साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग ४ )
ल.क.देशपांडे सर
लक सर( त्यांचं त्यावेळचं संबोधन) लक्षात आहेत ते त्यांच्या भारदस्त आवाजामुळे. ते आम्हाला दहावीला मराठी शिकवायला होते.त्या पुस्तकात रवींद्र पिंगे यांचा धडा होता.तो शिकवताना 'निवळशंख शांतता' हा शब्दप्रयोग शिकवल्याचं चांगलं आठवतं. हाच धडा शिकवताना सर म्हणाले, " परवा मी कोकणात गेलो होतो.तशी झाली त्याला १३ वर्षं." यावरून परवा म्हणजे किती काळ याची एक मर्यादा शिकायला मिळाली. याच वर्षी शंकर पाटील यांचा एक धडा होता.त्यात ' हल्लक' असा शब्द होता.त्याचा अर्थ समजावून सांगताना सरांनी त्यांच्यावेळी मॅट्रिकचा कारकुनाला परीक्षा क्रमांक सांगून त्याच्याकडून निकाल समजेपर्यंत होणाऱ्या भावनेचे वर्णन करून संगीतल्याचं आठवतं.
दहावीत असताना शाळेतीलच एका वक्तृत्व स्पर्धेनंतर बोलताना सरांना काहीही न विचारता जमेल तशी तयारी करून आम्ही सगळ्यांनी भाग घेतला याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुलांच्या पालकसभेसाठी वेळ न काढणाऱ्या आईबापांना उद्देशून " हाती नाही बळ दारी नाही आड त्याने फुलझाड लावू नये" अशा ओळी संगीतल्याचेदेखील मनावर कोरलं गेले आहे.
सरांचं २५/४/२००७ ला निधन झालं.सरांचे आदरपूर्वक स्मरण..!
फोटो नवनीत देशपांडे यांच्याकडून
Comments
Post a Comment