इंग्रजांची चाकरी करावी लागू नये म्हणून या परीक्षेतील एका चाचणीला ठरवून अनुपस्थित राहिले. आयसीएस झाले नाहीत.
          गुणग्राहक असलेले जागरूक संस्थानिक महाराज सयाजीराव गायकवाड यांनी श्री अरविंद यांच्या क्षमता जाणून त्यांना आपल्या सेवेत दाखल करून घेतले. श्री अरविंददेखील या देशाभिमानी, सुधारक, कर्त्या राजाच्या सेवेत दाखल झाले. बडोदा नगरीतील जवळपास १२ वर्षांचा जीवनकाळ प्रशासन, अध्यापन अशा गोष्टींमध्ये व्यतीत झाला. याचदरम्यान राष्ट्रीय चळवळीत ते सहभागी झाले. आपले लेखन,वाणी यांनी मवाळपंथी कॉंग्रेसी मंडळींना खडसावले. लोकमान्य टिळकांसारख्या समविचारी राष्ट्रीय वृत्तीच्या नेत्याशी जवळीक झाली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कोणताही मार्ग वर्ज्य नाही हे लक्षात घेऊन बंगालमधील देशभक्तांच्या लष्करी प्रशिक्षणाची व्यवस्था केली. बडोदा येथील वास्तव्यात शेवटच्या टप्प्यात त्यांना विष्णू भास्कर लेले यांच्याकडून योगसाधनेचे धडे मिळाले. आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात भारतमाता ही साक्षात जगत्जननीचे साकार रूप आहे ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
     बडोद्यामधील जीवनक्रम सुरळीत चालला आहे असे वाटत असतानाच बंगालच्या फाळणीचा प्रसंग १९०५ मध्ये ओढवला आणि कार्यक्षेत्र झाले बंगाल. कोलकाता येथे नॅशनल कॉलेजमध्ये अध्यापन करू लागले. सोबतच युगांतर, वंदे मातरम् अशा नियतकालिकांमधून जनजागृती सुरू केली. क्रांतिकारकांशीही जवळचा संबंध होता. यातूनच कारावास घडला. कारावासापूर्वी श्री अरविंद यांना लेले यांनी सर्व चळवळी सोडून एकांतात योगसाधना करावी हे सुचवले होते. पण तसे श्री अरविंद यांनी केले नाही. कारावासात सुरुवातीला एकांतवास ठेवले गेले. तेव्हा ईश्वरी आज्ञा झाली. अद्वैताचा साक्षात्कारही घडला. आपल्या सहभागाशिवायदेखील स्वातंत्र्य चळवळ पुढे जाणार आहे आणि भारत यथावकाश स्वतंत्र होणार आहे याची जाणीव झाली.

       कारावासातून देशबंधू चित्तरंजन दास यांच्या आणि इतर अनेक जणांच्या प्रयत्नातून निर्दोष मुक्तता झाली. पण आपण बोलू लागलो‌ की 'बोलविता धनी वेगळाचि' याचा अनुभव येऊ लागला.‌ आता सनातन हिंदू धर्म, तत्वज्ञान, विचार यांचा प्रसार वेगवेगळ्या नियतकालिकांमधून सुरू केला. पण इंग्रजांनी पुन्हा एकदा अडकवण्याचा डाव रचला आहे हे समजले. ईश्वरी आज्ञेनुसार कोलकाता सोडून प्रथम चंद्रनगर आणि नंतर पॉंडिचेरी या फ्रेंच वसाहतीत स्थलांतर केले.
           पॉंडिचेरी येथे सुरू झाली एकांतवासातील योगसाधना. यथावकाश श्री माताजी ( पूर्वाश्रमीच्या मीरा रिचर्ड या फ्रेंच विभूती ) या त्यांच्या सहाय्याला आल्या. श्री अरविंद आश्रमाचे कार्य आकाराला आले. भारताच्या प्राचीन तत्वज्ञानाची नव्याने मांडणी केली. भारत आता उभा राहिल तो जगाला मार्गदर्शन करण्यासाठी याचे भाकीत श्री अरविंद यांनी केले आहे. आपले तत्त्वज्ञान 'दिव्य जीवन' यासारखे विविध ग्रंथ‌ , सावित्री हे महाकाव्य यातून श्री अरविंद यांनी परिभाषित केले आहे.

         श्री अरविंद यांच्या जीवनातील हे परिवर्तन एका ईश्वरी निश्चित योजनेचा भाग आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.‌ १९०९ पर्यंत इंग्रजी सत्तेचे कठोर टीकाकार असलेल्या श्री अरविंदांनी दुसऱ्या महायुद्धात 'नाझीवादाचा पराभव व्हायलाच हवा' यासाठी इंग्रजांना पाठिंबा दर्शविला. एवढेच नव्हे तर श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी आपल्या योगशक्तीचा उपयोग इंग्लंड आणि मित्र राष्ट्रे यशस्वी व्हावीत यासाठी केला. १९४२ ची क्रिप्स योजना स्वीकारावी यासाठी महात्मा गांधी आणि अन्य कॉंग्रेस नेत्यांशी संपर्क साधला.‌ पण ती योजना स्वीकारली गेली नाही. या दोनही गोष्टीत योगी अरविंद यांच्या भूमिकांमध्ये परिवर्तन झालेले दिसते. राष्ट्रभक्त अरविंद जागतिक नेतृत्वाच्या पातळीवर पोचलेले दिसतात.

श्री अरविंद यांचे जीवन ,‌कार्य, विचार भारतालाच नव्हे तर जगाला मार्गदर्शन करणारे आहेत. त्यांना विनम्र अभिवादन!

सुधीर गाडे पुणे

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )

Comments

  1. वाह.....योगी अरविंदांबद्दल बऱ्याच गोष्टी कळल्या.... त्यांचं अध्यात्मिक जीवन आणि पाँडिचेरी येथील आश्रमाबाबत थोडी फार माहिती होती. आज बऱ्याच गोष्टी कळल्या.
    धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची