आव्हान
"सर, आमची एनर्जी कशी चॅनलाइज करायची हे आमच्या जनरेशन पुढे मोठं चॅलेंज आहे."
एके दिवशी मी विद्यार्थ्यांशी बोलत होतो की त्यांना कोणती आव्हाने आहेत असे वाटते. यावर २-३ जणांनी वेगवेगळी उत्तरे दिली आणि एका विद्यार्थ्याने 'एनर्जी कशी चॅनलाइज करायची
हे आव्हान वाटते' असे उत्तर दिले. मी त्याला विचारले की ," असं तू का म्हणतोस?" त्यावर त्यांनं सांगितलं,
"ऑटोमायझेशन सुरू झाल्यापासून माणसाचे आयुष्य दिवसेंदिवस अधिक इझी होत चालले आहे. पूर्वी ज्या गोष्टींना खूप कष्ट करावे लागायचे त्या गोष्टी आता सहज सोप्या बनल्या आहेत. दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी अधिकाधिक प्रगत होत चालली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी ज्याला इंग्रजीत 'ऑन द फिंगर टिप्स ' म्हणतात अशा झाल्या आहेत. उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी जर रेल्वेचे रिझर्वेशन करायचे असेल तर प्रत्यक्ष जाऊन रांगेत उभे राहून ते करावे लागायचे. यात खूप वेळ आणि श्रम खर्ची पडायचे. पण आता इंटरनेटच्या माध्यमातून ते सहज होते. तसेच इतर अनेक गोष्टींबद्दल सांगता येईल. त्यामुळे जी एनर्जी तरुणांच्यात असते ती या प्रकारच्या गोष्टींमध्ये खर्च होत नाही. पण ती एनर्जी वापरली जाणे हे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे ही एनर्जी कशी खर्च करायची हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आमच्यापुढे आहे."
मला त्याचा मुद्दा पटला. तिकिटांचे आरक्षण, बँकेचे व्यवहार, खरेदी यासारख्या अनेक गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून सध्या सहज होतात. त्यामुळे या गोष्टीत ऊर्जा खर्च होत नाही. मग ती कशी वापरायची हा महत्त्वाचा मुद्दा होतो. त्या विद्यार्थ्याच्या विचाराचे मला कौतुक वाटले. युवा अवस्थेत असा विचार सुचणे अतिशय महत्त्वाचे आहे. आजूबाजूला बघताना याचा सहज प्रत्यय येतो. ज्यांना हा मुद्दा महत्वाचा वाटतो ती तरुण मुले मुली कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामात उतरतात. झोकून देऊन काम करतात. ठिकाणी अशा पद्धतीने काम करणारी मुले मुली म्हणजे स्वतःच्या प्रकाशाने परिसर उजळवून टाकणारे जणू दिवेच! जेवढ्या मोठ्या संख्येने हे दिवे वाढतील तेवढ्या प्रमाणात या दीपांची 'दीपावली' होईल आणि आणि आसमंत उजळून निघेल.
तथास्तु..!
सुधीर गाडे, पुणे
तरुणाईला काम करण्यासाठी आकर्षित करणाऱ्या खऱ्याखुऱ्या सेवाभावी संस्थांची जेव्हा मोठ्या प्रमाणात वाढ होईल तेव्हाच ही तरुणांची एनर्जी चॅनलाइज होईल.
ReplyDeleteबरोबर आहे.
ReplyDelete