पुस्तक परिचय अनंतानुभव

अनंतानुभव

लेखक:- डॉ.अनंत कुलकर्णी

शब्दांकन:- सुधीर जोगळेकर

स्नेहल प्रकाशन, पुणे




प्रेरणादायक जीवनप्रवासाचे प्रांजळ आत्मकथन

आपले व्यावसायिक आयुष्य पैसा मिळवण्यासाठी जगायचे नाही तर समाजाच्या सेवेसाठी निरपेक्ष काम करण्यासाठी जगायचेे असा  निश्चय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांनी भारलेला एक युवक १९८० मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर  करतो. एका छोट्याशा वनवासी खेड्यात सरकारी नोकरी पासून सुरुवात करून संपूर्ण महाराष्ट्रात आणि नंतर देशपातळीवर सेवा प्रकल्पांचे जाळे उभे करण्यापर्यंतचा हा जीवन प्रवास या आत्मकथनात व्यक्त झाला आहे.

पानापानावर प्रेरणादायक प्रसंग असलेले हे प्रांजळ आत्मकथन नुकतेच वाचून पूर्ण केले. अनेक प्रसंग मनात घर करून गेले, भावनाविवश करून गेले.

 मूळचे कोल्हापूरचे असलेले डॉ. अनंत कुलकर्णी यांनी खटपट करून मिरजेच्या वैद्यकीय रुग्णालयात आपले शिक्षण पूर्ण केले. आपल्या वडिलांकडून सेवेचा वारसा लाभलेल्या डॉ. कुलकर्णींनी कुटुंबियांच्या संमतीने व्यावसायिक आयुष्य समाजसेवेसाठी जगण्याचा निश्चय केला. प्रत्यक्ष कुठे काम करायचे याचा विचार करताना भेट झाली आली ती कै.वसंतराव पटवर्धन (अप्पा) यांची आणि ठाणे जिल्ह्यात सेवा आयुष्याला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात सरकारी नियमानुसार आवश्यक असणारी नोकरी त्यांनी याच वनवासी भागात केली. त्यांच्या निरपेक्ष सेवेचा अनुभव आल्यावर वनवासी बांधवांचा डॉक्टरांवर विश्वास बसला. या निरपेक्ष व सेवावृत्तीने सरकारी रुग्णालयात सेवेसाठी वेगळे पैसे स्वतःसाठी मागणाऱ्या डॉक्टरांचे मन परिवर्तन झाले. तसेच संघाला विरोधक मानणाऱ्या विरोधकांना त्यावेळी या सेवेचा अनुभव स्वतःला आला त्यावेळी त्यांचे हृदयपरिवर्तन झाले. विरोधकांमध्ये स्वतःच्या आईवर उपचार करणे तिला परत चालण्याची शक्ती मिळवून देणाऱ्या डॉक्टरांना गावच्या  पाटलांनी सर्वांसमोर मारलेली प्रेमाची मिठी किंवा उभ्या राहणाऱ्या सेवाप्रकल्पाचा उपयोग सर्वांना होणार आहे हे जाणून विरोधकांनी आपली बदललेली भूमिका असे अनेक प्रसंग संघाची 'सर्वेषां अविरोधेन' कार्य करण्याच्या शैलीचा वस्तुपाठ दाखवतात.

"परद्रव्येषु लोष्ठवत्" ही उपनिषदातील शिकवण परंपरेने समाजाच्या अंगवळणी पडली आहे हे दाखवणारा प्रसंग म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या या मुलाला मोठ्या रुग्णालयात देण्यासाठी अनंत कुलकर्णी यांनी दिलेले १० रूपये चार महिने पै पै वाचवून परत करणारा वनवासी बांधव. "आम्ही वनवासी एकदाच मारतो तर चिंता कर करून तुम्ही अनेक वेळा मरणाला सामोरे जाता" असे सांगणारा वनवासी बांधव जीवनविषयक जाणीव केवळ पुस्तकातूनच येते असे नाही तर पारंपारिक शहाणपणातून देखील मिळते हे दाखवून देतो. पारंपारिक पद्धतीने बाळंतपण करणाऱ्या सुईणी वैद्यकीय महाविद्यालयामधील शिकवल्या गेलेल्या प्रसूतीच्या पद्धतीचाच अवलंब करतात हा अनुभव डॉक्टरांना थक्क करून सोडणारा होता. या सुईणींना प्रसूतीवेळी अतिशय आवश्यक अशा स्वच्छता आणि निर्जंतुक पद्धतींचे प्रशिक्षण देणे त्यांनी वनवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण कमी केले.

