२००९ च्या स्वाईन फ्लू साथीच्या आठवणी
विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकामुळे मार्च २०२० मध्ये वसतिगृह रिकामे झाले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
(सामसूम असलेले वसतिगृह)
२००९च्या पावसाळ्यात सुरुवातीला पुण्यामध्ये स्वाइन फ्लूची साथ सुरू झाली. रोज वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. सर्दी खोकला असलेल्या लोकांना आपल्याला स्वाईन फ्लू झाला आहे असे वाटू लागले.
त्यातच आमच्या वसतिगृहातील एक विद्यार्थी सचिन काटे याला दोन-तीन दिवस सर्दी पडशाचा त्रास सुरू होता. त्याच्यावर शेजारील संजीवन रुग्णालयात उपचार चालू होते. पण दोन-तीन दिवसांनी ही फरक पडेना म्हणून तेथील डॉक्टरांनी स्वाईन फ्लूची चाचणी करण्यास सांगितले. यावेळेस आज जशी करोनाची चाचणी एकाच ठिकाणी उपलब्ध आहे तशीच स्वाईन फ्लूची चाचणी केवळ पुणे महानगरपालिकेच्या नायडू रुग्णालयात उपलब्ध होती. सचिनला स्वाइन फ्लूची चाचणी करण्यास सांगितले आहे ही बातमी वसतिगृहात लगेच पसरली आणि वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले. त्यात डॉक्टरांचा हा निरोप येईतोपर्यंत रात्रीचे जवळजवळ नऊ वाजले होते त्यामुळे तर वातावरण अधिकच तणावग्रस्त झाले. वसतिगृहातील वरच्या वर्गाचे विद्यार्थी विवेक धामणकर आणि अभय पाटील यांना बरोबर घेऊन मी सचिनसह नायडू रुग्णालयात पोचलो. रात्री देखील तेथे गर्दी होती. रांग लागली होती. काही वेळाने आमचा क्रमांक आला. नायडू रुग्णालयातील डॉक्टरांनी सचिनला काही प्रश्न विचारले , गोळ्या लिहून दिल्या आणि स्वाइन फ्लू नाही असे सांगितले. ते ऐकून काळजी कमी झाली. दरम्यानच्या काळात सचिनचा भाऊ पिंपरी-चिंचवड मध्ये एका रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होता त्याच्याशी संपर्क झाला होता. सचिनला घेण्यासाठी तो निघाला होता आणि संचेती रुग्णालयाच्या पुलावर आमची भेट झाली. सचिनला भावाबरोबर पाठवून दिले.
सचिनला स्वाइन फ्लू नाही ही माहिती वसतिगृहात पोचल्यावर तेथील तणाव निवळला. वसतिगृहाचे प्रमुख प्रा. र.वि. कुलकर्णी, प्राचार्य श्रीकांत गुप्ता आणि संस्थेचे पदाधिकारी यांना ही माहिती कळवली.
दरम्यान पुण्यातील परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत गेली. त्यामुळे वसतिगृह बंद करण्याची कोणतीही अधिकृत सूचना नसतानादेखील वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या आई-वडिलांनी काळजीपोटी त्यांना घरी बोलावून घेतले. त्यामुळे वसतिगृह जवळपास रिकामे झाले. त्यावेळी वसतिगृहात अमित झोडगे ,नचिकेत अट्रावलकर ,कमलाकर काळे, रोहित सारडा असे मोजके विद्यार्थीच राहिले. पण आम्ही त्यांच्याबरोबर संवाद ठेवून त्यांच्याकडे लक्ष दिले. " मिड डे " च्या पत्रकारांनी विद्यार्थी , प्राचार्य आणि मी यांच्याशी संवाद साधून सकारात्मक बातमी प्रसिद्ध केली.
त्यानंतर काही दिवसातच गणेशोत्सव आला. परंतु त्यावर्षी नेहमीची धूमधाम त्यामध्ये नव्हती. कोणत्याच स्पर्धा झाल्या नाहीत. या विद्यार्थी वर्गाबरोबर वसतिगृहाचे कर्मचारी उत्सवात सहभागी झाले. काही दिवसांनी वातावरण निवळल्यानंतर मग पुन्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी परत वसतिगृहात आले.
( २००९ गणेशोत्सवाचा फोटो )
वसतिगृहाच्या या आठवणी बरोबरच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने त्यावेळी लोकांना धीर देण्यासाठी नायडू रुग्णालयाच्या बाहेर मदत केंद्र चालवले होते त्याचीही आठवण आहे. संस्थेच्या सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला, भावे हायस्कूल, रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल या शाळांमधील शिक्षक त्यामध्ये सहभागी झाले होते. लोकांना धीर देण्यासाठी शक्य ते उपाय आम्ही केले.
सध्याच्या कोरोना विषाणूच्या साथीला देखील धीराने तोंड देता येऊ शकते हा विश्वास आहे.
सोबत
मिड डेच्या बातमीची लिंक
२००९ गणेशोत्सवाचा फोटो


पुन्हा कॉलेज सुरू होऊन आपल्या जुन्या अन् विद्यार्थ्यांसोबतchya चांगल्या आठवणी प्रत्यक्षात येवोत हीच सदिच्छा........
ReplyDeleteधन्यवाद
Delete