साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग ( भाग १०)
विलास धायगुडेसर
मी सातवीत असताना शेवटच्या महिन्यात पुढच्या वर्षी तांत्रिक विभागात प्रवेश घ्यायचा की नाही याबाबत जरा विचारातच पडलो होतो.कारण तांत्रिक विभागाच्या धायगुडेसरांची ख्याती.ते अतिशय कडक आणि शिक्षा करणारे असा त्यांचा लौकिक आम्हा मुलांमध्ये होता. मला कधी त्यांनी शिक्षा केली नाही. पण नववीत असताना वर्गातील काही मुलांना त्याचा अनुभव आला.गृहपाठ पूर्ण न करणाऱ्या मुलांना त्यांनी वर्गात १०० उठाबशा काढायला लावल्या होत्या. त्यातील काहीजणांची दुसऱ्या दिवशी सकाळी बसायची देखील अडचण झाली होती.
धायगुडेसर आम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉईंग शिकवायचे. ते त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवलं की पुढं इंजिनिअरिंगला गेल्यावर माझं ड्रॉईंगचं शीट सगळ्यात आधी तयार व्हायचं आणि काही मुलं ते बघून काढायची.( इंजिनिअरिंगच्या त्या वर्गात माझी वेगळी अडचण व्हायची की ड्रॉईंग शिकवणाऱ्या सबनीस सरांची पद्धत अगदी वेगळी होती आणि मग माझा गोंधळ उडायचा. मग काही दिवसांनी मी त्यांचं फक्त ऐकल्यासारखं करायचो पण मनात धायगुडेसरांच्या पद्धतीने विचार करायचो.मग हा प्रश्न मी माझ्यापुरता सोडवला.)
सर सध्या पुण्यात असतात. त्यांना विनम्र नमस्कार.
( फोटो सरांकडून )
Comments
Post a Comment