प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून केवळ आजारांवरील उपचार नाही तर आजार होऊ नये, निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी केलेले प्रतिबंधात्मक उपाय, वनवासी बांधवांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्न शेतीचे उत्पन्न वाढावे यासाठी केलेले प्रयोग यातून या बांधवांची सर्वांगीण उन्नती डॉक्टरांनी साधली. आपल्याकडे सर्व सोयी सुविधा आहेत परंतु निरपेक्ष बुद्धीने काम करणारी व्यक्ती नाही म्हणून आपला सेवा प्रकल्प यशस्वी होत नाही हे जाणून उद्योगपती सोमय्या यांनी डॉक्टरांना आकर्षक असा प्रस्ताव दिला. परंतु कुलकर्णी पती-पत्नी निश्चयाने आपल्या संकल्पावर ठाम राहिले.

नाशिकमध्ये असताना अपघाताच्या वेळी योग्य मदत करून वाचलेले प्राण तर कधी यात आलेले अपयश, दरवर्षी आपण रक्तदान शिबिर आयोजित करतो पण आपल्या कामगार बंधूला रक्त मिळू शकले नाही यामुळे संतप्त होऊन रक्तदान शिबिर रद्द करू इच्छिणाऱ्या कामगारांशी संवाद साधून त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून देऊन केलेल्या मनपरिवर्तनातून नेहमीपेक्षा दुप्पट झालेले रक्तदान,  नाशिक शहरातील तज्ञ डॉक्टरांचा पद्धतशीरपणे मिळवलेला सेवाकार्यातील सहभाग, रक्तपेढी उभारताना आलेले विलक्षण अनुभव , कुरियन यांनी चर्चमध्ये आयोजित केलेले रक्तदान शिबिर तर स्वतः च्या मुलीचा साखरपुडा डॉक्टर येईतोपर्यंत न करणारे पठाणकाका, दुसऱ्या प्रयोगशाळेतील तज्ञांनी सांगितलेला चुकीचा रक्तगटच खरा समजून गणेश चतुर्थीच्या दिवशी संतप्त झालेले श्रोत्रीय ज्यावेळी सत्य समजते त्यावेळी डॉक्टरांच्या सांगण्याने गणपती प्रतिष्ठापनेत सहभागी होतात आणि दरवर्षी नियमित रक्तदान करत राहतात असे अनेक प्रसंग मनावर ठसा उमटवून जातात.

स्वतःच्या अनुभवाचा उपयोग संघाच्या सांगण्यावरून जनकल्याण रक्तपेढ्यांचे जाळे सुरूवातीला पूर्ण महाराष्ट्रात आणि नंतर देशात उभे करण्यासाठी केलेले प्रयत्न, वनवासी भागातील आरोग्यसेवा उभारणीचा उपयोग हे काम देशभर पसरवण्यासाठी प्रशिक्षणाचा सहभाग, सेवाभावी रक्तदानाची चळवळ अधिक बळकट व्हावी यासाठी केलेले प्रयत्न, रक्तपेढी रूग्णालये यांची देशभराची संघटना उभी रहावी यासाठी घेतलेला पुढाकार असे अनेक अनुभव यात वाचायला मिळतात.

या सर्व प्रवासात सुरूवातीला आई-वडील, भाऊ नंतर पत्नी सौ.गीता, सासू सासरे आणि मुलगा मुलगी यांची महत्त्वाची साथ डॉक्टरांना लाभली. या कुटुंबातील सर्वांनी सेवाव्रताच्या यज्ञात आपापली समिधा अर्पण केली.



सुरुवातीला सरकारी नोकरी नंतर प्रगती प्रतिष्ठान, महिंद्रा कंपनीची नोकरी, नाशिकच्या जनकल्याण रक्तपेढीमध्ये कार्यकारी संचालकपद, व्यावसायिक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाहपद या प्रवासात डॉ.कुलकर्णी यांची वैयक्तिक स्तरावरील सेवा टप्प्याटप्प्याने संस्था, सामाजिक पातळीवर वाढत गेली. स्थानिक कार्योत्सुक तरुणाला आरोग्यरक्षक म्हणून जबाबदारी देण्याचा एका पाड्यावरील प्रवास हजारो गावांमध्ये असे आरोग्यरक्षक उभे करून दुर्गम वनवासी भागात अत्यावश्यक प्राथमिक वैद्यकीय सेवेचे जाळे देशभर उभे करण्यापर्यंत विस्तारला. ह्या जीवनानुभवाच्या वाचनाने निश्चित प्रेरणा मिळते.

सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची