गुलामगिरीच्या खुणा
आपल्या प्राचीन भारतदेशावर सुमारे हजार वर्षे परकीय आक्रमणे झाली. संपत्ती सत्ता यांच्या अभिलाषेतून झालेल्या या आक्रमणांनी धर्मप्रसार देखील घडवला हा इतिहास आहे. आक्रमकांच्या या मालिकेत इंग्रजांच्या आक्रमणाचे वैशिष्ट्य असे की त्यांनी पद्धतशीरपणे भारतीयांच्या मनात हीनपणाची भावना निर्माण केली. आपल्या धूर्त योजनाबद्ध प्रयत्नांतून त्यांनी भारतीय विचार ग्रंथ तत्वज्ञान यांची मोडतोड केली. भारतात सर्वच कसे चुकीचे होते असा भाव शिक्षणातून लोकांच्या मनात झिरपवला. ह्यातून गुलामगिरीची भावना निर्माण झाली. दुर्दैवाने ही भावना अनेक भारतीय यांच्या मनात खोलवर रुजली होती. १९४७ मध्ये खंडित भारत स्वतंत्र झाला. परंतु अजूनदेखील या गुलामगिरीच्या काही खुणा दिसून येतात.
( क्रांतिसिंह नाना पाटील यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
( मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार )
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे. १९९० १९९१मध्ये सातारा जिल्ह्यात फलटण येथे प्रांत अधिकारी म्हणून ते काम करीत होते. त्यावेळी दर सोमवारी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना एक अहवाल पाठवावा लागत असे. त्यामध्ये एवढेच लिहिले असे की, 'या आठवड्यात कधीही हालचाल नाही'. धर्माधिकारी यांनी हा कशाबाबतचा अहवाल आहे याची माहिती घेतली. त्यावेळी लक्षात आले की १९४२ च्या चलेजाव आंदोलनात क्रांतीसिंह नाना पाटील आणि त्यांचे सहकारी ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भूभागात त्यांची आंदोलने करीत. यांच्या चळवळीतून उभे राहिलेले प्रतिसरकार इतिहासात प्रसिद्ध आहे. यालाच बोलीभाषेत पत्रीसरकार असेदेखील म्हले गेले . ही क्रांतिकारक मंडळी इंग्रजांच्या पोलिसांपासून वाचण्यासाठी फलटण संस्थानात आश्रय घेत. फलटण येथे मध्ययुगीन काळापासून शेकडो वर्षे नाईक निंबाळकर घराण्याचे राज्य होते. त्याचेच फलटण संस्थान झाले. फलटण संस्थानाचे त्यावेळचे राजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रांतिकारक मंडळींना सहानुभूती दाखवतात, मदत करतात असा ब्रिटिशांना संशय होता. त्यामुळे मालोजीराजे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून ते कोणा क्रांतिकारकांना भेटतात का याची माहिती घेऊन ती सोमवारी कळवायची अशी आज्ञा त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्याने फलटणच्या महसूल अधिकाऱ्याला दिलेली होती. ह्या आज्ञेचे पालन स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके चालत आले होते. ही प्रशासकीय अनास्था आहे असेदेखील म्हणता येईल. पण ही इंग्रजांच्या आज्ञेची अंमलबजावणीदेखील होती. अनेक बुद्धिमान अधिकाऱ्यांना स्वातंत्र्यानंतरही त्यात बदल करण्याचे सुचले नाही. धर्माधिकारी यांच्या प्रयत्नामुळे नंतर काही काळाने ही पद्धत बंद झाली असे त्यांनी सांगितले.
भारताचे माजी सरन्यायाधीश मा. धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या मुलाखतीत एक अनुभव सांगितला आहे . न्यायाधीश म्हणून नव्याने नियुक्ती झाल्यानंतर ते निजामाबाद या ठिकाणी आपल्या दौऱ्यामध्ये गेले असताना तेथे जेवायची वेळ झाली. तिथे स्थानिक न्यायालयातील न्यायाधीश हे जेवायला वाढण्याचे काम करीत होते. इंग्रजांच्या काळापासून ही पद्धत चालत आल्याचे त्यांना सांगितले गेले. चंद्रचूड यांनी ठामपणे असे करू देण्यास नकार दिला. १९४७ मध्येच ब्रिटिश राजवट संपल्यानंतरदेखील यात खंड पडला नव्हता ही गोष्ट लक्षात घेण्यासाठी घेण्यासारखी आहे.
२०१४ मध्ये भारतामध्ये सत्तांतर झाले. त्याचा अन्वयार्थ अनेक लोक आपापल्या परीने लावत असतात. त्यातून काय घडले यावर विचार करत असतात. प्रसिद्ध पत्रकार संपादक श्री संजय बारू यांनी याबाबत एक पुस्तक लिहिले आहे. बारू यांनी मा. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काही काळ त्यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम केले. श्री. मनमोहनसिंग यांची अनेक भाषणे त्यांनी लिहून दिली होती. बारू यांनी सत्तांतराबाबतच्या आपल्या पुस्तकात सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या लोकांच्या, अधिकाऱ्यांच्या वर्तुळात काय बदल घडला याबाबत असे लिहिले की, ' भारतीय भाषांमधून ( व्हर्नाक्युलर लॅंग्वेजेस्) विचार करणारी ही मंडळी आहेत. इंग्रजी पद्धतीचे खाण्याचे रिवाज त्यांना माहिती नसतात. त्याबद्दल त्यांना अजिबात फिकीर वाटत नाही.' संजय बारू यांच्या या पुस्तकाबाबत मुलाखतकार श्री.करण थापर यांनी त्यांना याविषयी बोलते केले होते. हा बदल सांगत असताना अगदी दुःखी मनाने सांगितले गेल्याचे मला जाणवले. जणू काही भारतीय भाषांमध्ये विचार करणे, इंग्रजांच्या जेवणाच्या चालीरीती न पाळणे हा भयंकर गुन्हा असल्यासारखे बारू सांगत होते. यातून दास्यत्वाची भावना समाजातील काही घटकांमध्ये अजून देखील कशी रुजली आहे हे लक्षात येते.
राज्य यंत्रणा, न्यायपालिका, पत्रकार वर्ग या विविध क्षेत्रातून सांगितले गेलेले हे अनुभव प्रातिनिधिक आहेत. अशा प्रकारचे अनुभव अन्य अनेक ठिकाणीदेखील येतात. ते अनुभव याच प्रकारच्या निरीक्षणाला दुजोरा देतात ही अतिशय दुःखाची, दुर्दैवाची आणि संतापाची देखील बाब आहे.
भारताला स्वसामर्थ्याचे प्रकटीकरण करून जगाला दिशा दाखवायची असेल तर अशा प्रकारच्या गुलामगिरीच्या भावनेतून बाहेर पडावेच लागेल. भारतीय मूल्ये, विचार, तत्त्वज्ञान या आधारावरती जीवनाच्या सर्व क्षेत्रात उभारणी करावी लागेल. तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने स्व-तंत्र होईल.
सुधीर गाडे पुणे
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. )


Comments
Post a Comment