साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग (भाग ५)
रा.ना.जोशी सर आणि प्र.रा.जोशीबाई
रा.ना.( सरांचं त्यावेळचं वापरलं जाणारं संबोधन) सर आम्ही शाळेत असताना काही वर्षे मुख्याध्यापक होते.ते अतिशय भरभर बोलायचे.त्यामुळे अगदी लक्षपूर्वक त्यांचं बोलणं ऐकायला लागायचं.कडक, शिस्तशीर म्हणून आम्हाला त्यांचा दरारा वाटायचा.
एक वेगळी आठवण म्हणजे एके दिवशी बहुधा जादा तासासाठी म्हणून आम्ही शाळेत आलो होतो.हवा देखील ढगाळ अशी पडली होती. काहीतरी निमित्ताने आम्ही मुलांनी दंगा केला. रा.ना.सर शाळेतच होते.ते आले आणि आम्हा सर्वांना त्यांच्या रुळाने ( पु.लं.च्या शब्दात) " परमेश्वराने केवळ शिक्षाच करण्यासाठी निर्माण केलेल्या (पार्श्व)भागावर" चांगले फटके दिले होते.( माझ्या आठवणीप्रमाणे मला माध्यमिक शाळेत शिक्षा झाल्याच्या मोजक्या दोनतीन प्रसंगांपैकी हा एक).
आम्ही दहावीत असताना ते आम्हाला इतिहास,भूगोल शिकवायला होते.परिच्छेद वाचून त्यातले मुख्य शब्द, सारांशरूप वाक्य कसं ओळखायचं , लक्षात ठेवायचं हे त्यांनी शिकवल्याचं आठवतं. बोर्डाच्या परीक्षेआधी आम्हा दोघातिघांची काही विशेष तयारीदेखील त्यांनी करून घेतली होती.
जोशी बाईदेखील ( हो! हो! बाईच! त्यावेळी शाळेतील शिक्षिकांच्या मॅडम झाल्या नव्हत्या.) आमच्या वर्गाला एक दोन वर्षे शिकवायला होत्या. त्यांचं शिकवणं हसूनखेळून असायचं.एकदा त्या ऑफ तासाला आमच्या वर्गावर आल्या होत्या. त्यांनी एक मोठी गोष्ट रंगवून सांगायला सुरुवात केली होती.गोष्ट इतकी रंगत गेली की तास संपला पण ती गोष्ट काही पूर्ण झाली नाही.आता उरलेली नंतर केव्हातरी म्हणून त्या गेल्या. पण नंतर काही अशी संधी मिळाली नाही आणि माझ्या आठवणीप्रमाणे ती गोष्ट काही पूर्ण झाली नाही.
सरांचं २४.१०.१९९६ ला आणि बाईंचं २२.०९.२०१० ला निधन झालं.दोघांनाही विनम्र अभिवादन..!
फोटो राजेंद्र जोशी यांच्याकडून
Comments
Post a Comment