नापास होण्यातील आनंद
' गाडे सर तुम्हाला कळवायला मला अतिशय आनंद होतो आहे की तुम्ही नापास झाला आहात.' संघातील सहकारी संजय भंडारे याचा सोमवारी (१२/१०/२०२०) रात्री फोन आला. अगदी आनंदाने तो सांगत होता. मीही काही वेळ बुचकळ्यात पडलो. पण नंतर लक्षात आल्यावर अतिशय आनंद झाला.
साधारण फेब्रुवारी २०२० मध्ये पुणे महानगराचे कार्यवाह महेशराव करपे यांचा मला फोन आला की ' सौ.सुधा रिसबूड यांच्या अजेय भारत या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या हस्ते ८ एप्रिल २०२० रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तुम्ही त्यांना मदत करा.' या फोन नंतर या कार्यक्रमाच्या नियोजनाला सुरुवात झाली. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रचारक अण्णा वाळिंबे , संघातील सहकारी नरेंद्र जोशी , पुणे महानगराचे प्रचारक सुनीलराव साठे यांच्यासोबत लेखिका सौ.सुधा रिसबूड आणि त्यांचे पती श्री. रत्नाकर रिसबूड यांच्यासोबत काही बैठका होत होत हे नियोजन पुढे पुढे जाऊ लागले. सुरुवातीला रिसबूड पती-पत्नींच्या ओळखीच्या एका निवेदिकेला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देण्यात आले होते. पण त्यांच्या काही अडचणीमुळे त्यांना जमणार नाही असे लक्षात आल्यावर परिचयातील अन्य एका निवेदिकेला हे काम देण्याचे निश्चित झाले. कार्यक्रमाची तयारी सुरूच होती.
पण मार्चच्या सुरूवातीला जगभरात आणि नंतर भारतात कोविड-१९ चा प्रसार वाढत गेला आणि बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रम रद्द झाला. नंतर एक पर्याय म्हणून एप्रिल महिन्याच्या शेवटी शक्य झाल्यास छोटेखानी कार्यक्रम करावा असा विचार झाला. या कार्यक्रमास नियोजित निवेदिका उपलब्ध होऊ शकणार नाहीत असे त्यांनी कळविले. रिसबूड पती-पत्नी चिंतेत पडले त्यावेळी मी त्यांना सांगितले की कोणी नाही मिळाले तर मी सूत्रसंचालन करेन. त्यावेळी त्यांना धीर आला. पण कोविड-१९ चा प्रसार वाढतच गेला आणि हादेखील कार्यक्रम होणार नाही असे ठरले.
साधारण सप्टेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी प्रांत प्रचारक अण्णा वाळिंबे यांनी या कार्यक्रमासाठी १३ ऑक्टोबर २०२० हा दिनांक निश्चित झाल्याचे कळवले आणि पुन्हा तयारीला सुरुवात झाली. अण्णा वाळिंबे, नरेंद्र जोशी ,अजिंक्य कुलकर्णी , सुनीलराव साठे यांच्या उपस्थितीत रिसबूड पती-पत्नींसोबत बैठक होऊन नियोजन ठरले. सूत्रसंचालकाचा मुद्दा आल्यानंतर ते मीच करावे असे ठरले. ठरल्याप्रमाणे नियोजन पुढे पुढे जाऊ लागले.
कार्यक्रमाच्या पाच-सात दिवस आधी अण्णा वाळिंबे यांचा निरोप आला की प.पू. सरसंघचालकांच्या नियमावलीनुसार ( प्रोटोकॉल) त्यांच्याजवळ असणाऱ्या सर्वांची टेस्ट करणे आवश्यक आहे. मनात जरा शंकेची पाल चुकचुकली. कारण काही कोविड-१९ रूग्णांमध्ये बाह्य लक्षणे अजिबात दिसून येत नाहीत आणि दुसरे म्हणजे माझा संशयी स्वभाव. सोमवारी सकाळी सह्याद्री रुग्णालयात आम्हा सर्वांची टेस्ट केली. संजय भंडारे याच्या सूचनेनुसार मग घरीच थांबलो आणि रात्री त्याचा फोन आला की 'सर तुम्ही नापास झालात. ' खुलासा झाला की माझी आणि अन्य सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे मी सूत्रसंचालन करू शकणार आहे.
दरम्यान सूत्रसंचालनाची तयारी मी करतच होतो. या महत्त्वाच्या कार्यक्रमात काय बोलायचे याचा विचार करून एक मसुदा निश्चित केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत शिंदे यांचा परिचय डेक्कन कॉलेज विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी यांच्याकडून तर परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांचा परिचय अण्णा वाळिंबे यांना दाखवून निश्चित केला. सूत्रसंचालनात कोणत्या गीतांच्या ओळी उपयोगात आणता येतील याचा मी काही विचार केला आणि त्याचसाठी सांगलीतील संघाचे कार्यकर्ते अजय तेलंग यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी काही गीते सुचवली.
सूत्रसंचालनाचा मसुदा लिहून झाल्यानंतर साखरवाडीचा मित्र, स्वयंसेवक वासुदेव बिडवे यालादेखील दाखवून त्याच्या सूचना विचारल्या. त्याने देखील या मसुद्याबद्दल, योग्य आहे असे कळवले. एक छोटी सूचना फक्त केली.
हे सर्व करत असताना मला जी वाक्ये मी वसतिगृहाच्या मुला-मुलींना सांगतो ती आठवत होती. ती वाक्ये अशी. 'कार्यक्रमातील सूत्रसंचालन हे जेवणातील मिठासारखे असते. कमी पडले तर जेवण बेचव लागते आणि जास्त झाले तर जेवण जात नाही. त्यामुळे योग्य प्रमाण सांभाळणे हे महत्त्वाचे.'
पण एकदाची तयारी झाली. अन्य नियोजन देखील झाले. कार्यक्रमाच्या दरम्यान प.पू.सरसंघचालकांशी व्यवस्थेच्या अनुषंगाने काही वाक्ये बोलता आली. प.पू.सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या बैठकीत सहभागी होण्याचे यापूर्वी प्रसंग येऊन गेले होते.तसेच ते एकदा घरी येऊन गेले होते. पण अशा समारंभात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत काम करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
कोविड-१९ च्या टेस्टमध्ये नापास झाल्यानेच ठरल्याप्रमाणे सूत्रसंचालन करता आले. (कारण त्याच दिवशी आमच्याबरोबर ज्यांची टेस्ट झाली असे एक कार्यकर्ते पॉझिटिव्ह आढळल्याने ते संबंधित कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत.) नापास होण्यातील हा आनंद अविस्मरणीय असाच आहे. तो कायमच लक्षात राहील.
सुधीर गाडे, पुणे
'अजेय भारत' पुस्तक प्रकाशन कार्यक्रम लिंक
छायाचित्रकार आदित्य बाविस्कर
छायाचित्रकार आदित्य बाविस्कर
Comments
Post a Comment