पुस्तक परिचय ' अजेय भारत'

  लेखिका सुधा रिसबूड

कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे



'एक समान घराणे, समान भूभाग नसताना देखील केवळ त्यांची परंपरा मानते म्हणून रोमन साम्राज्याला रोमन साम्राज्य मानायचे तर त्याच पट्टीने भारतातील गुप्त काल ते बारावे शतक या काळाला आर्यावर्तीय अथवा भारतवर्षीय अथवा हिंदू साम्राज्य म्हटले पाहिजे अशी भूमिका घेऊन,गेली अनेक वर्षे प्रामुख्याने विज्ञान विषयाशी संबंधित लेखन करणाऱ्या सौ.सुधा रिसबूड यांनी 'अजेय भारत' हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय इतिहासाच्या ५ वे शतक ते १२ वे शतक या आठशे वर्षांच्या कालखंडावर विस्तृत प्रकारची माहिती इतिहासाच्या मूलभूत साधनांद्वारे देणारे ४०० पानांचे हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे यांच्या वतीने प्रकाशित होत आहे. या पुस्तकामध्ये भूमिका, प्रादेशिक रचना, राजघराण्यांचा राजकीय इतिहास ,व्यापार, मंदिरे, दाने,सामाजिक रचना, धार्मिक प्रवाह व तत्त्वज्ञान , शिक्षण, युद्धनीती व शस्त्रे, न्यायव्यवस्था, स्त्रीजीवन , कृषी, सारांश अशी एकूण १४ प्रकरणे आहेत. यापैकी काही निवडक प्रकरणे आणि त्यांचा विषय पुढील विवेचनावरून सहजपणे लक्षात येऊ शकतो.
इतिहासाचा अभ्यास केवळ राजे-महाराजे, साम्राज्ये, लढाया, युद्धे, भौगोलिक विस्तार या पुरता मर्यादित न ठेवता समाजजीवनाचा सर्वांगीण पट उलगडण्याची भूमिका घेत लेखिकेने समाजजीवनाच्या विशिष्ट अंगाचा वेध विविध प्रकरणांतून घेतला आहे. उदाहरणार्थ या आठशे वर्षांचा एकसंधपणे विचार केला पाहिजे या मुद्दयासंबंधीची अनेक उदाहरणे 'भूमिका' या प्रकरणात दिली आहेत. सध्या इतिहासाचा अभ्यास करताना विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर देखील मोठा उपयुक्त ठरतो हे लक्षात घेऊन आधुनिक वैज्ञानिक साधने ,वैज्ञानिक दृष्टीकोन व भारतीय मानसिकतेतून भारतीय इतिहासाचा अभ्यास करणे कसे आवश्यक आहे याबाबतचे विचार देखील या प्रकरणात दिले आहेत.
भारतात धार्मिक दृष्टीकोनातून मंदिरांचे महत्त्व आहेच. मंदिरांचा अभ्यास करताना कला, तत्वज्ञान ,मूर्तीशास्त्र , वास्तुशास्त्र या दृष्टिकोनातून यापूर्वी मंदिरांचा विचार झाला आहे. पण लेखिकेने स्थापत्य अभियांत्रिकीच्या दृष्टिकोनातून या कालावधीतील मंदिर बांधणी संबंधीचा केला गेलेला विचार 'मंदिरे ' या प्रकरणातून मांडला आहे. इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतलेल्या लेखिकेने विषयाची गरज म्हणून यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीची पुस्तके अभ्यासली आहेत. याच बरोबर आसुद येथील व्याघ्रेश्वर या मंदिराचा केसस्टडी करून इतिहासातील ताम्रपट यांच्या आधारे शिवमंदिरांची नावे तशीच का पडली यासंदर्भात नव्याने विचार करण्याचा करण्याची आवश्यकता आहे असा निष्कर्ष लेखिका काढते.
'सामाजिक' या प्रकरणामध्ये भारतीयांनी भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक साधने यांच्या अनुभवजन्य ज्ञान आतून व उपलब्ध नैसर्गिक साधने वापरून गावागावातून घरे, पाणी संधारण व्यवस्था, घाट कसे बांधले गेले याबद्दल विवेचन केले आहे. काही नमुनात्मक सर्वेक्षण तसेच उपलब्ध संशोधन विषयक लेखनाचा आधार घेत हे प्रकरण लिहिले गेले आहे.
'व्यापार' या प्रकरणात भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरून चालणारा व्यापार ,सागरी व्यापारी मार्ग , तत्कालीन चलन व त्यांच्या किमती याविषयी माहिती दिली आहे. तसेच अरबी लेखकांच्या लेखनाचा आधार घेत त्याकाळचा व्यापार व सागरी मार्ग यांचा नकाशा याचा समावेश या प्रकरणात केला आहे. या ८०० वर्षातील न्यायपद्धती कशी होती याबाबत स्मृती ग्रंथातील ताम्रपटातील न्याय विषयक संज्ञा यांचे संदर्भ देत 'न्याय' या प्रकरणाचे लेखन केले गेले आहे. तर भारतात पुढील काळात संस्कृतिक एकता कशामुळे दृढ झाली याचा मुळातून अभ्यास करण्याची भूमिका घेत त्याविषयीचे विवेचन 'धार्मिक प्रवाह व तत्वज्ञान' या प्रकरणामध्ये आहे.
भारतीयांची दाने देण्यामागची मानसिकता ही चॅरिटी, डोनेशन, ग्रँट यासारख्या शब्दांतून व्यक्त होणाऱ्या ब्रिटिश इतिहासकारांच्या मानसिकतेपेक्षा निराळी होती हे 'दाने' या प्रकरणातून लक्षात आणून देण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. या प्रकरणात या कालावधीत भारताच्या पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण भागातील राजवटींनी जी दाने दिली त्यातील नमुन्यादाखल काही उल्लेख तत्कालीन लेखांवरून दिले आहेत.
पाश्चात्य इतिहासकारांपेक्षा वेगळी भूमिका घेत भारताचा इतिहास भारतीय दृष्टिकोनातून अभ्यासला पाहिजे असे लेखिकेचे मत आहे. लेखिकेने या पुस्तकासाठी सहा वर्षांच्या काळात विविध साधनांचा तसेच विविध अभ्यास पद्धतीचा अवलंब केला आहे. पुस्तकात दिलेल्या बाराशेहून अधिक तळटीपा या पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढवतात. अध्ययन केलेला विषय मांडताना भारतीय जीवनाचा इतिहास समजून घेणे म्हणजे भारतीय जीवनाचे तत्त्वज्ञान समजून घेण्यासारखे आहे असा लेखिकेने काढलेला निष्कर्ष विचारात घेण्याजोगा आहे.
प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये या ८०० वर्षांच्या कालखंडाकडे दुर्लक्ष केले गेले आहे असे निरीक्षण नोंदवत या कालखंडातबाबत अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे असे प्रतिपादन लेखिका करते. प्रचलित प्रस्थापित इतिहासकारांपेक्षा वेगळ्या पद्धतीने मांडणी करणाऱ्या या पुस्तकाचे स्वागत वाचक ,अभ्यासक कसे करतात हा उत्सुकतेचा विषय आहे.

सुधीर गाडे, पुणे

Comments

Popular posts from this blog

प्रयत्न कधीपर्यंत? यशस्वी होईपर्यंत !

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची चैत्रामभाऊंची भेट

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची