दुखणे मनाचे...

" आज विद्यापीठाला हलवून टाकल," समीर ( नाव बदललं आहे.) बोलत होता . परत परत तेच सांगत होता. साधारण १२/१३ वर्षांपूर्वीचा प्रसंग समीर विदर्भातील एक हुशार मुलगा, बारावीच्या परीक्षेत थोड्या आजारपणामुळे गुण कमी मिळाले आणि मनाचं दुखणं सुरू झालं. पदवीसाठी एक वर्ष गावाकडे काढलं. पण त्याच्यापुढच्या वर्षी म. ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयात परत पदवीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला. त्याच्या कुटुंबात आई आणि वीज महामंडळात काम करणारा मोठा भाऊ होता. समीरच्या प्रवेशाच्या वेळी त्याचं दुखणं लक्षात घेऊन त्याच्या भावाशी चर्चा केली आणि त्याची हमी घेऊन समीरला प्रवेश दिला. वर्षभर समीर अगदी व्यवस्थित होता. वसतिगृहाच्या कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी झाला. मित्र मैत्रिणींचा चांगला गटही तयार झाला होता. पुण्यातील एका प्रसिद्ध मानस उपचार तज्ञ डॉक्टरांशी डॉक्टरांचे उपचार देखील चालू होते.

वर्षाच्या शेवटी परीक्षा जवळ आली. तसा समीरच्या मनावर ताण वाढत गेला. लेखी परीक्षेला गेला त्यावेळी तो ताण असह्य झाला आणि त्याने तिथे अनियंत्रित वर्तन केले. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्याकडून मला याची माहिती मिळाली पण त्यावेळी काही करणे शक्य नव्हते.
दुपार कशीबशी गेली. पण संध्याकाळी समीरला अस्वस्थ वाटू लागले आणि मग तो आमच्या घरी पोचला. मी त्यावेळेला नेमका संस्थेच्या काही कामासाठी बाहेर गेलो होतो घरी सौ. शैलजा आणि छोटा शंतनू होता. शैलजाच्या लक्षात सर्व परिस्थिती आली तिने त्याला बसवून ठेवले आणि मला फोन केला. मी फोनवर सांगितले की, त्याला चहा पाणी दे काहीतरी खायला दे असे . शैलजाने हे सगळे केले. पण हे सर्व होत असताना समीर "आज विद्यापीठ हलवून टाकलं" हेच परत परत म्हणत होता. अंग खूप दुखतय असं तो सारखं सारखं म्हणत होता म्हणून शैलजाने त्याच्या सांगण्यावरून त्याचे हातपायदेखील चेपून दिले. काय करावे ते तिला सुचत नव्हतं.
साधारण पंचवीस-तीस मिनिटात मी घरी पोहोचलो. समीरशी काही वेळ बोलल्यानंतर उलगडा झाला की गेले दोन-तीन दिवस तो व्यवस्थित जेवला नव्हता, तसेच त्याने त्याच्या नेहमीच्या गोळ्या देखील घेतल्या नव्हत्या. त्याला आम्ही बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच्या डॉक्टरांची माहिती काढली. मी आतल्या खोलीत जाऊन डॉक्टरांशी फोनवर बोललो आणि त्यांनी समीरजवळच असलेल्या काही गोळ्या तातडीने त्याला द्यायला सांगितल्या. समीरला समजावून त्या गोळ्या त्याला दिल्या. गोळ्या घेत असताना आता आपल्याला झोप लागणार हे त्याच्या लक्षात येत होते. तो ते देखील म्हणत होता. हळूहळू गोळ्यांचा परिणाम दिसू लागला मग वसतिगृहाचे सेवक आणि समीरचे मित्र यांच्या मदतीने त्याला त्याच्या खोलीत पाठवले. तिथे तो झोपला पण अजून काळजी होतीच. कारण त्याची खोली बाल्कनीची होती आणि बालकनीला लोखंडी जाळ्या बसविल्या नव्हत्या. समीरच्या मित्रांना त्याला अजिबात नजरेआड होऊ द्यायचे नाही अशा स्पष्ट सूचना दिल्या.
दरम्यान त्याच्या भावाशी संपर्क केला तर तो नोकरीच्या निमित्ताने बीडला होता. एकूण समीरची अवस्था पाहून लक्षात आले की अधिक मदतीची आवश्यकता आहे. मग भावाने पुण्यातील त्याच्या एका मित्राला आमच्या वसतिगृहावर पाठवले. विशेष बाब म्हणून त्या मित्राला वसतिगृहाच्या खोलीत राहण्याची परवानगी दिली आणि रात्रभर लक्षात ठेवायला सांगितले. समीरचा भाऊदेखील ताबडतोब बीडमधून निघाला आणि सकाळी पुण्यात पोहोचला. पूर्ण रात्र तशी काळजीतच गेली. सुदैवाने समीर रात्रभर गाढ झोपला. नंतर त्याची आई देखील आली आणि एक-दोन दिवस वसतिगृहाच्या अतिथी कक्षात राहिली. थोडं बरं वाटल्यावर समीरला त्याच्या कुटुंबियांबरोबर परत पाठवून दिले. समीर पुढची परीक्षा देऊ शकला नाही आणि अनुत्तीर्ण झाला. वसतिगृहदेखील सोडून गेला. परत नंतर त्याच्याशी कधी संपर्क झाला नाही. सध्या समीर जिथे असेल तिथे व्यवस्थित असेल अशी आशा वाटते. पण हा प्रसंग मी आणि शैलजा कधीही विसरणार नाही.
अजून असे काही अनुभव वसतिगृहाच्या आणखी काही विद्यार्थ्यांबाबतीत आले. त्यांच्याबद्दल नंतर केव्हातरी.



धावपळीचं आयुष्य, स्पर्धेचा ताणतणाव, आयुष्यात अनेक कारणांमुळे असणारी गुंतागुंत यामुळे एकूणच समाजात अनेक व्यक्तींच्या मनावर खूप ताण आहे आणि तो वाढतानादेखील दिसतो आहे. सकारात्मक विचार, तज्ञांचे मार्गदर्शन व उपचार , आप्तेष्टांचा जिव्हाळा याच्या आधारावर मानसिक आजारातून निश्चित बरे होता येते. पण दुर्दैवाने आपल्या समाजात शारीरिक आजार जितक्या सहजपणे स्विकारले जातात तितक्याच सहजपणे मनाचं दुखणं स्वीकारले जात नाही अशी साधारण परिस्थिती आहे. परंतु ताणतणावामुळे कुणालाही अशा मनाच्या दुखण्याला सामोरं जाऊन जावं लागू शकतं हे लक्षात घेऊन आपण समजूतदारपणे असं मनाचं दुखणं असणारी एखादी व्यक्ती आपल्या संपर्कात असेल तर त्याच्याशी सहृदयतेनं वागलं पाहिजे.
माजी पंतप्रधान कै.अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या ओळी मार्गदर्शक आहेत.
छोटे मन से कोई बड़ा नहीं होता।
टूटे मन से कोई खड़ा नहीं होता।
(छायाचित्र pixabay.com वरून साभार)
( वसतिगृहाच्या माजी विद्यार्थ्यांना विनंती :- जर समीरला ओळखत असाल तर कृपया नाव उघड करू नका. पण तो कसा आहे हे माहिती असेल तर मला वैयक्तिकरित्या जरूर कळवा.)

Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची