अधिक महिन्याचा सामाजिक आशय

 काल अधिक महिन्याच्या खगोलशास्त्रीय बाबीवर लिहिले. आज आता त्याचे अजून काही पैलू. 

आपला देश प्राचीन काळापासून अध्यात्मप्रवण देश आहे. आध्यात्मिकता हीच या देशाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी सर्व गोष्टी आध्यात्मिकतेशी जोडलेल्या बघायला मिळतात. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक मासात अधिक व्रतवैकल्ये करावी, नेम पाळावे अशी परंपरा आपल्या पूर्वजांनी घालून दिली. त्यामुळे अनेक जण या महिन्यात अनेक नेम पाळून व्रत-वैकल्ये उपासना करताना दिसतात. या सगळ्याचा उपयोग आध्यात्मिक उन्नतीसाठी व्हावा ही मूळची कल्पना. 

परंतु काळाच्या ओघात या व्रत-वैकल्याचे, नेमांचे रूपांतर कर्मकांडात झाले. त्यापायी वेगळा खर्च होऊ लागला. आणि कदाचित हा खर्च न परवडण्याच्या अनुभवातून 'दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण पडली असेल.

दुसरीकडे मुलगी हे परक्याचे धन मानणाऱ्या आपल्या समाजाने या महिन्याचे निमित्त करून जावयाला वेगवेगळ्या भेटी, सोने नाणे देण्याची पद्धत पाडली. कदाचित अनेक विवाहितांना सासरी होणारा त्रास, जाच या भेटींचा उपयोग होऊन कमी व्हावा असादेखील ठोकताळा असू शकेल. पण मग अशा देण्याघेण्याच्या व्यवहारातून मान अपमान देखील झाल्याचे अनुभवायला येते. 


यावर्षी दुष्काळात नाही तर 'कोरोनात तेरावा महिना' आहे. यानिमित्ताने आपल्या जुन्या परंपरेत कालानुरूप बदल करता येतो याचा अनुभव नुकताच मिळाला. पुण्यातील 'दत्तात्रय फाउंडेशनच्या' श्रीमती गायत्री जवळगीकर (म.ए.सो.च्या भावे हायस्कूलमधील ग्रंथपाल)आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये काम करणारे डॉक्टर आणि स्वयंसेवक यांचा प्रशस्तीपत्र आणि पदक देऊन सन्मान केला. तसेच त्यांना सुग्रास भोजन देखील दिले. या कार्यक्रमात उपस्थित राहता आले याचा अतिशय आनंद वाटतो.

 समाजाला देण्याची प्रेरणा स्वयंसेवक डॉक्टर यांच्या रूपाने पाहता आली. तर चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा उदारपणा दत्तात्रय फाउंडेशन यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनुभवायला आला.

यानिमित्ताने जुन्या चालीरीती, परंपरा यांना कालानुरूप कसे वळवावे याचा आपण देखील विचार करूया.

सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची