पुस्तक परिचय ऋणानुबंध रक्ताचे
ऋणानुबंध रक्ताचे
लेखक:- महेंद्र वाघ
प्रकाशक:- भारतीय विचार साधना, पुणे
हे पुस्तक वाचताना पुस्तकातील अनेक प्रसंग मनात घर करून जातात. फेरीवाल्याचा व्यवसाय करणारा युवक आपल्याकडे जे आहे ते समाजाला द्यावे या भावनेतून रक्तदान करतो, शारीरिक विकलांगता असतानादेखील कै. गणेश जोशी सारखा युवक रक्तपेढीच्या कामात जिद्दीने स्वतःला जोडून घेतो, गरजू लहान मुलांना रक्तपेढीकडून सवलत मिळावी यासाठी पुढाकार घेऊन बालसंजीवनी योजना साकारण्यासाठी पुढाकार घेणारे निवृत्त वकील आपटे, संघाच्या सूचनेनुसार रक्तपेढीच्या कार्यात वयाच्या ऐंशीव्या वर्षांपर्यंत सक्रीय असणारे मराठे काका आणि अन्य सेवाव्रती, माननीय म्हणवले जाणारे नगरसेवक सवलतीची अपेक्षा करतात तर रूग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असणारा व्यक्ती सवलत देण्याची आवश्यकता नव्हती असे म्हणतो, रक्तपेढी उभी करण्यासाठी परिश्रम करणारे संस्थापक कै. प. य. खडीवाले वैद्य, कै.डॉ. शरदभाऊ जोशी, कै.अप्पासाहेब वज्रम यासारखी ऋषितुल्य माणसे, लोळागोळा होऊन पडलेली तरुणी रक्तपेढीच्या मदतीने रोग मुक्त होते आणि आनंदाने 'आय ॲम टायपिंग इट मायसेल्फ' असे मोबाइलवरून कळवते, थॅलेसेमियाग्रस्त बालक मयूर उदार उद्योजकाच्या मदतीने निरोगी आयुष्य जगू लागल्याने आनंदित होणारे रक्तपेढीचे संचालक, रक्तपेढी संचालनासाठी सुयोग्य नेतृत्व देणारे वैद्यकीय संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांच्यापासून ते रक्तपेढीतील मावशी , वेळी-अवेळी धावपळ करून रक्त पिशवी, रक्त घटक रुग्णांपर्यंत पोचवणारे रक्तदूत याांच्यापर्यंत असणाऱ्या सर्वच व्यक्तींच्या सहभागाचा योग्य उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. समाजातील सामान्य व्यक्ती, आपल्या नावाचा उल्लेखदेखील नको असलेले सहृदय दाते , विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती यांच्यापासून ते चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तिंचे आलेले अनुभव हे वाचकाच्या मनात घर करून राहतात.
मुंबई तरुण भारतच्या वेबपोर्टलसाठी लिहिलेल्या ५२ लेखांच्या मालिकेचे या पुस्तकात रूपांतर करण्यात आले आहे. रक्तपेढी उभारण्यामागची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रेरणा, रक्तपेढी उभी करण्यासाठी अनेकांनी घेतलेले परिश्रम, केवळ सेवाभावी काम असे स्वरूप न ठेवता रक्तपेढीच्या कामातील प्रमाणित मानदंड हा प्रवास करताना केला गेलेला विचार, रक्तपेढी हे एक कुटुंब मोठं व्हावे यासाठी डोळसपणे आखलेले उपक्रम, सेवाभावी काम असूनही त्यात जपलेली व्यवसायिक नीतीमत्ता या सगळ्याची माहिती या पुस्तकातून मिळते. रक्तपेढीच्या कामाचे सर्वांगीण दर्शन घडवणारे हे पुस्तक आहे. कधी घडलेल्या प्रसंगाच्या वर्णनाने,कधी कवितेच्या ओळींनी, तर कधी एखाद्या चित्रपटाच्या प्रसंगाच्या वर्णनाने सुरू होणारे लेख वाचकांच्या मनाची पकड घेतात. हे लेख वाचकाला कधी नवीन माहिती देतात, तर कधी त्यात वर्णिलेल्या प्रसंगाने भावूक करतात, तर कधी काही अपेक्षा ठेवून केलं तर ते दान कसलं असा प्रश्न विचारून अंतर्मुख करतात. पुस्तकात असलेली छायाचित्रे रक्तपेढीच्या विविध टप्प्यांची माहिती देतात. पहिल्या लेखापासून मनाची पकड घेणारे पुस्तक हे अवश्य वाचावे असे आहे.
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment