गुणग्राहक राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज हे बहुमुखी प्रतिभेचे धनी होते. सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेली अजोड कामगिरी तर सर्वांना माहिती आहेच. असे हे शाहू महाराज हे कलाकारांची माणसांची कदर करणारे होते. आपल्या माणसांना ते सर्व प्रकारचे सहाय्य करत असे.
शाहू महाराज हे नाटकांचे चाहते होते. प्रसिद्ध नाटककार गोविंदराव टेंबे यांना एका नाटकासाठी मोर्चेल वगैरे साहित्याची आवश्यकता होती.त्यांनी महाराजांची भेट घेतली. महाराजांच्या कानावर अडचण घातली. महाराजांनी विचारलं हे साहित्य कुठे मिळेल? टेंबे म्हणाले , "महाराज आपल्या वाड्यातच". महाराजांनी सांगितले की, " जा काळजी करू नकोस". प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळेला महाराजांनी राजवाड्यातील साहित्य पोच केले. स्वतः देखील प्रयोग पाहण्यासाठी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले.
( गोविंदराव टेंबे )
महाराजांचे कुस्तीचे प्रेम तर प्रसिद्ध आहेच. पैलवानांचाही महाराजांवर जीव होता. शाहू महाराज १९११ मध्ये इंग्रजांनी भरवलेल्या विशेष दरबारासाठी दिल्लीत गेले होते. तेथे कुस्त्यांचे जंगी मैदान भरवण्यात आले होते. साहजिकच महाराज त्याठिकाणी गेले. महाराजांना पाहताच भारतातील प्रसिद्ध पैलवान त्यांच्या जवळ गेले आणि विचारपूस करू लागले. पैलावानांच्या लक्षात आले की महाराजांची खुर्ची मैदानापासून थोडी दूर ठेवली आहे. तेव्हा सर्व पैलवानांनी मिळून महाराजांसह ती खुर्ची मैदानाच्या जवळ नेऊन ठेवली. अशी महाराजांची ख्याती सर्वदूर होती. पैलवान विजयी झाल्यानंतर त्याला चांदीची गदा द्यावी ही कल्पना महाराजांनाच सुचली. पुणे, मुंबई सगळीकडे चौकशी केली पण चांदीची गदा बनवून द्यायला कोणी तयार होईना. शेवटी महाराजांनी कोल्हापुरातील कारागीराकडून चांदीची गदा बनवून घेतली. तेव्हापासून पहिलवान यांचा गौरव चांदीची गदा देऊन करण्याची पद्धत सुरू झाली.
माधवराव बागल यांचे वडील महाराजांच्या सेवेत होते. माधवरावांच्या भावाचे लग्न पुण्यात झाले. नवीन जोडपे , वऱ्हाड रेल्वेने कोल्हापूरला परत निघाले. माधवरावांच्या वडिलांनी महाराजांना कळवलं की नवदांपत्याला रेल्वे स्थानकापासून घरी नेण्यासाठी चार घोडे पाठवावेत. महाराजांनी आपले घोड्या बरोबरच हत्ती वगैरे लवाजमा रेल्वे स्थानकावर पाठवलाच पण युवराज आणि आक्कासाहेब यांनाही स्वागतासाठी पाठवले.
( माधवराव बागल )
धन्य ते राजर्षी...!
(संदर्भ :- महाराष्ट्र सरकारचा राजर्षी शाहू गौरव ग्रंथ , सोबत ग्रंथाचे मुखपृष्ठ, छायाचित्र सहाय्य Nikhil Walimbe, अन्य छायाचित्रे इंटरनेट )
सुधीर गाडे, पुणे
Comments
Post a Comment